मुंबई : ताजे आणि प्रक्रिया केलेले मांस, मासे थेट ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचते करणारी नाममुद्रा ‘झॅपफ्रेश’ची प्रवर्तक डीएसएम फ्रेश फूडने येत्या २६ सप्टेंबरपासून प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) प्रस्तावित केली असून, मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या संबंधाने प्रति समभाग ९६ रुपये ते १०१ रुपये असा किंमतपट्टा जाहीर करण्यात आला.

कंपनीला या आयपीओच्या माध्यमातून ५६.३१ कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित आहे. हा आयपीओ ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. कंपनीचे समभाग हे मुंबई शेअर बाजाराच्या एसएमई मंचावर सूचीबद्ध केले जातील. नार्नोलिया फायनान्शियल सर्व्हिसेस ही या आयपीओची प्रधान व्यवस्थापक म्हणून काम करेल.

गुरुग्राममधील मुख्यालयातून २०१५ सालापासून कार्यरत झालेले झॅपफ्रेश हे एकात्मिक पुरवठा साखळी प्रारूपानुसार काम करते, ज्यामध्ये चिकन, मटण आणि ताजे मासे आणि रेडी-टू-कूक उत्पादने ही उत्पादकांकडून मिळविणे, त्यावर प्रक्रिया करणे, शीतकरण यंत्रणा आणि वितरण समाविष्ट आहे. कंपनी तिच्या डिजिटल व्यासपीठाद्वारे किरकोळ ग्राहकांना, तसेच हॉटेल, उपाहारगृह आणि खान-पान सेवा विभागातील व्यावसायिक ग्राहकांना सेवा देते.

आयपीओद्वारे उभारला जाणाऱ्या निधीपैकी २५ कोटी रुपये खेळत्या भांडवलाची गरज म्हणून, १५ कोटी रुपये विपणन खर्च, ११ कोटींचा निधी भांडवली खर्च आणि ३ कोटी हे अधिग्रहणांद्वारे अजैविक वाढीसाठी वापरात येतील. झॅपफ्रेशने यापूर्वी मुंबईतील बोन्सारो आणि बंगळुरूमधील डॉ. मीट या कंपन्या ताब्यात घेतल्या असून, तोट्यात चालणाऱ्या या दोन्ही कंपन्यांना त्यातून यशस्वीरित्या नफाक्षम बनविले गेले आहे.