प्रवीण देशपांडे

प्राप्तिकराचे अनुपालन करदात्याला करावेच लागते. तो उद्योग-व्यवसाय करणारा असो की नोकरी करणारा असो, गुंतवणूकदार असो किंवा सेवानिवृत्त असो, प्रत्येकाला प्राप्तिकराच्या तरतुदींचे पालन करावेच लागते. असे म्हणतात की, कायद्याच्या अज्ञानाला माफी नाही. प्राप्तिकर कायद्याची भीती न वाटता तो समजून त्यातील तरतुदींचे पालन करणे योग्य आहे. प्राप्तिकर कायद्यात वेळेलासुद्धा महत्त्व आहे. काही तरतुदी मुदतीत न केल्यास त्या तरतुदींनुसार मिळणारी सवलत करदाता घेऊ शकत नाही. करदात्याला करावे लागणारे अनुपालन, भेटी देणे, नवीन घर खरेदी, घराची विक्री करणे, अशा व्यवहारांवर भरावा लागणारा कर, व्याज, दंड, उद्गम कर (टीडीएस) अशा अनेक विषयांवर करदात्याला प्रश्न पडतात. नववर्षापासून या सदरात करदात्यांना प्राप्तिकराच्या बाबतीत पडलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली जातील. वाचकांनी आपले प्रश्न खाली दिलेल्या ईमेलवर पाठवता येतील.

प्रश्न: मी शहरात एक निवासी प्लॉट खरेदी करत आहे. प्लॉटचे करार मूल्य ५५ लाख रुपये आहे. मला या खरेदीवर उद्गम कर (टीडीएस) कापावा लागेल का? आणि असेल तर किती?- प्रशांत जोशी, नागपूर</strong>

उत्तर : कोणतीही स्थावर मालमत्ता (खेडेगावातील शेतजमीन सोडून) खरेदी करताना मालमत्तेचे करार मूल्य किंवा मुद्रांक शुल्कानुसार मूल्य यापैकी जे जास्त आहे त्या रकमेवर १ टक्का उद्गम कर (टीडीएस) कापणे बंधनकारक आहे. मालमत्तेचे करार मूल्य आणि मुद्रांक शुल्कानुसार मूल्य या दोन्हीपैकी कोणतेही एक मूल्य ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास जी रक्कम जास्त आहे त्यावर उद्गम कर कापावा लागेल. ही तरतूद स्थावर मालमत्ता निवासी भारतीयांकडून खरेदी केली तरच लागू आहे. अनिवासी भारतीयांकडून स्थावर मालमत्ता खरेदी केल्यास त्यासाठी वेगळे नियम आहेत.

हेही वाचा >>>Money Mantra: फंड विश्लेषण- युटीआय लार्ज कॅप फंड

प्रश्न: माझ्या मित्राकडून त्याच्या एका खासगी कंपनीचे काही समभाग मी १० वर्षांपूर्वी ५०,००० रुपयांना खरेदी केले होते. ते समभाग मी डिसेंबर २०२३ मध्ये १५ लाख रुपयांना विकले. मला यावर किती कर भरावा लागेल? हा कर मला वाचविता येईल का?- प्रणव काळे

