गोष्ट अगदी काल-परवाची. एका जुन्या मित्राबरोबर सहज गप्पा चालल्या होत्या. कामकाजाच्या गोष्टी झाल्या आणि मग मुलांच्या मुद्द्यांवर बोलायला सुरुवात झाली. शिक्षणाच्या खर्चांवर बोलता-बोलता तो अचानक म्हणाला की, जेवढे पैसे तो त्याच्या मुलीच्या प्ले-स्कूलसाठी (आपल्याकडील बालवाडी) भरतो, त्या वार्षिक खर्चामध्ये त्याचे संपूर्ण शालेय ते आयआयटीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. अर्थात पुढे तो म्हणाला की, ही तुलना अयोग्य आहे. मात्र हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही की, हल्लीच्या शिक्षण पद्धती आणि पालकांच्या बदललेल्या मानसिकतेमुळे मुलांसंदर्भातील खर्च अतोनात वाढले आहेत. याआधी एका लेखातून मी “मुलांसाठी गुंतवणूक करताना” लेखातून कोणते गुंतवणूक पर्याय कसे वापरून संपूर्ण कुटुंबाचे कर व्यवस्थापन करता येईल यासंबंधी माहिती दिली होती. आजच्या लेखातून मी मुलांच्या खर्चांची कशी सोय करता येऊ शकते या बाबत मार्गदर्शन करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Sooner the Better म्हणजेच जेवढ्या लवकर सुरू करता येईल तितके उत्तम. नवीन पालकांनी तर मूल झाल्या-झाल्या स्वतःचे रोख प्रवाह नियोजन (Cash Flow Planning) करायला हवे. आपल्या संपूर्ण आर्थिक आराखड्यातील हा एक महत्त्वाचा भाग असतो. प्रत्येक वर्षी आपल्याकडे कुठून पैसे येणार आणि त्यांचा विनिमय कसा होणार याचा हिशोब म्हणजे रोख प्रवाह नियोजन. साधारणपणे प्रत्येक ५ वर्षांसाठी हा आराखडा तयार केल्याने त्याचा एकूणच कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर चांगला फायदा होताना दिसतो. मुलांसाठी खर्च कोणते? कधी आणि किती होऊ शकतात? याचा अंदाज घेणे थोडे अवघड असते. आपल्या आई-वडिलांनी अनेक वर्षांपूर्वी केलेल्या खर्चाची तुलना इथे होऊच शकत नाही. आपल्यातील अनेकजण एकत्र कुटुंबात वाढलेले असल्यामुळे पाळणाघराचा खर्च त्या काळात नगण्य होता. मात्र आता मूल दीड वर्षांचे झाल्यावर त्याची रवानगी प्ले-स्कूलमध्ये केली जाते. आई-वडील दोघेही कामकाजी असल्याने अनेक पालकांना हे करावे लागते. गेल्या काही वर्षांपासून शहरी भागांमध्ये हे खर्च चांगलेच वाढले आहेत. शाळांचा खर्चदेखील खूप वाढला आहे. आपण सरकारी किंवा कॉन्व्हेंट शाळेतून व्यवस्थित पुढे आलो आणि घराच्या जवळ असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि पदवीचे शिक्षण पूर्ण केले. मात्र आता काळ खूप वेगवान पद्धतीने बदलला आहे. इंटरनॅशनल स्कूल, निरनिराळे बोर्ड आणि पदवीपासून देशाअंतर्गत किंवा परदेशी शिक्षण हे प्रचलित झाले आहे. मुले साधारणपणे बारावीनंतरच घरापासून कुटुंबापासून लांब राहायला लागली आहेत. तेव्हा त्यांच्या शिक्षणाचा, राहण्याचा, प्रवासाचा खर्च हा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे आणि या पुढेही वाढत राहील यात शंका नाही.

हेही वाचा – Money Mantra: निर्णय थकवा म्हणजे काय?

तेव्हा या खर्चांचा अंदाज बांधताना इतर पालकांशी साधलेला संवाद खूप उपयोगी होतो. आपल्या मुलापेक्षा ज्यांची मुले मोठी आहेत, असे पालक आपल्याला या खर्चांबाबतची माहिती योग्य प्रकारे देऊ शकतात. तेव्हा आपल्या आजूबाजूला किंवा कामकाजाच्या ठिकाणी असलेल्या पालकांबरोबर योग्य रीतीने चर्चाकरून आपण खर्चांची आणि त्यानुसार गुंतवणुकीची व्यवस्था करू शकतो. कोणती शाळा, कोणते बोर्ड, शाळेचे शुल्क, बसचे भाडे यावरील खर्च किती याबाबत माहिती मिळाली की, त्यानुसार साधारण २-३ वर्षे कधीतरी तयारी करता येऊ शकते. आधीच्या काळात ट्यूशन हा प्रकार फारतर एखाद्या विषयात किंवा अभ्यासात कमी असलेल्या अथवा घरी अभ्यास न करणाऱ्या मुलांसाठी असायचा. शिवाय काही महत्त्वाच्या वर्गांसाठी किंवा प्रवेश परीक्षांसाठी ज्यादा वर्ग असायचे. परंतु आता सरसकट सगळीच मुले कोणत्या न कोणत्या क्लासला जाताना दिसतात. शिवाय इतर छंद जोपासायचे वर्गसुद्धा आहेतच – कराटे, स्केटिंग, डान्स, क्राफ्ट, आणि काय काय ! तेव्हा शाळेच्या शुल्काव्यतिरिक्त हे सर्व खर्चसुद्धा कदाचित तितकेच मोठे असतात.

