भेट देणे आणि स्वीकारणे हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. लग्न असो, वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो, नवीन घर खरेदी असो, दिवाळी, होळी, असे सण असो किंवा कोणताही आनंदाचा क्षण असो, भेटी दिल्या किंवा स्वीकारल्याशिवाय असे प्रसंग साजरे होत नाहीत. अशा भेटी देण्याचा आणि घेण्याचा आणि प्राप्तिकर कायद्याचा काय संबंध? यावर प्राप्तिकर भरावा लागतो का? प्राप्तिकर कायद्यानुसार या भेटींकडे कसे बघितले जाते? कोणत्या भेटी करपात्र आहेत आणि कोणत्या करमुक्त? या प्रश्नांची उत्तरे या लेखात आहेत.
पूर्वी ‘गिफ्ट टॅक्स कायदा १९५८’ हा स्वतंत्र कायदा अस्तित्त्वात होता. या कायद्यानुसार भेटींवर कर आकारला जात होता. हा कायदा १९९८ मध्ये रद्द करण्यात आला. त्यानंतर या कायद्यातील तरतुदी प्राप्तिकर कायद्यात २००५ सालापासून आणण्यात आल्या. प्राप्तिकर कायद्यानुसार कोणत्याही मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्याने संपत्तीची देवाण- घेवाण करणे म्हणजे भेट म्हणून समजली जाते. ज्या व्यक्तीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपत्ती दुसऱ्याच्या नावाने मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्याने हस्तांतरित केली तर त्यावर प्राप्तिकर आकारला जाऊ शकतो. या व्यवहारांच्या संज्ञेमध्ये वेळोवेळी अर्थसंकल्पाद्वारे बदल करण्यात आला. भेटींचे काही व्यवहार अवैध रीत्तीने करदाइत्व कमी करण्यासाठीसुद्धा वापरले जाऊ शकतात. भेटीद्वारे दुसऱ्याच्या नावाने संपत्ती हस्तांतरित करून आपले करदाइत्व कमी करणाऱ्या व्यवहारांवर आळा घालण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात काही तरतुदी आहेत.
हेही वाचा – तुम्ही ‘अर्थसाक्षर’ आहात?
कोणत्या भेटी करपात्र :
प्राप्तिकर कायदा कलम ५६ नुसार मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्यात हस्तांतरित केलेली संपत्ती हे संपत्ती स्वीकारणाऱ्याला “इतर उत्पन्न” या उत्पन्नाच्या स्रोताखाली करपात्र आहे. यासाठी संपत्तीचे प्रामुख्याने तीन प्रकारात विभाजन केले आहे. रोख स्वरुपात, स्थावर मालमत्तेच्या स्वरुपात आणि जंगम मालमत्तेच्या स्वरुपात. या प्रकारानुसार त्याची करपात्रता ठरविली जाते.
१. भेट रोखीने मिळाल्यास : रोखीने मिळालेल्या भेटीची एकूण रक्कम ५०,००० रुपयांपेक्षा कमी असेल तर ती करपात्र उत्पन्नात गणली जात नाही. ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम रोखीने मिळाल्यास संपूर्ण रक्कम करपात्र उत्पन्नात गणली जाते. उदा. एखाद्याला ४५,००० रुपये रोख रक्कम एका किंवा जास्त व्यक्तींकडून एका वर्षात मिळाली असेल तर ती रक्कम करपात्र असणार नाही. जर त्याला ५१,००० रुपये रोख रक्कम एका किंवा जास्त व्यक्तींकडून एका वर्षात मिळाली असेल तर त्याला मिळालेली संपूर्ण रक्कम ५१,००० रुपये त्याच्या करपात्र उत्पन्नात गणली जाईल. याला काही अपवाद आहेत.
२. भेट स्थावर मालमत्तेच्या स्वरुपात मिळाल्यास : मालमत्ता कोणत्याही मोबदल्याशिवाय मिळाल्यास आणि मुद्रांक शुल्काच्या मुल्यांकनानुसार मूल्य ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर संपूर्ण मूल्य करपात्र आहे. मालमत्ता अपुऱ्या मोबदल्यात मिळाली असेल आणि मुद्रांक शुल्काच्या मुल्यांकनानुसार असणारे मूल्य हे मोबदल्यापेक्षा (अ) ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल आणि (ब) मोबदल्याच्या १०% किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर या फरकाएवढी (“अ” आणि “ब” मधील जी जास्त रक्कम आहे ती) रक्कम उत्पन्नात गणली जाते. उदा. घर खरेदी करताना त्याचे करार मूल्य ४० लाख रुपये आहे आणि मुद्रांक शुल्कानुसार बाजारमूल्य ५० लाख रुपये असल्यास यामधील फरक, १० लाख रुपये, हा १०% पेक्षा जास्त असल्यामुळे हे १० लाख रुपये घर खरेदी करणाऱ्याच्या “इतर उत्पन्न” या सदरात गणले जाईल आणि त्यावर त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागेल.
३. भेट जंगम मालमत्तेच्या स्वरुपात मिळाल्यास : ठराविक जंगम मालमत्ता कोणत्याही मोबदल्याशिवाय मिळाल्यास आणि त्याचे वाजवी बाजार मूल्य ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर संपूर्ण मूल्य करपात्र आहे. मालमत्ता अपुऱ्या मोबदल्यात मिळाली असेल आणि मोबदला हा वाजवी बाजार मूल्यापेक्षा कमी असेल आणि हा फरक ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर या फरकाएवढी रक्कम उत्पन्नात गणली जाते. ठराविक जंगम मालमत्तेमध्ये समभाग, रोखे, सोने, चांदी, दागिने, चित्रे, शिल्प, वगैरेचा समावेश होतो. याव्यतिरिक्त जंगम मालमत्ता उदा. गाडी, कपडे, रोजच्या वापरातील वस्तू याचा समावेश ठराविक संपत्तीच्या व्याख्येत येत नसल्यामुळे याची भेट मिळाल्यास ती करपात्र नाही.
