गुंतवणुकीच्या मदतीने वास्तव परतावा मिळवता येतो आणि दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी गुंतवणूक महत्त्वाची आहे, हे आपणाला पुरेपूर पटते. पण असे असूनही गुंतवणुकीत जोखीम आहे याकरिता अनेकजण गुंतवणूक करत नाहीत. आजच्या लेखात आपण, गुंतवणुकीतील जोखीम कमी कशी करावी आणि चांगला परतावादेखील कसा मिळवावा, हे जाणून घेऊया.

जोखीम कशी कमी कराल?

१) आर्थिक योजना तयार करा आणि त्याप्रमाणे बचत आणि गुंतवणूक करा. आवश्यकतेनुसार आपत्कालीन निधी तसेच विमा संरक्षण जरूर घ्या. आपण जाणतो की, दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली तर गुंतवणुकीतील जोखीम कमी होते. तसेच चांगला परतावादेखील मिळतो. अनेकांच्या बाबतीत असे घडते की, आरोग्यविषयक समस्या आली किंवा नोकरी जाणे, व्यवसायात नुकसान होणे अशी काहीही समस्या आली आणि त्यासाठी योग्य तरतूद नसेल तर गुंतवणूक मोडावी लागते. मग साहजिकच त्या गुंतवणुकीतून अपेक्षित परतावा मिळत नाही. प्रसंगी आर्थिक नुकसानदेखील होते. असे प्रसंग टाळण्यासाठी आर्थिक योजना तयार करून आवश्यकतेनुसार आपत्कालीन निधी तयार करावा आणि विमा संरक्षणदेखील घ्यावे.

upsc capf recruitment 2024 registration begins apply for 506 assistant commandant
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात ‘इतक्या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या कशी होईल निवड, पगार आणि अर्जाची प्रक्रिया
Health Special, Doctor,
Health Special: डॉक्टर गुगलचे फायदे अधिक की, तोटे? काय कराल? काय टाळाल?
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?

हेही वाचा – १२००० रुपयांच्या कर्जातून व्यवसायाला सुरुवात अन् आज २.५ लाख कोटींची कंपनी स्थापून जगाला विकतोय सोनं, कोण आहेत राजेश मेहता?

२) गुंतवणुकीत वैविध्य असावे : गुंतवणूक विभागून केल्यास गुंतवणुकीतील जोखमीचे प्रमाण कमी होते.

३) तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा : गुंतवणुकीतील खाचाखोचा समजणे अवघड असते आणि गुंतवणूक करणे हे अनेकदा २+२ = ४ इतके सोपेदेखील नसते. याकरिता तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

४) आर्थिक साक्षरता वाढवणे : आर्थिक साक्षर व्यक्ती गुंतवणुकीचे निर्णय अधिक सक्षमपणे घेऊ शकते. साहजिकच गुंतवणुकीतील जोखीम कमी होते.

५) जमीन / प्लॉट यासारख्या स्थावर मालमत्तांमधील गुंतवणूक पुरेशा दक्षतेने करा : जमीन / प्लॉट यांची कागदपत्रे अनुभवी वकिलांकडून तपासून घ्यावीत. खरेदी-खताची नोंदणी करावी आणि व्यवहाराची कागदपत्रे सांभाळून ठेवावीत.

६) म्युच्युअल फंडातील गुंतवणूक : म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील जोखीम कमी करण्यासाठी – १. उपलब्ध वेळेनुसार योग्य पर्यायाची निवड करावी. जसे, अल्पकालीन उद्दिष्टांसाठी शेअर आधारित म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास नुकसान होऊ शकते. दीर्घकालीन उद्दिष्टासाठी शेअर आधारित म्युच्युअल फंडात गुंतवणूक न केल्यास वास्तव परतावा कमी मिळण्याची जोखीम असते. २. हायब्रीड फंडातील गुंतवणूक म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील जोखीम कमी करते. ३. शेअर आधारित म्युच्युअल फंडात दरमहा एसआयपीच्या मदतीने गुंतवणूक केल्यास ‘रुपी कॉस्ट अव्हेरजिंग’चा लाभ मिळतो आणि गुंतवणुकीतील जोखीमदेखील कमी होते. ४. शेअर बाजार तेजीत असताना एकरकमी गुंतवणूक न करता सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅनच्या (एसटीपी) मदतीने रोखे आधारित म्युच्युअल फंडातून शेअर आधारित म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून जोखीम कमी करावी. ५. आर्थिक उद्दिष्ट जवळ आल्यावर शेअर आधारित म्युच्युअल फंडातून सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅनच्या मदतीने रोखे आधारित म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी.

हेही वाचा – Money Mantra: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात अर्थव्यवस्था वेगाने वाढण्याचे संकेत!

७) शेअरमधील गुंतवणूक : शेअरमधील दीर्घकालीन गुंतवणुकीतून खूप जास्त नफा होऊ शकतो. अर्थात यासाठी गुंतवणुकीचे मूलभूत नियम पाळणे खूप महत्त्वाचे आहे. ज्यामुळे चांगला नफादेखील होऊ शकतो आणि गुंतवणुकीतील जोखीमदेखील कमी होते. १. शेअर्समधील गुंतवणूक अभ्यासपूर्ण असावी. २. विविध कंपन्यांमध्ये विभागून गुंतवणूक करावी ज्यामुळे शेअर गुंतवणुकीतील जोखमीचे प्रमाण कमी होते. ३. शेअर गुंतवणुकीचा वेळोवेळी आढावा घ्यावा आणि आवश्यकतेनुसार योग्य बदल करावे. ४. तज्ज्ञाचा सल्ला आणि अभ्यास व सुज्ञतेने गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा. ५. कर्ज काढून शेअरमध्ये गुंतवणूक करू नये. ६. योग्य माहिती नसलेल्या पर्यायातील गुंतवणूक टाळावी. शेअरमध्ये फ्युचर व ऑप्शन्स यासारखे पर्याय केवळ अनुभवी गुंतवणूकदारांसाठी असतात. नवशिक्यांनी अशा पर्यायात गुंतवणूक करू नये. ७. शेअर गुंतवणुकीतील जोखीम कमी करण्यासाठी शेअर आधारित म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी. शेअर आधारित म्युच्युअल फंडात विविध कंपन्यांमध्ये तज्ज्ञांमार्फत गुंतवणूक केली जाते. आवश्यकतेनुसार म्युच्युअल फंड मॅनेजर आवश्यक बदल करतात. साहजिकच शेअर गुंतवणुकीपेक्षा शेअर आधारित म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम कमी असते.

थोडक्यात महत्त्वाचे – गुंतवणुकीत जोखीम आहे म्हणून गुंतवणूक टाळणे हीच सर्वात मोठी जोखीम आहे. आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने आर्थिक योजना तयार करा आणि वेळोवेळी गुंतवणुकीचा आढावा घ्या. योग्यप्रकारे गुंतवणूक केल्यास निश्चितपणे गुंतवणुकीतली जोखीम कमी करून नफा वाढवता येतो आणि विविध आर्थिक उद्दिष्टे योग्यप्रकारे वेळेत पूर्ण करता येतात.

(लेखक पुणेस्थित गुंतवणूक सल्लागार)

(dgdinvestment@gmail.com)