Money Mantra पूर्वी टीडीएस कराच्या तरतुदी सर्वसामान्य करदात्याला किंवा नोकरवर्गाला लागू नव्हत्या. फक्त बँक, कंपनी, संस्था, उद्योग-व्यवसाय करणारे (ठराविक उलाढाल असणारे) वैयक्तिक करदाते, वगैरेंनाच लागू होत्या. आता काही व्यवहारांच्या बाबतीत सर्व करदात्यांना टीडीएस कराच्या तरतुदी लागू आहेत. म्हणजेच उद्योग-व्यवसाय न करणारे नोकरदार, ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा टीडीएस कर कापून तो सरकारजमा करून तरतुदींचे अनुपालन करावे लागते. अशा तरतुदींची व्याप्ती मागील काही वर्षात वाढविली आहे. याची सुरुवात २०१३ साली स्थावर मालमत्तेच्या खरेदीवर टीडीएस कर कापण्याच्या तरतुदीपासून झाली. त्यानंतर घरभाडे, कंत्राटी आणि व्यावसायिक देणी यांचाही समावेश करण्यात आला. सामान्य नागरिकांना (ज्यांच्या उत्पन्नात उद्योग-व्यवसायाचा समावेश नाही) टीडीएस कराच्या प्रामुख्याने खालील तरतुदी लागू होतात.

घर-भाड्यावर टीडीएस कर

वैयक्तिक करदाते आणि हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ) हे कोणत्याही व्यक्तीला दरमहा ५०,००० रुपयांपेक्षा जास्त भाडे देत असतील तर त्यांना टीडीएस कराच्या तरतुदी (कलम १९४-आयबी) लागू होतात. या टीडीएस कराचा दर ५% इतका आहे. हा टीडीएस कर वर्षाच्या शेवटच्या महिन्यात कापावा लागतो किंवा भाडे करारनामा वर्षाच्या आतमध्ये संपला तर करारनाम्याच्या शेवटच्या महिन्यात टीडीएस कर कापावा लागतो. जर आपला भाडे करारनामा दोन आर्थिक वर्षांत विभागला गेला असेल तर आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये आणि दुसऱ्या आर्थिक वर्षात ज्या महिन्यात भाडे करारनामा संपेल त्या महिन्यात कापावा लागतो. ज्या महिन्यात टीडीएस कर कापला आहे तो महिना संपल्यानंतर ३० दिवसाच्या आत हा टीडीएस कर आपल्याला फॉर्म २६ क्यूसी मध्ये चलन भरून सरकारकडे जमा करावा लागतो. उद्गम कर जमा करण्याच्या मुदतीनंतर १५ दिवसात फॉर्म १६ सी डाऊनलोड करावा लागतो आणि असे न केल्यास प्रतिदिन दंड भरावा लागतो. या घरभाडे उत्पन्नावर उद्गम कर भरताना टॅन (टॅक्स डिडक्शन अकाऊंट नंबर) घेणे गरजेचे नाही. पॅनवरूनच तो भरता येतो.

न्यायालयीन प्रक्रियेच्या दुरुपयोगासाठी जनहित याचिका नको; याचिकाकर्त्यांना ५० हजार रुपयांचा दंड
Loksatta kutuhal Endowment of Suryaji Pisala Artificial intelligence
कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त
free medical facility to employees on election duty
नागपूर: कर्मचाऱ्यांना नि:शुल्क उपचार, दिव्यांगांसाठी केंद्रावर व्हीलचेअर
Vanchit Bahujan Aghadi Changes Lok Sabha Candidates in maharashtra ahead of lok sabha 2024 Election
‘वंचित’ चा फेरबदल कोणाच्या फायद्याचा? कोणाच्या सांगण्यावरून?

हेही वाचा…Money Mantra : महिला दिनानिमित्त गुंतवणुकीचा ‘वूमन्स प्लॅन’

कंत्राटी देणी, कमिशन आणि व्यावसायिकांची देणी

कलम १९४ एम नुसार कंत्राटी देणी, कमिशन (विमा कमिशन सोडून) किंवा व्यावसायिकांना (वैद्य, वास्तू विशारद, सल्लागार, सीए, वगैरे) एका वर्षात ५० लाख रुपयांपेक्षा जास्त देणी दिल्यास ५ % या दराने टीडीएस कर कापणे बंधनकारक आहे. हे कलम वैयक्तिक स्वरुपाच्या खर्चासाठी किंवा धंदा-व्यवसायाच्या खर्चासाठी सुद्धा लागू आहे. ज्या महिन्यात टीडीएस कर कापला आहे तो महिना संपल्यानंतर ३० दिवसाच्या आत हा टीडीएस कर आपल्याला फॉर्म २६ क्यूडी मध्ये चलन भरून सरकारकडे जमा करावा लागतो. टीडीएस कर जमा करण्याच्या मुदतीनंतर १५ दिवसात फॉर्म १६ डी डाऊनलोड करावा लागतो आणि असे न केल्यास प्रतिदिन दंड भरावा लागतो. या खर्चावर कापलेला टीडीएस कर सरकारकडे भरतांना टॅन (टॅक्स डिडक्शन अकाऊंट नंबर) घेणे गरजेचे नाही.

