मुंबई : अदानी समूहातील तीन कंपन्या – अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि एसईझेड आणि अंबुजा सिमेंट्स – यांना अल्प-मुदतीच्या अतिरिक्त पाळत उपायांतर्गत (एएसएम) आणण्याचा निर्णय, मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) या दोन राष्ट्रीय शेअर बाजारांनी गुरुवारी घेतला, तर शुक्रवारी अमेरिकेत ‘एस अँड पी डाऊ जोन्स’ने अदानी समूहातील प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसला येत्या ७ फेब्रुवारीपासून शाश्वतता निर्देशांकातून बाहेर काढत असल्याचे जाहीर करून आणखी एक धक्का दिला.

समभागांच्या किमती फुगवण्यासाठी लबाडी आणि लेखाविषयक फसवणुकीच्या आरोपांचा सामना करीत असलेल्या अदानी समूहाबाबत पुढे आलेल्या माध्यमांच्या आणि भागधारकांच्या विश्लेषणानंतर, अदानी एंटरप्रायझेसला डाऊ जोन्स निर्देशांकांतून बाहेरचा रस्ता दाखवावा लागत असल्याचे शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले. निर्देशांकातील हा बदल येत्या ७ फेब्रुवारीपासून लागू होत आहे.

बीएसई आणि एनएसई यांनी अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांमधील भावातील लक्षणीय घसरणीच्या पार्श्वभूमीवर ‘एएसएम’ निर्देशांअंतर्गत अल्पावधीसाठी अतिरिक्त पाळतीचा निर्णय घेण्यात आल्याचे गुरुवारी सायंकाळी स्पष्ट केले. समभागांतील वध-घट, त्यातील गुंतवणूकदारांचे केंद्रीकरण, तळच्या किमत मर्यादेपर्यंत समभाग घरंगळण्याचे प्रमाण, नजीकच्या बंद भावांमधील मोठी तफावत अशा निकषांवर हा निर्णय घेतला जातो. पाळतीवर असलेल्या समभागांमध्ये ‘इंट्रा-डे ट्रेडिंग’ व्यवहार हे १०० टक्के आगाऊ रक्कम मोजूनच यापुढे होतील, ज्यातून या समभागांमधील सट्ट्याला आळा बसेल, असे शेअर बाजाराला अपेक्षित आहे.

‘एएसएम’ अंतर्गत पाळतीसाठी समभाग निश्चित करण्याचा निर्णय हा पूर्णपणे बाजारातील देखरेखवर आधारीत आहे आणि संबंधित कंपनीविरूद्धची प्रतिकूल कारवाई तिला समजले जाऊ नये, असे स्पष्टीकरण संबंधित शेअर बाजारांनी केले आहे.

नुकसान १० लाख कोटींपुढे

शुक्रवारी सलग सातव्या अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांतील ढासळता क्रम सुरू राहिला. अदानी पोर्ट, अदानी एंटरप्रायझेस आणि अंबुजा सीमेंट वगळता समूहातील इतर कंपन्यांचे समभाग नकारात्मक पातळीवर बंद झाले. समभागातील या पडझडीने अदानी समूहाचे एकूण १० लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल गमावले आहे. अदानी ट्रान्समिशनचा समभाग १० टक्के कोसळून ११५.१० रुपयांचे नुकसान दर्शवित १,३९६.०५ रुपयांवर स्थिरावला. अदानी ग्रीन एनर्जीच्या समभागात देखील १० टक्क्यांची घसरण झाली आणि तो ९३५.९० रुपयांवर बंद झाला. तर अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस आणि अदानी विल्मरच्या समभागात प्रत्येकी पाच टक्क्यांच्या खालच्या सर्किटपर्यंत घसरण झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाजार नियंत्रित : सीतारामन

देशातील भांडवली बाजार चांगल्या प्रकारे नियंत्रित असल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी येथे केला. तसेच उद्योगपती गौतम अदानी यांच्या उद्योग साम्राज्याभोवतीचा वाद गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वासावर परिणाम करील, अशी अपेक्षा मला नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. सीतारामन म्हणाल्या, “सरकारी बँकांनी निवेदने प्रसृत केली असून त्यांतून अदानी समूहाशी त्यांचा कर्जव्यवहार मर्यादित असल्याचे दिसते. त्यामुळे अदानी समूहाच्या समभाग घसरणीचा त्यांच्यावर फारसा परिणाम होणार नाही.”