मुंबई : भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने गुरुवारच्या सत्रात ३८३ अशांच्या घसरणीने व्यवहार सुरुवात केली. मात्र दिवसअखेर गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीचा सपाटा लावल्याने तो सकारात्मक पातळीत प्रवेश करण्यास यशस्वी झाला. परिणामी सेन्सेक्सने ६१,००० अंशांची महत्त्वपूर्ण पातळीही पुन्हा सर केली.
गुरुवारच्या सत्रात दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स २२३.६० अंशांनी वधारून ६१,१३३.८८ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात सेन्सेक्सने ४३१.३३ अंश गमावत ६०,४७९.०६ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. तर ६१,२१०.६५ ही सत्रातील उच्चांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ६८.५० अंशांची वाढ झाली आणि तो १८,१९१ पातळीवर स्थिरावला.
देशांतर्गत आघाडीवर भांडवली बाजाराचा कल हा जागतिक बाजारातील प्रतिकूल हालचालींमुळे प्रभावित झाला. अमेरिकी भांडवली बाजार नकारात्मक पातळीत बंद झाल्याने, त्याचेच पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटत गुरुवारच्या सत्रात सुरुवात नकारात्मक झाली. मात्र अमेरिकी वायदे बाजारातील सकारात्मक संकेतामुळे दिवसअखेर बाजारात तेजी परतली. जागतिक मंदीच्या संभाव्यता आणि करोनाच्या भीतीमुळे येत्या काळात बाजारात अनपेक्षित चढ-उतार अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे, असे मत जिओजित फाय.चे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, स्टेट बँक, टाटा स्टील, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग सर्वाधिक तेजी दर्शवत होते. याउलट, टाटा मोटर्स, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, हिंदूस्थान युनिलिव्हर, बजाज फिनसव्र्ह आणि लार्सन अँड टुब्रोचे समभाग मात्र घसरणीसह विसावले. मुंबई शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी ८७२.५९ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.