आता वळूया मुलांच्या परदेशातील शिक्षणाकडे. याच्यासाठी गुंतवणूक करताना काम अजून किचकट होते. एकतर मुले कोणते क्षेत्र निवडून कुठे जाणार हे माहीत नसते आणि शिवाय ज्या देशात जाणार तिथली महागाई कशी वाढत आहे हेसुद्धा नीट समजत नाही. त्यावर त्यांच्या चलनाची जोखीम असतेच. मग अशावेळी गुंतवणूक करताना जास्त काळजी घायवी लागते. कर्ज मिळत असल्याने हा खर्च पेलणे थोडे सोपे झाले आहे. मात्र, त्यासाठी अनेक बंधने आहेत. सरसकट सगळ्यांनाच आणि हवे तितके कर्ज मिळत नाही. म्हणून घरात आधीपासून बचत करणे आवश्यक आहे.

हेही वाचा – Money Mantra: प्रोटेक्टिव्ह पुट स्ट्रॅटेजी काय असते?

हा लेख लिहायला घेतला तेव्हा आमचे एक चांगले स्नेही सांगत होते की, सध्याच्या मुलांची जीवनशैलीच खूप बदललेली आहे. अगदी नववी दहावीतली मुले नाईट आऊट, व्हेकेशन, सिनेमे, मॉल्स, मोबाईल या गोष्टींच्या विळख्यात अडकली जात आहेत. या बदलत्या जीवनशैलीमागे अनेक कारणे आहेत. विभक्त कुटुंब, दोन्ही पालक कामकाजासाठी बाहेर, सामाजिक माध्यमांचा प्रभाव आणि मोबाईल संस्कृती! आणि या सर्वांच्या जोडीला असणारा पैसा. ७०-८० च्या दशकातील मुलांना जो ‘पॉकेट मनी’ कॉलेजला जाताना मिळायचा, तो हळूहळू माध्यमिक शाळांमधील मुलांना मिळू लागला आणि आता अनेक ठिकाणी मुलांना क्रेडिट कार्डसुद्धा दिली जातात. अनेक वेळा खर्च करताना मुलांच्या लक्षात येत नाही की, तो खर्च गरजेचा आहे वा नाही, किंमत वाजवी आहे की नाही. आपले मित्र-मैत्रिणी खर्च करतात म्हणून आपण करायलाच हवा का? अशा खर्चांसाठी पालकांनी कशी तयारी करावी हे सांगणे खूप कठीण आहे. अर्थात इथे कौटुंबिक संस्कार खूप उपयोगी पडतात. मात्र हे संस्कार आताच्या काळातील मुलांवर करणे एक आव्हान आहे.

तेव्हा काहीही असो, पण पालक म्हणून हे आव्हान स्वीकारणे ओघाने आलेच. तेव्हा प्रत्येक ५ वर्षांचे नियोजन करण्याने या खर्चाची तरतूद करणे बऱ्यापैकी सोयीस्कर होऊ शकेल. शिवाय दीर्घकाळासाठी गुंतवणूक नियोजन करताना महागाईचे अंदाज चुकू शकतात. मात्र अशाप्रकारे केलेल्या छोट्या नियोजनामुळे अपेक्षित महागाईनुसार आर्थिक ध्येयासाठी लागणारी रक्कम व त्याची तरतूद करायला योग्य वेळ देता येऊ शकतो. सरतेशेवटी ज्या झाडाची मुळे खोलवर जातात तीच झाडे वादळांचा सामना करू शकतात. आपली मुलेदेखील या झाडांसारखीच आहेत. नुसते सोयींच्या खतावर जरी गुटगुटीत झाली तरी, आयुष्यातील अनेक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांना खरी मदत होईल ती, त्यांच्या मनात खोलवर रुजवलेल्या संस्कारांची. तेव्हा चांगले अर्थ संस्कार त्यांच्यापर्यंत कसे पोहोचवता येतील याबाबतसुद्धा पालकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.

trupti_vrane@yahoo.com

प्रकटीकरण: हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marg subatecha children and financial planning print eco news ssb
First published on: 20-08-2023 at 08:44 IST