Frontdesk Layoff : जगभरातल्या अनेक देशांना सध्या मंदीचा सामना करावा लागत आहे. अनेक देशांमधल्या मोठमोठ्या कंपन्यांनी, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी अलीकडच्या काळात कर्मचारी कपात केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मेटा, गूगलपासून अमेझॉनपर्यंत अनेक मोठ्या टेक कंपन्यांमध्ये झालेली कपात आपण पाहिली आहे. अशातच आता आणखी एका टेक कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची बातमी समोर आली आहे. केवळ दोन मिनिटांच्या गूगल मीट कॉलमध्ये नोकरकपातीचा हा निर्णय जाहीर करण्यात आला. ऑनलाईन रेंटल प्लॅटफॉर्म फ्रंटडेस्कने ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं ते पाहून अनेकांनी या कंपनीचा निषेध नोंदवला आहे.

फ्रंटडेस्क कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना गूगल मीटची लिंक पाठवली. कंपनीचे सर्व २०० कर्मचारी या मीटिंगमध्ये सहभागी झाले. त्यानंतर कंपनीच्या सीईओंनी कर्मचारी कपातीचा निर्णय सांगितला आणि मीटिंग संपली.

टेकक्रंचच्या अहवालानुसार फ्रंटडेस्कच्या सीईओंनी गूगल मीटिंगवर कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढत असल्याचं जाहीर केलं. कामावरून काढून टाकलेल्या या कर्मचाऱ्यांमध्ये पूर्णवेळ कर्मचारी, अर्धवेळ काम करणारे आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे. काही महिन्यांपूर्वीच ही कंपनी दिवाळखोर झाली होती. तरीदखील महिने तग धरण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात कंपनीला यश मिळालं नाही. अखेर आता ही कंपनी बंद होण्याच्या मार्गावर आहे. सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्यानंतर ही कंपनी जवळपास बद झालीच आहे, केवळ त्याबाबतची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

हे ही वाचा >> Rich Dad, Poor Dad : श्रीमंत होण्याचे सल्ले देणाऱ्या लेखकाच्या डोक्यावर १.२ अब्ज डॉलर्सचं कर्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनीतल्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय जाहीर करताना फ्रंटडेस्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. सी. डेपिंटो म्हणाले, कंपनी स्वतःला दिवाळखोर घोषित करणार आहे आणि सरकारकडून काही आर्थिक मदत मिळवण्यासाठी रिसीव्हरशिपचा अर्ज करणार आहे. दरम्यान, कंपनीने टेकक्रंचच्या अहवालावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.