देशांतर्गत आघाडीवर घाऊक महागाई दरातील घसरण आणि त्याबरोबरीने गुंतवणूकदारांनी धातू, वस्तू विनिमय आणि ऊर्जा कंपन्यांच्या समभागात खरेदीचा सपाटा लावल्याने बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात भांडवली बाजार सकारात्मक पातळीवर स्थिरावला. सकाळी व्यवहार सुरू होताच प्रमुख निर्देशांकांनी नकारात्मक पातळीत प्रवेश केला होता, मात्र अखेर तेजीवाल्यांची सरशी होत बाजार सकारात्मक पातळीवर बंद झाला. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर जाहीर होणार असल्याने गुंतवणूकदारांनी मात्र सावध पवित्रा अवलंबिला.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८५.३५ अंशांनी वधारून ६३,२२८.५१ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ६३,२७४.०३ ही उच्चांकी तर ६३,०१३.५१ ही सत्रातील नीचांकी पातळी गाठली होती. मात्र सत्रात सेन्सेक्स ६३ हजारांच्या महत्त्वपूर्ण पातळीच्या वर टिकून राहण्यास यशस्वी झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३९.७५ अंशांची वाढ झाली आणि तो १८,७५५.९० पातळीवर बंद झाला.

नफावसुलीच्या सुरुवातीच्या टप्प्यानंतर भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकात तेजी आली. घाऊक महागाई दर आणि सकारात्मक जागतिक संकेतांमुळे बाजाराला चालना मिळाली. दुसरीकडे माहिती तंत्रज्ञान, बँकिंग क्षेत्रातील समभाग विक्रीचा मारा कमी झाल्याने बाजार पुन्हा सकारात्मक पातळीवर परतला. अमेरिकेत महागाई दरात झालेली घसरण, ऊर्जेच्या दरात झालेली कपात आणि फेडकडून दरवाढीला विराम देण्याच्या शक्यतेने जागतिक भांडवली बाजारांमध्ये तेजीचे वातावरण होते, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

हेही वाचाः WPI Inflation: घाऊक महागाईचा दर तीन वर्षांच्या नीचांकावर

सेन्सेक्समध्ये टाटा स्टीलचा समभाग २.३९ टक्के वधारला. त्यापाठोपाठ टाटा मोटर्स, पॉवर ग्रिड, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, नेस्ले, एचयूएल, महिंद्र अँड महिंद्र, विप्रो, कोटक महिंद्र बँक आणि एशियन पेंट्स यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर दुसरीकडे बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस आणि टायटनच्या समभागात घसरण झाली.

हेही वाचाः शेअर बाजारातल्या सगळ्यात महाग शेअर्स असलेल्या ५ कंपन्या कुठल्या माहीत आहेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेन्सेक्स ६३,२२८.५१ ८५.३५ +०.१४
निफ्टी १८,७५५.९० ३९.७५ +०.२१
डॉलर ८२.१० -१५
तेल ७५.०९ +१.०८