Gautam Adani: शेअर बाजार नियामक सेबीने (सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) उद्योगपती गौतम अदाणी यांचे पुतणे आणि अदाणी समूहाचे संचालक प्रणव अदाणी यांच्यावर इनसायडर ट्रेडिंगशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

सेबीच्या म्हणण्यानुसार, प्रणव अदाणी यांनी २०२१ मध्ये अदाणी ग्रीन एनर्जीने केलेल्या एसबी एनर्जीच्या खरेदीशी संबंधित संवेदनशील माहिती त्यांचे मेहुणे कुणाल शाह यांना दिली होती, त्यानंतर शाह बंधूंनी शेअर्समध्ये ट्रे़डिंग करून ९० लाख रुपयांचा नफा कमावला होता. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान कॉल रेकॉर्ड आणि ट्रेडिंग पॅटर्नचे विश्लेषण करण्यात आले, त्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला. याबाबत रॉयटर्स या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

प्रणव अदानी यांनी रॉयटर्सला आरोप मान्य न करता किंवा हे आरोप न फेटाळता सांगितले की, ते हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यांनी कोणत्याही सिक्युरिटीज कायद्याचे उल्लंघन केले नाही. रॉयटर्सच्या वृत्तात एका सूत्राचा हवाला देऊन असेही म्हटले आहे की, या प्रकरणाच्या सेटलमेंट चर्चा सुरू आहे.

शाह बंधूंनी त्यांच्या लॉ फर्मद्वारे चुकीचे काम करण्यात आल्याचे नाकारले आणि दावा केला की, त्यांनी केलेले ट्रेडिंग कोणत्याही UPSI वर आधारित नव्हते आणि याची माहिती “सार्वजनिक डोमेनमध्ये आधीच उपलब्ध होती.”

या चौकशीमुळे अदाणी समूहाभोवती वाढत्या नियामक तपासणीत भर पडली आहे. गेल्या वर्षी अमेरिकन अधिकाऱ्यांनी गौतम अदाणी आणि अदाणी ग्रीनच्या दोन अधिकाऱ्यांवर असंबंधित लाचखोरीचे आरोप लावले होते, जे अदाणी समूहाने “निराधार” म्हणून फेटाळून लावले आहेत.

अदाणी ग्रीनने १७ मे २०२१ रोजी ३.५ अब्ज डॉलर्सच्या एंटरप्राइझ मूल्यावर एसबी एनर्जीचे अधिग्रहण केले आहे, जे भारतातील अक्षय ऊर्जा क्षेत्रातील आतापर्यंतचे सर्वात मोठे अधिग्रहण आहे. १६ मे २०२१ रोजी करार अंतिम झाला तेव्हा प्रणव अदाणी यांना येऊ घातलेल्या अधिग्रहणाची माहिती झाली, असे सेबीने म्हटले आहे.

कुणाल आणि नृपाल शाह यांनीही सेटलमेंट करावी असा सेबीचा प्रस्ताव होता, परंतु रॉयटर्सच्या वृत्तात पुढे म्हटले आहे की, अटी खूप कठीण वाटल्याने शाह बंधूंनी आरोपांना आव्हान देण्याचा निर्णय घेतला.

सेबीच्या सेटलमेंट प्रक्रियेचा चालू आढावा पूर्ण झाल्यानंतर प्रणव अदाणी यांच्या सेटलमेंट याचिकेवर विचार केला जाणार आहे.

Live Updates