प्रश्न: खासगी कंपनीचे समभाग खरेदी केल्याच्या तारखेपासून २४ महिन्यांनंतर विकल्यास त्यावर होणारा भांडवली नफा हा दीर्घमुदतीचा असतो. खरेदी मूल्य महागाई निर्देशांकानुसार गणून होणाऱ्या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावर २० टक्के दराने कर (अधिक ४ टक्के आरोग्य आणि शैक्षणिक कर) भरावा लागेल. हा कर वाचवायचा असेल तर ‘कलम ५४ एफ’नुसार नवीन घरात गुंतवणूक करता येईल. यासाठी करदात्याकडे नवीन घराव्यतिरिक्त एकापेक्षा जास्त घर नसले पाहिजे. या नवीन घरात गुंतवणूक समभाग विकण्याच्या एक वर्ष आधी किंवा समभाग विकल्यानंतर दोन वर्षांत (घर खरेदी केले तर) किंवा तीन वर्षांत (घर बांधले तर) केली पाहिजे. या कलमानुसार समभाग विक्रीतून होणाऱ्या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर संपूर्णपणे वाचवायचा असेल तर समभाग विक्रीतून मिळालेली संपूर्ण रक्कम (विक्री खर्च वजा जाता) नवीन घरात गुंतवावी लागेल. नवीन घरातील गुंतवणूक समभाग विक्रीतून मिळालेल्या रकमेपेक्षा कमी असेल तर दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्याची वजावट, समभागाची संपूर्ण विक्री रक्कम आणि नवीन घरातील गुंतवणूक याच्या प्रमाणात मिळेल.

हेही वाचा >>>Money Mantra: बँक लॉकर- किल्ली हरवली तर? डिपॉझिट भरावे लागते का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रश्न: माझी गुंतवणूक शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांचे समभाग, इक्विटी फंडाचे युनिट्स आणि डेट फंडाचे युनिट्स यामध्ये आहे. याच्या विक्रीवर होणारा भांडवली नफा हा दीर्घमुदतीचा आहे की अल्पमुदतीचा हे कसे ठरवावे? त्यावर कर किती भरावा लागेल?- नेहा सावंत

उत्तर : शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांचे समभाग किंवा इक्विटी फंडातील युनिट्स, खरेदी केल्याच्या तारखेपासून १२ महिन्यांच्या आत विकल्यास त्यापासून होणारा भांडवली नफा हा अल्पमुदतीचा असतो. या भांडवली नफ्यावर १५ टक्के इतक्या सवलतीच्या दराने कर भरावा लागतो. असे समभाग किंवा इक्विटी फंडातील युनिट्स खरेदी केल्या तारखेपासून १२ महिन्यांनंतर विकल्यास त्यापासून होणारा भांडवली नफा हा दीर्घमुदतीचा असतो. या भांडवली नफ्यावर प्रथम १ लाख रुपयांपर्यंत कर भरावा लागत नाही आणि १ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर १० टक्के इतक्या सवलतीच्या दराने कर भरावा लागतो. अशा व्यवहारांवर रोखे व्यवहार कर (एसटीटी) लागू होत असेल तरच ही सवलत मिळते. डेट फंडासाठी वेगळे नियम आहेत. ३१ मार्च २०२३ पूर्वी खरेदी केलेल्या डेट फंडासाठी आणि १ एप्रिल २०२३ नंतर खरेदी केलेल्या डेट फंडासाठीसुद्धा वेगवेगळे नियम आहेत. ३१ मार्च २०२३ पूर्वी डेट फंड खरेदी केल्याच्या तारखेपासून ३६ महिन्यांनंतर विकल्यास त्यापासून होणारा भांडवली नफा हा दीर्घमुदतीचा होता. शिवाय यावर महागाई निर्देशांकाचा फायदा देखील मिळत होता. परंतु १ एप्रिल २०२३ नंतर खरेदी केलेला डेट फंड कधीही (३६ महिन्यांनंतरसुद्धा) विकला तरी त्यावर होणारा भांडवली नफा हा अल्पमुदतीचाच असेल आणि महागाई निर्देशांकाचा फायदा देखील घेता येणार नाही. या तरतुदीमुळे करदात्याला पूर्वीपेक्षा जास्त कर भरावा लागेल. पूर्वीच्या, महागाई निर्देशांकाचा फायदा घेऊन, २० टक्के दराने कराऐवजी त्याला आता त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागेल.

(लेखक सनदी लेखापाल आणि कर-सल्लागार असून, त्यांचा ई-मेल: pravindeshpande1966@gmail.com)