शारदा क्रॉपकेम लिमिटेड ही निर्यातप्रधान कंपनी प्रामुख्याने कृषी रसायने, औद्योगिक रसायने, कन्व्हेयर बेल्ट, रबर बेल्ट/शीट्स, रंग आणि रंग इंटरमीडिएट्ससारख्या गैरकृषी उत्पादनांचे उत्पादन करून जगभरातील विविध देशांमध्ये निर्यात करते. कंपनी युरोप, नाफ्टा, लॅटिन अमेरिका आणि उर्वरित जगभरच्या बाजारपेठांना सेवा पुरवते.
वितरण विस्तार
कंपनीच्या संपूर्ण कृषी रसायन वितरणासाठी ५२५ तृतीय-पक्ष (थर्ड पार्टी) वितरक तर पाचशेहून अधिक विक्री दल आहे. कंपनी जगभरातील ८० हून अधिक देशांमध्ये तिच्या ग्राहकांना सेवा देते.
कंपनीच्या व्यवसायाची विभागणी पुढीलप्रमाणे
१) कृषी रसायने: कंपनी बुरशीनाशक, तणनाशक आणि कीटकनाशक विभागांमध्ये फॉर्म्युलेशन आणि जेनेरिक सक्रिय घटकांचा पुरवठा करते. पुनर्विक्रीसाठी पूर्ण फॉर्म्युलेशन आणि जेनेरिक सक्रिय घटक मिळविण्यासाठी ती तृतीय-पक्ष उत्पादकांसोबत भागीदारीदेखील करते.
२) औद्योगिक रसायने: कंपनी बेल्ट, सामान्य रसायने, रंग आणि रंग इंटरमीडिएट्सची निर्मिती करते.
३) कन्व्हेयर बेल्ट्स: कंपनी विविध प्रकारचे कन्व्हेयर बेल्ट, व्ही-बेल्ट इत्यादींचा पुरवठा करते. हे बेल्ट प्रामुख्याने खाण प्रकल्पांमध्ये वापरले जातात. स्टील प्रकल्प, खाणी, सिमेंट उत्पादन सुविधा, बंदरे, बोगदे प्रकल्प इत्यादीं क्षेत्रात हे वापरले जातात.
महसूल मिश्रण: कृषी रसायने- ८७ टक्के इतर रसायने- १३ टक्के
कृषी रसायन विक्री मिश्रण:
तणनाशके: ५३ टक्के
बुरशीनाशके: २८ टक्के
कीटकनाशके: १९ टक्के
भौगोलिक विभाजन- २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी:
नाफ्टा प्रदेश: ३३ टक्के
युरोप: ५८ टक्के
लॅटिन अमेरिका: ५ टक्के
उर्वरित देश: ५ टक्के
ॲसेट लाइट मॉडेल
कंपनी सामान्य रेणू ओळखून, कागदपत्रे तयार करून त्याची नोंदणी करते. त्यानंतर विपणन आणि फॉर्म्युलेशन वितरित करून ॲसेट लाइट मॉडेलचे अनुसरण करते. ती सक्रिय घटकांचे उत्पादन आणि इतर फॉर्म्युलेशन आउटसोर्स करते, ज्यामुळे विविध भौगोलिक क्षेत्रांमध्ये किंमत स्पर्धात्मक ठेवता येते.
उत्पादन नोंदणी (आयपीआर)
आर्थिक वर्ष २४-२५ पर्यंत कंपनीने २,९६४ नोंदणी अर्थात आयपीआर मिळवल्या आहेत. याव्यतिरिक्त, जागतिक स्तरावर वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रलंबित नोंदणीसाठी कंपनीचे १,०१४ अर्ज प्रलंबित आहेत. कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या सहामाहीत १५५ कोटी रुपये उत्पादन नोंदणीवर खर्च केला होता. आगामी काळातदेखील भांडवली खर्च मार्गदर्शनासह उत्पादन नोंदणी वाढवण्याची योजना आहे.
शारदा क्रॉपकेमने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांचे निकाल नुकतेच जाहीर केले आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कंपनीने उलाढालीत ३७ टक्के वाढ साध्य करून ती ४,३२० कोटींवर नेली आहे तर नक्त नफ्यात तब्बल ११४ टक्के वाढ होऊन तो ६८२ कोटींवर पोहोचला आहे. यंदाच्या तिमाहीत कंपनीने १,८२९ कोटी उलाढाल (३९ टक्के वाढ) करून २०४ कोटींचा नक्त नफा कमवला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो ४२ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या सहामाहीत १५५ कोटी रुपये उत्पादन नोंदणीवर खर्च केला होता. आगामी काळातदेखील भांडवली खर्च मार्गदर्शनासह उत्पादन नोंदणी वाढवण्याची योजना आहे.
अनुभवी प्रवर्तक आणि कुठेलही कर्ज नसलेली ही कंपनी गुंतवणुकीस आकर्षक वाटत असली तरी येथे दोन धोके लक्षात घेणे जरुरी आहे. कंपनीला लागणारा कच्चा माल हा बहुतांशी चीनमधून आयात केला जातो. तसेच ही निर्यातप्रधान कंपनी असल्याने चलनातील चढ-उतारदेखील कंपनीच्या नफ्यावर परिणाम करू शकतात. सध्या ७२५ रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर एक उत्तम दीर्घकालीन गुंतवणूक ठरू शकेल.
शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
शारदा क्रॉपकेम लिमिटेड (बीएसई कोड ५३८६६६)
संकेतस्थळ : www.shardacropchem.com
प्रवर्तक: रामप्रकाश बूबना
बाजारभाव: रु. ७३८/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: कृषी रसायने
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ९०.२२ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ७४.८२
परदेशी गुंतवणूकदार ४.६९
बँक / म्युच्युअल फंड / सरकार १०.२८
इतर/ जनता १०.२१
पुस्तकी मूल्य: रु. २७७
दर्शनी मूल्य: रु. १०/-
लाभांश: ३०%
प्रति समभाग उत्पन्न: रु. ३३.७
किंमत उत्पन्न गुणोत्तर: २१.९
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३४.७
डेट इक्विटी गुणोत्तर: ०
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: १८०
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लाॅइड (आरओसीई): १६%
बीटा: १
बाजार भांडवल: रु. ६६५९ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ८८७/३४५
गुंतवणूक कालावधी : २४ महिने
अजय वाळिंबे
Stocksandwealth@gmail.com
• हा लेख गुंतवणूक सल्ला नव्हे तर अभ्यासपूर्ण विवेचन आहे.
• प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
• लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.