रणजित कुलकर्णी
प्रत्येक गुंतवणूक पर्यायांची गुणवैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. आपल्या गरजेनुरूप गुंतवणूक करणे आवश्यक असते. कोणत्याही गुंतवणूक पर्यायामध्ये दीर्घकालीन टिकून राहिले पाहिजे. कोणती योजना चांगली आणि कोणती वाईट, हा प्रश्न चुकीचाच आहे. तेव्हा कोणतीही एक गुंतवणूक ही दुसरीला पर्याय नसून त्या परस्पर पूरक असतात.

प्रत्येक वस्तूंची गुणवैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. म्हणजेच आपण सफरचंद आणि मोसंबीची तुलना करू शकत नाही. जरी सफरचंद किंवा मोसंबी ही दोन्ही फळेच असली तरी त्यांची गुणधर्म वैशिष्ट्ये ही वेगवेगळी आहेत. त्याचप्रमाणे गुंतवणुकीमध्ये निरनिराळ्या प्रकारांची एकमेकांशी तुलनाही होऊ शकत नाही. उदा. म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्स यांची सततची तुलना ही वृथा आहे.

प्रत्येकाची वैशिष्ट्ये ही निरनिराळी कशी असतात, हे एका उदाहरणाने सांगतो. यामध्ये त्यांची तुलना करणे हा हेतू नसून प्रत्येकामध्ये असलेल्या अनोख्या तरतुदींचा फायदा हा कसा घेता येऊ शकतो किंवा मिळवता येतो याचे उदाहरण म्हणून बघावे. भविष्य निर्वाह निधी अर्थात ‘पब्लिक प्रॉव्हिडंट फंड’ ही एक अतिशय उत्तम आणि लोकप्रिय योजना आहे, ज्यामध्ये मिळणारे व्याज हे करमुक्त असते. शिवाय वर्षाला १.५ लाख रुपयांपर्यंच्या रकमेचा त्यात भरणा येतो. अर्थात यात काही अटी-शर्ती आहेत, जसे अनिवासी भारतीयांना इथे गुंतवणूक करता येत नाही किंवा लहान मुलांना खात्यावर काही मर्यादा आहेत. मात्र यापेक्षा एक महत्त्वाचा मुद्दा जो अनेकदा लक्षात येत नाही, तो असा की ‘पीपीएफ’मध्ये दरवर्षी गुंतवणूक करावी लागते. जर काही कारणाने वर्ष-दोन वर्षे गुंतवणूक करता आली नाही तर फक्त खाते चालू ठेवण्याकरिता पाचशे रुपये भरून घेतात. संपूर्ण १.५ लाख रुपयांची रक्कम भरता येत नाही म्हणजेच १५-२० वर्षांनंतर जी मोठी रक्कम आपल्याला मिळणे अपेक्षित आहे, ती होणार नाही. तसेच व्याज जमा तारखेपासून दिले जात असल्यामुळे अनेकदा मार्चअखेरीस भरलेल्या रकमेवर व्याज कमी पडते आणि या सर्वाचा परिणाम म्हणजे १५ किंवा २० वर्षांनंतर जी रक्कम अपेक्षित आहे, ती न येता त्यात बरीच तूट आढळून येते. आयुर्विमा पॉलिसी काही कारणामुळे हप्ता न भरला गेल्यास मागील काही हप्ते दंडासहित भरून घेतले जातात. शिवाय त्या वेळचा बोनसही त्या वेळी जमा होतो. त्यामुळे शेवटी मिळणाऱ्या रकमेवर फरक पडत नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे. या ठिकाणी उद्देश हा ‘पीपीएफ’ आणि आयुर्विमा यांची तुलना करण्याचा नसून त्यांचे फायदे व मर्यादा समजून घेण्याचा आहे.

म्युच्युअल फंड हा सध्याचा अतिशय लोकप्रिय प्रकार त्यातली जोखीम जणू सगळे विसरूनच गेले आहेत. गुंतवणूकदार किती वर्षे टिकून राहतो यावरच परतावा अवलंबून असतो. चक्रवाढ व्याजाचे तत्त्व. गुंतवणुकीलाच काय तर सर्वच ठिकाणी लागू होते. म्युच्युअल फंडामध्ये तीन ते पाच वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूकदार टिकून राहू शकत नाही, याची कारणे अनेक सर्वप्रथम बहुतेक लोकांकडे आर्थिक शिस्त नसते आणि प्रलोभनांना बळी पडून अनेक अनावश्यक खर्चांवर पैसे खर्च करताना ते गुंतवणूक मोडतात. कधी घसरत्या बाजाराला घाबरून तोटा कमी व्हावा म्हणून पैसे काढून घेऊन गुंतवणूक थांबवली जाते. तर कधी चढत्या बाजाराचा फायदा घ्यावा म्हणून मोह होतो. पर्यायी परत गुंतवणूक काढून घेतली जाते. आपण अनेकदा बातम्या वाचतो की, अमुक फंडात अथवा एखाद्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असती तर २५ वर्षांनी आज त्याचे इतके कोटी झाले असते वगैरे. पण या गुंतवणुकीत सातत्याने १५-२० २५ वर्षे किंवा त्याहूनही अधिक वर्षे टिकून राहिलेला गुंतवणूकदार अपवादानेच दिसून येतो. याउलट विमा कंपन्या, तसेच वेगवेगळ्या पोस्ट ऑफिसच्या योजना, बँकांच्या ठेवी यामध्ये कोट्यवधी लोकांनी अनेक वर्षे गुंतवणूक केलेली आहे. अर्थात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करूच नये असे नाही. पण जेव्हा आपण गुंतवणूक पर्यायांची तुलना करतो तेव्हा एकाऐवजी दुसरा असा विचार योग्य नसतो तर सर्व प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक प्रमाणशीर करणे आवश्यक आहे.

