Is Stock Market Open Today: आज संपूर्ण भारत दिवाळीचा सण साजरा करत आहे. सर्वात मोठ्या सणांपैकी एक असलेल्या या सणाच्या दिवशी भारतीय शेअर बाजारातही उत्साह पाहायला मिळत असतो. मुहूर्त ट्रेडिंग त्यापैकीच एक आहे. भारतात आज अनेक ठिकाणी (सोमवार, २० ऑक्टोबर) दिवाळीनिमित्त सुट्टी असली तरी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज खुले असणार आहेत.

आज शेअर बाजार सुरू राहणार का?

शेअर बाजार आज नियमित व्यवहारांसाठी सुरू राहणार आहे. तर उद्या म्हणजेच २१ ऑक्टोबर रोजी दिवाळीनिमित्त शेअर बाजार बंद राहिल. मंगळवारी पूर्ण दिवस नियमित ट्रेडिंगऐवजी एक तासाचे विशेष मुहूर्त ट्रेडिंगचे सत्र असेल.

यावर्षी (२०२५) बीएसई आणि एनएसईमध्ये एकूण १४ अधिकृत सुट्टया आहेत. त्यापैकी २१ आणि २२ ऑक्टोबर ही सुट्टी दिवाळीसाठी समाविष्ट करण्यात आलेली आहे.

मुहूर्त ट्रेडिंग तारीख आणि वेळ

दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारातील गुंतवणूकदार मुहूर्त ट्रेडिंग या विशेष ट्रेडिंग सत्राची आतुरतेने वाट पाहत असतात. मुहूर्त ट्रेडिंगसाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) थोड्या वेळासाठी खुले होते. हिंदू चालीरितीनुसार अनेकजण दिवाळीला नववर्षाची सुरुवात होत असल्याचे मानतात. त्यामुळे या दिवशी नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात म्हणून प्रतिकात्मक व्यवहार केला जातो.

यावर्षी पहिल्यांदाच मुहूर्त ट्रेडिंग संध्याकाळऐवजी दुपारी होत आहे. मागच्या वर्षीपर्यंत मुहूर्त ट्रेडिंग संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात येत होते.

मुहूर्त ट्रेडिंग कधी? : २१ ऑक्टोबर

वेळ : दुपारी १.४५ ते २.४५

कोणते एक्सचेंज सुरू राहणार? : बीएसई, एनएसई आणि मार्केटचे इतर सेगमेंट्स

या एका तासाच्या प्रतिकात्मक ट्रेडिंग सत्रादरम्यान गुंतवणूकदार खरेदी किंवा विक्री करून आगामी वर्षात भरभराट होण्याची इच्छा प्रदर्शित करतात.

मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय आणि त्याची सुरुवात कधी झाली?

मुंबई शेअर बाजारात (बीएसई) मुहूर्त ट्रेडिंगची सुरुवात १९५७ मध्ये, तर एनएसईमध्ये १९९२ मध्ये झाली होती. दिवाळीच्या दिवसातील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एका तासाच्या कालावधीसाठी विशेष मुहूर्त ट्रेडिंग आयोजित करण्यात येते. व्यापाऱ्यांसाठी हा बाजारात प्रवेश करण्याचा एक शुभ मुहूर्त समजला जातो. मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार मुहूर्ताच्या वेळा निर्धारित करतात. जो कुणी या एका तासाभराच्या काळात ट्रेडिंग करतो त्याच्याकडे संपूर्ण वर्षभर धनसंचय आणि भरभराट साधण्याची सर्वोत्तम संधी असते, अशी शेअर बाजारातील दलाल (ब्रोकर), ट्रेडर आणि गुंतवणूकदार यांची धारणा आहे.