लोकसत्ता प्रतिनिधी
परदेशातील बँकिंगची उत्क्रांती आणि विकासाचे टप्पे आपण मागील काही भागांत बघितले. आज भारतातील बँकिंग क्षेत्राची माहिती घेऊया. भारतात बँकांचे राष्ट्रीयीकरण केल्यामुळे भारतातील बँकिंग क्षेत्राचा चेहरा पूर्णपणे बदलूनच गेला. विशेषतः जागतिक बँकांचा विचार करता भारतीय बँकांना काही फारसा गौरवशाली इतिहास नाही. पण आधी म्हटल्याप्रमाणे भारतीय संस्कृती खूप प्राचीन असल्यामुळे बँकिंग व्यवस्था त्या काळीदेखील अस्तित्वात असल्याचे पुरावे निदर्शनास येतात.
भारतातील आधुनिक बँकिंगचे खरे स्वरूप ब्रिटिशांच्या काळात सुरू झाले. कारण आधी बघितल्याप्रमाणे, ब्रिटिश जेव्हा भारतात आले तेव्हा बँकिंग व्यवस्था युरोप आणि इंग्लंडमध्ये बरीच प्रगत झाली होती. तशीच किंवा तीच व्यवस्था इंग्रजांनी भारतात आणली आणि रुजवली. भारतातील पहिली बँक म्हणजे द मद्रास बँक जी १६८३ मध्ये सुरू झाली. त्यानंतर १८४३ मध्ये तिचे नाव बदलून बँक ऑफ मद्रास झाले आणि मग आज हीच बँक विलीनीकरणानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणून ओळखली जाते. त्यानंतरदेखील बँका आल्या पण त्या एकतर बंद पडल्या किंवा इम्पिरियल बँकेमध्ये विलीन झाल्या. तिचे परत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्यात आले. म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही खऱ्या अर्थाने भारतातील सगळ्यात जुनी बँक आहे.
आणखी वाचा- बाजारातील माणसं- डॉ. सुरेंद्र अंबालाल दवे : ‘सेबी’चे पहिले अध्यक्ष
तशी बँक ऑफ बॉम्बे (१७२०) आणि बँक ऑफ हिंदुस्तान (१७७०) देखील झाल्या. पण काही वर्षांत अप्रचलित किंवा बंददेखील पडल्या. रिझर्व्ह बँक अस्तित्वात येण्यापूर्वी एका मध्यवर्ती बँकेची कामे भारतातील बऱ्याच बँका सांभाळायच्या, त्यात प्रामुख्याने होती ती इम्पिरियल बँक जी पुढे जाऊन स्टेट बँक ऑफ इंडिया झाली. भारतातील बँकांचा इतिहास बघता बहुतेक बँका या दक्षिणेत मद्रास किंवा पूर्वेला कोलकातामध्ये सुरू झाल्या. याचे मुख्य कारण म्हणजे कोलकाता हे सगळ्यात व्यस्त बंदर होते. यामुळेच परदेशी बँकांनीदेखील पहिल्यांदा कोलकात्याची निवड केली. पॅरिसमधील ग्राइंडलेज
बँकेने १८६४ मध्ये भारतात ४ शाखा उघडल्या. ज्यात कलकत्ता येथे १८६०, मुंबईमध्ये १८६२ आणि पुढे जाऊन मद्रास आणि पाँडिचेरीमध्येदेखील शाखा उघडली, जेथे फ्रेंच वसाहत होती. हॉन्गकॉन्ग बँकेनेही १८६९ मध्ये भारतात शाखा उघडली. भारतातील बँकांचादेखील मोठा इतिहास लाभला आहे. स्वातंत्र्यानंतर भारतीय बँका जास्त स्वयंपूर्ण झाल्या आणि त्यात भरपूर घडामोडी घडल्या.