GST Reforms In India: भारतातील जीएसटी कर आकरणी पद्धतीत नुकत्याच सुधारणा करण्यात आल्या आहे. या जीएसटी सुधारणांचे कौतुक करताना, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. १४० कोटी भारतीयांच्या संकल्पाने २०४७ पर्यंत देश ‘विकसित भारत’ होण्याच्या दिशेने भक्कमपणे वाटचाल करेल असेही गोयल यांनी नमूद केले.
आयपीएचएक्स २०२५ च्या औषध आणि आरोग्यसेवेवरील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात बोलताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले, “कालच्या जीएसटी सुधारणा म्हणजे आत्मनिर्भर भारत करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. १४० कोटी भारतीय २०४७ पर्यंत भारताला, विकसित भारत बनवण्याच्या सामूहिक संकल्पासह एकत्र येत आहेत. याद्वारे प्रत्येकाला संधी मिळेल, प्रत्येकजण भारताच्या समावेशक आणि शाश्वत विकासाच्या प्रवासात सहभागी होईल.”
नरेंद्र मोदींसारखा नेता…
“२०४७ पर्यंत, आपण ४ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेपासून ३० ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचू. भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. अत्यंत अस्थिर, अनिश्चित, खराब हवामान, भू-राजकीय तणावातही, भारताचा ७.८% दराने विकास दर होत आहे आणि ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमच्याकडे नरेंद्र मोदींसारखा नेता देशाचे मार्गदर्शन आणि नेतृत्व करण्यासाठी असतो”, असे गोयल यांनी पुढे म्हटले.
“जगाला माहीत आहे की…
“जगाला माहीत आहे की भारत सर्वांना समान आणि न्याय्य वागणूक देतो. भारतात कायद्याचे राज्य आहे, न्यायालये आहेत, सशक्त माध्यम व्यवस्था आहे, संसद आहे. भारत एक सशक्त लोकशाही म्हणून जगाला आत्मविश्वास देतो. भारतात मोठ्या प्रमाणात तरुण लोकसंख्या असून, १४० कोटी भारतीय लोकांची वस्तू आणि सेवांवरील मागणी मोठी आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्णायक नेतृत्वही आहे. या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे भारताची ओळख ठरते”, असे केंद्रीय मंत्री गोयल यांनी सांगितले.
जीएसटी कर रचनेत बदल
दरम्यान, ५६ व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत १२ टक्के आणि २८ टक्के जीएसटी दर एकत्र करून, ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच जीएसटी स्लॅब ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, जो २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार आहे.
५ टक्के स्लॅबमध्ये आवश्यक वस्तू आणि सेवांचा समावेश आहे, ज्यामध्ये लोणी, तूप, चीज, दुग्धजन्य पदार्थ, प्री-पॅकेज केलेले नमकीन, भुजिया, मिश्रण आणि भांडी यासारख्या अन्न आणि स्वयंपाकघरातील वस्तूंचा समावेश आहे.
१८ टक्के स्लॅबमध्ये लहान कार आणि मोटारसायकली (३५० सीसी पर्यंत), इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती वस्तू आणि काही व्यावसायिक सेवांसारख्या ग्राहकोपयोगी वस्तूंचा समावेश आहे.