स्थावर मालमत्तेच्या खरेदीवर टीडीएस कर

हा टीडीएस कर सर्व प्रकारच्या करदात्यांसाठी लागू आहे. करदात्याने स्थावर मालमत्ता म्हणजे जमीन (शेतजमीन वगळता), इमारत किंवा दोन्हीही. निवासी भारतीयांकडून खरेदी केली आणि स्थावर मालमत्तेचे मूल्य किंवा मुद्रांक शुल्कानुसार मूल्य ५० लाख रुपयांच्यापेक्षा जास्त असल्यास कलम १९४ आयए नुसार १ % टीडीएस कर कापण्याची तरतूद आहे. ही तरतूद फक्त निवासी भारतीयांकडून स्थावर मालमत्ता खरेदी केली तरच लागू आहे. हा टीडीएस कर मालमत्ता खरेदी करणाऱ्याला कापावा लागतो. खरेदी करणाऱ्याने पैसे हफ्त्याने दिल्यास प्रत्येक हफ्त्याच्या वेळेला टीडीएस कर कापावा लागतो आणि पुढील महिन्याच्या ३० तारखेपर्यंत सरकारकडे फॉर्म २६ क्यूबी चलनद्वारे जमा करावा लागतो. हा कर या मुदतीनंतर जमा केल्यास त्यावर व्याज भरावे लागते. टीडीएस कर जमा करण्याच्या मुदतीनंतर १५ दिवसात फॉर्म १६ बी डाऊनलोड करावा लागतो आणि असे न केल्यास प्रतिदिन दंड भरावा लागतो. हा कर भरतांना मालमत्ता खरेदी करणाऱ्याला टॅन (टॅक्स डिडक्शन अकाऊंट नंबर) घेणे गरजेचे नाही.

हेही वाचा…Money Mantra : स्टॉक स्प्लीट म्हणजे काय ? प्रश्न तुमचे उत्तरं तज्ज्ञांची

अनिवासी भारतीयांना देणी

अनिवासी भारतीयांना कोणतेही देणे निवासी भारतीयाने (म्हणजेच घर भाडे, व्याज, व्यावसायिक रक्कम, वगैरे) दिले असेल तर कलम १९५ च्या तरतुदी लागू होतात. यानुसार त्यावर भारतात लागू असणाऱ्या कराच्या दरानुसार टीडीएस कर कापून भरावा लागतो. निवासी भारतीयांना देणी देताना जशा किमान रकमेच्या मर्यादा आहेत अशा मर्यादा अनिवासी भारतीयांना लागू होत नाहीत. उदा निवासी भारतीयांना दरमहा ५०,००० रुपयांपेक्षा जास्त घरभाडे दिले असेल तरच टीडीएस कराच्या तरतुदी लागू होतात. परंतु अशी मर्यादा अनिवासी भारतीयांना देणी दिल्यास लागू नाहीत. अनिवासी भारतीयांना देणी दिल्यास त्यासाठी टॅक्स डिडक्शन अकाऊंट नंबर (टॅन) घेऊन त्यावर कापलेला उद्गम कर भरावा लागतो. आणि त्याचे त्रैमासिक विवरणपत्रदेखील दाखल करावे लागते. हे मुदतीत दाखल न केल्यास दंड भरावा लागतो. या दंडाची कमाल मर्यादा उद्गम कराच्या रकमेएवढी असते.

अनिवासी भारतीयांसाठी तरतुदी

तसेच अनिवासी भारतीयांकडून स्थावर मालमत्ता खरेदी केल्यास त्यावर कलम १९५ नुसार उद्गम कर कापावा लागतो आणि यासाठी ५० लाख रुपयांची मर्यादा नाही. म्हणजेच अनिवासी भारतीयाकडून ५० लाख रुपयांपेक्षा कमी रकमेची स्थावर मालमत्ता खरेदी केली तरी त्यावर टीडीएस कराच्या तरतुदी लागू होतात.

हेही वाचा…Money Mantra : फंड विश्लेषण: एचडीएफसी मिड कॅप ऑपॉर्च्युनिटी फंड

बऱ्याच अनिवासी भारतीयांच्या बाबतीत त्यांचे उत्पन्न करपात्र नसते किंवा त्यांना त्यांच्या उत्पन्नावर कर भरावा लागत नाही पण जेव्हा त्यांचा टीडीएस कर कापला जातो तेव्हा त्यांना त्याचा परतावा त्यावर्षीचे विवरणपत्र दाखल केल्यानंतर मिळतो. अनिवासी भारतीय जेव्हा एक घर विकून दुसरे घर घेतात तेव्हा त्यांना कर भरावा लागत नाही, जुन्या घराच्या विक्रीवर झालेल्या भांडवली नफ्यावर टीडीएस कर कापल्यामुळे त्यांची रोकड सुलभता कमी होते किंवा हा त्रास कमी करावयाचा असेल तर प्राप्तिकर अधिकाऱ्याकडून शून्य किंवा कमी टीडीएस कर कापण्याचे प्रमाणपत्र मिळू शकते.करदात्याने वरील व्यवहार केले असतील तर त्यांनी टीडीएस कर कापून तो सरकारकडे वेळेत जमा करून कायद्याचे अनुपालन करावे आणि व्याज आणि दंडापासून सुटका करून घ्यावी.