Nikhil Kamath Mukesh Ambani Stock Market: धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या २०२५ च्या पदवीदान समारंभासाठी झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांसमोर मनोगत व्यक्त करताना निखिल कामथ यांनी त्यांची पहिली नोकरी, त्यांचा पहिला पगार, त्यांनी शेअर बाजारात काम करण्यास कशी सुरुवात केली आणि यासह इतर बऱ्याच गोष्टी सांगितल्या.
यावेळी बोलताना, निखिल कामथ यांनी सांगितले की, ते फक्त १७ वर्षांचे असताना त्यांना कॉल सेंटरमध्ये पहिली पूर्णवेळ नोकरी मिळाली होती. या नोकरीमुळे त्यांना स्वतःसाठी सकाळी बराच रिकामा वेळ मिळायचा आणि या रिकाम्या वेळेत ते शेअर बाजारात ट्रेडिंग करायचे.
“पहिल्या नोकरी दरम्यान मला पहिल्यांदा शेअर बाजाराची ओळख झाली. पूर्वी बाजार सकाळी १० वाजता उघडायचे, आता ते सकाळी ९ वाजता उघडतात,” असे निखिल कामथ म्हणाले.
यानंतर ते म्हणाले की, “मुकेश भाईंना शेअर बाजारामध्ये किती रस आहे हे मला माहित नाही.” त्यांच्या या विधानानंतर कॅमेरामॅनने नीता अंबानी यांच्याकडे कॅमेरा वळवला, तेव्हा त्या मान हलवत आणि हसत असल्याचे दिसले.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पण कामथ यांनी त्यांच्या वाक्याचा शेवट एका अशा ओळीने केला ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले. कामथ म्हणाले, “मुकेश भाईंना शेअर बाजारामध्ये किती रस आहे हे मला माहित नाही पण उद्या काय होणार आहे हे जर कोणाला माहित असेल तर ते कदाचित तेच एकमेव व्यक्ती असतील.”
दरम्यान धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मान मिळवणारे निखिल कामथ हे स्कूल ड्रॉपआऊट आहेत. त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षी शाळा सोडली होती. परंतु, झेरोधाच्या माध्यमातून त्यांनी एक यशस्वी स्टार्टअप उभे केले असून, शेअर बाजार क्षेत्रात सध्या झेरोधा एक आघाडीची ब्रोकिंग कंपनी आहे.