याशिवाय विमा योजनांचा विचार गुंतवणूक म्हणून करताना एक महत्त्वाचा फरक लक्षात घेतला पाहिजे. तो म्हणजे विमा योजना या आजचा व्याजदर देत नसून भविष्यातील व्याजदराची खात्री देत आहेत. हा अतिशय संवेदनशील असा विषय अनेकदा सर्वसामान्य गुंतवणूकदाराच्या लक्षात येत नाही. गुंतवणूकदार सध्याचे बाजारातील इतर पर्याय आणि विमा यांची तुलना करत बसतो. याची दोन उदाहरणे या ठिकाणी देतो, म्हणजे हा फरक आपल्या लक्षात येईल. भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ने त्यांच्या दोन विमा योजना जीवन श्री आणि जीवन सुरक्षा या वर्ष २००१ मध्ये बंद केल्या. साधारणपणे ९.५० टक्के परताव्याची हमी आणि हमखास बोनस आणि लॉयल्टी या योजनांमध्ये दिली होती. त्या काळात बँक, पोस्ट ऑफिस इत्यादी व्याजदर १२ ते १४ टक्क्यांच्या दरम्यान होते. इतकेच काय तर युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ही अतिशय भरात होती. पुढे त्याचे काय झाले, हे सर्वांनाच माहिती आहे. पण आज मात्र २५ वर्षांच्या जीवन श्रीची रक्कम विमेदाराला येते, तेव्हा बाजारातले व्याजदर हे ६.५ टक्केही नाहीत आणि लक्षात घ्या की, जीवन श्रीची रक्कम ९.५० टक्के दराने करमुक्त आहे. असो, परत काहीजण त्या वेळी जर हे पैसे शेअर बाजारात गुंतवले असते किंवा या अमुक कंपनीचा शेअर घेतला असता तर किती झाले असते, याचे गणित सांगतील. मात्र त्याऐवजी दुसऱ्या कंपनीचा शेअर घेतला असता तर कदाचित शून्य झाले असते, हे मात्र कोणी सांगणार नाही. तेव्हा ‘ॲक्च्युरिअल सायन्स’द्वारे घेतलेला भविष्याच्या गुंतवणुकीचा वेध हा विमा योजनांच्या सफलतेचे मूळ आहे. तसेच दुसरी योजना जीवन सुरक्षा ही तर निवृत्तीशी संबधित योजना होती आणि त्या काळी ८०सीसी(I) या प्राप्तिकर कलमाखाली १०,००० रुपये इतक्या रकमेची उत्पन्नातून वजावट मिळत असे. नंतर ते कलम रद्द झाले आणि ती योजनाही बंद झाली.

सदर लेखकाने केलेल्या अभ्यासात २०० लोकांच्या मुलाखतीनंतर असे दिसून आले की विमा एजंट आणि विमेदार दोघेही सदर योजनेचा फक्त प्राप्तिकर सवलत एवढाच विचार करताना आढळले. त्यातील विमा हा हमखास बोनस पेन्शन हमी या कुठल्याही गोष्टीचा विचार दोघांपैकी कोणीही केला नाही. तीस वर्षे वयाच्या माणसाने २५ वर्षांकरिता दरवर्षी १०,००० रुपये एवढी रक्कम भरली तर वयाच्या ५५ वर्षांपासून त्याला दरमहा १०,००० रुपये एवढे तहहयात निवृत्तिवेतन म्हणून ही योजना देत होती. इतकेच काय तर मृत्यूपश्चात ७.५० लाखही वारसाला परत मिळणार होते. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, हा विचार ना विक्रेत्यांनी केला नाही ग्राहकांनी. आता तुम्ही नक्कीच म्हणाल की, अशा योजना आता नाहीत. गृहनिर्माण क्षेत्रामध्ये गुंतवणूक करतानाही असेच वाटते की, तेव्हाच घ्यायला हवे होते. मात्र संधी निरनिराळ्या ठिकाणी आजही असते कदाचित थोडे लांब जावे लागेल, पण त्या तोडीची संधी मिळणार नाही असे नाही. फक्त आपण डोळसपणे विचार केला पाहिजे आणि गुंतवणुकीमध्ये टिकून राहिले पाहिजे. कोणती योजना चांगली आणि कोणती वाईट, हा प्रश्न चुकीचाच आहे. तेव्हा कोणतीही एक गुंतवणूक ही दुसरीला पर्याय नसून त्या परस्पर पूरक ठरतात. खरे तर, आपल्या आर्थिक प्रवासात प्रत्येक योजनेची एक विशिष्ट भूमिका असते. ती भूमिका किती चपखलपणे बजावली जाते, हेच यशाचे खरे मोजमाप आहे.