Google Cloud CEO Thomas Kurian On AI Impact Jobs : आयटी क्षेत्रात सध्या सर्वत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा (AI) वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळत आहे. एआय तंत्रज्ञान अनेकांसाठी सोयीचं असलं तरी यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार असल्याची भीती मागील काही दिवसांपासून व्यक्त केली जात आहे. या एआयचा फटका लाखो तरुण-तरुणींच्या नोकऱ्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र, एआय तरुणांच्या नोकऱ्या खरंच हिरावून घेईल का? याबाबत आता गुगल क्लाउडचे सीईओ थॉमस कुरियन यांनी त्यांची सविस्तर भूमिका मांडली आहे.

एआयमुळे लाखो तरुणांच्या नोकऱ्यांवर गदा येणार असल्याची माहिती अनेक रिपोर्टमधून आतापर्यंत समोर आलेली आहे. ‘एआय’मुळे अनेक कामे स्वयंचलित होत असल्याने तरुणांनाही त्यांच्या भविष्याचा प्रश्न सतावत आहे. त्यामुळे नोकरदारांचं काय होणार? याची चिंता अनेकांना लागल्याचं बोललं जात आहे. पण आता याबाबत गुगल क्लाउडचे सीईओ थॉमस कुरियन यांनी एक मोठा दावा केला आहे.

‘एआय नोकऱ्या हिरावून घेणार नाही, तर नवीन संधी निर्माण करेल’, असं थॉमस कुरियन यांनी म्हटलं आहे. थॉमस कुरियन यांनी एआय तंत्रज्ञान नोकऱ्या नष्ट करेल अशी व्यक्त केली जाणारी भिती फेटाळून लावली आहे. त्याऐवजी एआय तंत्रज्ञान पूर्वीपेक्षा जास्त साध्य करण्यास अधिक सक्षम करेल आणि नोकऱ्यांची जागा एआय कधीही घेणार नाही, तसेच एक नवी संधी निर्माण करेल, असं मत थॉमस कुरियन यांनी मांडलं आहे.

त्याचबरोबर एआय उत्पादकता वाढवण्यास आणि तंत्रज्ञानात नवीन संधी निर्माण करण्यास नक्कीच मदत करेल, असंही थॉमस कुरियन यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे. थॉमस कुरियन म्हणाले की, “एआयकडे पर्याय म्हणून नव्हे तर सक्षमकर्ता म्हणून पाहिलं पाहिजे. कारण मला वाटतं की निश्चितच एक मध्यम मार्ग आहे. मोठ्या प्रमाणात ऑटोमेशनच्या भाकितांना विरोध करत एआयचा उद्देश लोकांना पूर्णपणे बदलण्यापेक्षा क्षमता वाढवणं आहे.”

थॉमस कुरियन यांनी सुंदर पिचाई यांच्या विधानाशी सहमती दर्शवली

थॉमस कुरियन यांनी स्पष्ट केलं की एआय हे तंत्रज्ञान व्यवसायांना ग्राहकांशी अशा प्रकारे संवाद साधण्यास मदत करत आहे, जे या पूर्वी शक्य नव्हतं, ज्यामुळे उत्पादकता आणि गुणवत्ता दोन्ही सुधारत आहेत. तसेच थॉमस कुरियन यांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या एका विधानाशी सहमती दर्शवली. सुंदर पिचाई यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं होतं की गुगलच्या अभियंत्यांनी एआय टूल्समुळे १० टक्के उत्पादकता वाढ अनुभवली आहे, त्यांच्या याच वक्तव्यांशी थॉमस कुरियन यांनी देखील सहमती दर्शवत एआय नोकऱ्यांची जागा घेणार नाही, तर एक संधी निर्माण करेल आणि अधिक उत्पादकता वाढवेल असं म्हटलं आहे.