पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२९ मध्ये भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचे सांगितले असले तरी त्यावेळी भारत गरीबच राहणार असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी सांगितले आहे. सोमवारी (दि. १५ एप्रिल) हैदराबाद येथे सुब्बाराव यांनी लिहिलेल्या ‘जस्ट ए मर्सिनरी?: नोट्स फ्रॉम माय लाइफ अँड करियर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यात बोलत असताना डी. सुब्बाराव यांनी अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. तसेच त्यांनी सौदी अरेबियाचा हवाला देत सांगितले की, श्रीमंत देश होणे म्हणजेच राष्ट्र विकसित बनते, असे आवश्यक नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, जर तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधानपदाची संधी मिळाली तर २०२९ पर्यंत भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल. अनेक अर्थतज्ज्ञांनी अमेरिका आणि चीननंतर भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज वर्तविला असल्याचेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.

‘RBI बँक सरकारची चीअर लीडर’, माजी गव्हर्नरकडून युपीए सरकारवर खळबळजनक आरोप

या दाव्याबाबत बोलत असताना डी. सुब्बाराव म्हणाले, “माझ्या दृष्टीकोनानुसार हे शक्य (तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणे) आहे. पण यात आनंद साजरा करण्यासारखे काही नाही. का? तर आपली अर्थव्यवस्था मोठी आहे कारण आपली लोकसंख्या १४० कोटी एवढी आहे. आपल्याकडे अधिक लोकसंख्या आहे, त्यामुळे आपली अर्थव्यवस्थाही मोठी आहे. पण तरीही आपला देश गरीबच राहणार”

डी. सुब्बाराव पुढे म्हणाले, भारतीय लोकांच्या दरडोई उत्पन्नाची तुलना जगातील इतर देशांशी केल्यास भारताचा क्रमांक १३९ वा लागतो. तसेच ब्रिक्स आणि जी-२० देशांमध्ये आपल्या देशाची गणना गरीब देश म्हणून केली जाते. त्यामुळे पुढे जाण्यासाठी विकास दराला गती देणे आवश्यक आहे. फायदा सर्वांना वाटून दिला जाईल, याची खात्री करणे आवश्यक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र होईल, असेही सांगितले आहे. यावर बोलत असताना सुब्बाराव म्हणाले, “विकसित राष्ट्र होण्यासाठी आपल्या काही बाबींची पूर्तता करणे अत्यंत गरजेचे आहे. जसे की, कायद्याचे राज्य, मजबूत राष्ट्र, जबाबदार आणि स्वतंत्र संस्था. या बाबींची पूर्तता झाल्यानंतर आपण विकसित राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करू शकतो.”

“ही फक्त सुरुवात..”, अमेरिकेत हिंदूंवर हल्ले वाढल्यानंतर भारतीय वंशाच्या खासदाराने व्यक्त केली चिंता

सुब्बाराव यांनी लिहिलेल्या ‘जस्ट ए मर्सिनरी?: नोट्स फ्रॉम माय लाइफ अँड करियर’ या पुस्तकातही अनेक खळबळजनक दावे केले आहेत. युपीए सरकारच्या काळात प्रणव मुखर्जी आणि पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना अर्थ मंत्रालयाकडून रिझर्व्ह बँकेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात होता, असे सुब्बाराव यांनी पुस्तकात लिहिले आहे. तसेच सरकारच्या धोरणांबाबत आरबीआयने चीयरलीडर बनावे, अशी सरकारची इच्छा असून आपली त्यासाठी सहमती नव्हती, असा दावा “रिझर्व्ह बँक सरकारची चीयरलीडर?”, या शीर्षकाखाली पुस्तकात केला आहे.