निवासी भारतीयाने अनिवासी भारतीयाला मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्यात पैसे, भारतात असलेली स्थावर मालमत्ता किंवा ठराविक जंगम मालमत्ता हस्तांतरित केल्यास असे उत्पन्न भारतात जमा झालेले किंवा स्वीकारलेले उत्पन्न म्हणून समजले जाते. भारतात जमा झालेले किंवा स्वीकारलेले उत्पन्न अनिवासी भारतीयांना भारतात करपात्र आहे.
कोणत्या भेटी करमुक्त :
सर्वच भेटी करपात्र नाहीत. याला काही अपवाद आहेत. यात प्रामुख्याने भेट कोणाकडून मिळाली आणि कोणत्या प्रसंगात किंवा कोणत्या निमित्ताने मिळाली यानुसार त्या भेटी करमुक्त आहेत का हे ठरते.
१. भेट कोणाकडून मिळाली : कोणतीही संपत्ती खालील व्यक्तींकडून मिळाल्यास त्या करपात्र उत्पन्नात गणल्या जात नाहीत.
अ. या भेटी (रोख, स्थावर किंवा जंगम मालमत्तेच्या स्वरुपात) ठराविक नातेवाईकांकडून मिळाल्यास त्या करपात्र उत्पन्नात गणल्या जात नाहीत. या रकमेला कोणतीही मर्यादा नाही, ठराविक नातेवाईकांमध्ये पती/पत्नी, आई/वडील, भाऊ/बहिण, पती किंवा पत्नीचा भाऊ किंवा बहिण (आणि त्यांचे पती/पत्नी), आई किंवा वडिलांचा भाऊ किंवा बहिण (आणि त्यांचे पती/पत्नी) आणि वंशपरंपरेतील व्यक्ती यांचा समावेश होतो.
आ. स्थानिक संस्थेकडून मिळालेली मदत,
इ. विद्यापीठ, शैक्षणिक संस्था, इस्पितळ किंवा वैद्यकीय संस्थेकडून मिळालेली मदत,
ई. नोंदणीकृत धर्मादाय संस्थेकडून मिळालेली मदत,
उ. हिंदू अविभक्त कुटुंब (एच.यु.एफ) च्या विभाजानानातर मिळालेली संपत्ती.
२. भेट कोणत्या प्रसंगात मिळाली : भेट कोणत्या प्रसंगात किंवा निमित्ताने मिळाली यावरसुद्धा त्याची करपात्रता अवलंबून आहे. खालील प्रसंगात मिळालेल्या भेट करमुक्त आहेत.
अ. लग्नात मिळालेल्या भेटी : ज्या व्यक्तीला त्याच्या लग्नप्रसंगात भेटी मिळाल्या असतील तर त्या करपात्र नसतील. या भेटी ठराविक नातेवाईकांकडून किंवा इतरांकडून मिळाल्या असल्या तरी करमुक्त असतील. काही लग्नप्रसंगात वधु-वरांना तर भेटी देतातच शिवाय त्याच्या आई वडिलांनासुद्धा भेटी देण्याची प्रथा आहे. मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नप्रसंगात त्यांच्या पालकाला मिळालेल्या भेटी मात्र करमुक्त नाहीत. ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम भेट म्हणून मिळाल्यास संपूर्ण रक्कम करपात्र उत्पन्नात गणली जाईल.
आ. वारसाहक्काने किंवा मृत्यूपत्राद्वारे मिळालेली रक्कम : एखाद्या करदात्याला वारसाहक्काने किंवा मृत्यूपत्राद्वारे कोणतीही संपत्ती मिळाल्यास ती मिळालेली संपत्ती करपात्र उत्पन्नात गणली जात नाही. परंतु त्या संपत्तीतून किंवा ती संपत्ती गुंतवून त्यावर मिळणारे उत्पन्न मात्र करपात्र असेल.
हेही वाचा – वित्तरंजन: वायदे बाजार (फ्युचर्स आणि ऑप्शन्स मार्केट) भाग २
भेटी देताना किंवा स्वीकारताना घ्यावयाची काळजी :
करदात्याने त्याला मिळालेल्या भेटींची योग्य नोंद करणे गरजेचे आहे. स्थावर मालमत्ता (घर, जमीन) मुद्रांक शुल्कानुसार मूल्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करताना विशेष काळजी घेतली पाहिजे. करार मूल्य आणि मुद्रांक शुल्कानुसार बाजारमूल्य यामधील फरक १० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास ही फरकाची रक्कम ‘इतर उत्पन्न’ म्हणून गणली जाते. ही विवरणपत्रात दाखवून त्यावर कर न भरल्यास पुढे व्याज व दंड भरावा लागू शकतो.
ठरावीक नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटी जरी करमुक्त असल्यातरी काही नातेवाईकांना दिलेल्या भेटीतून मिळालेले उत्पन्न हे भेट देणाऱ्याचे उत्पन्न समजले जाते. उदाहरणार्थ पतीने पत्नीला किंवा पत्नीने पतीला किंवा पालकाने अजाण (१८ वर्षांखालील) मुलांना दिलेली भेट करमुक्त आहे. परंतु या भेट संपत्तीतून मिळालेले उत्पन्न हे भेट देणाऱ्यालाच करपात्र आहे. करनियोजन करताना याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
pravindeshpande1966@gmail.com