तुमच्या बचतीचे म्हणजेच ठेवी, एफडी, आरडी वगैरेचे कोठार म्हणजे बँका. अगदी तसेच तुमच्या वेगवेगळ्या गुंतवणुकांचे जसे शेअर्स, रोखे/ बॉण्ड्स, ईटीएफचा अंबारखाना म्हणजे डिपॉझिटरी. गुंतवणूकदारांच्या वतीने रोख्यांचे डिजिटल किंवा कागदरहित (डीमटेरिअलाइज्ड) स्वरूपात जतन करण्याचे काम या डिपॉझिटरी करतात. यातील देशातील सर्वात जुनी आणि आकारानेही मोठी असलेली डिपॉझिटरी प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर येत्या दोन दिवसांत (३० जुलैपासून) गुंतवणूकदारांना आजमावणाऱ्या परीक्षेतून जात आहे. या निमित्ताने आपण तिच्या शेअर्समध्ये पैसा घालावा किंवा कसे, त्याचा वेध घेऊ.
बँका आजच्या घडीला अनेक, पण भारतात रोखे आगार अर्थात डिपॉझिटरी सध्या तरी दोनच. त्या म्हणजे – सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) आणि दुसरी, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल). दोन्ही परस्परांच्या स्पर्धक आणि यातील पहिलीने म्हणजेच सीडीएसएलने खूप आधीच बाजारात शेअर सूचिबद्ध करून, प्रथम पदार्पणाचा फायदा मिळविला आहे. आता एनएसडीएलनेदेखील खुली समभाग विक्री (आयपीओ) प्रस्तावित केली आहे. या कारणाने स्वाभाविकच दोहोंमध्ये तुलना होणार. दोहोंमध्ये कुणाचे पारडे जड हे पाहणे गुंतवणूकदारांसाठीही मोलाचे ठरेल.
डिपॉझिटरीजचे कार्य आणि भूमिका
पण अशी तुलना करताना, दोहोंचे कार्य आणि भूमिकाही लक्षात घ्यायला हवी. भौतिक रूपातील कागदी शेअर प्रमाणपत्रांचे इलेक्ट्रॉनिक रूपातील परिवर्तन म्हणजेच डीमटेरिअलायझेशन (डीमॅट) पर्व या दोन संस्थांनी नवीन सहस्रकाच्या उदयापूर्वी सुरू केले. एनएसडीएलने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) पुढाकारातून, तसेच आयडीबीआय बँक, स्टेट बँक, एचडीएफसी बँकेच्या सहयोगाने १९९६ साली सुरुवात केली. तर सीडीएसएलचा जन्म त्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या नेतृत्वात, काही बँका व एलआयसीच्या भागीदारीतून १९९९ साली झाला. आज नवगुंतवणूकदारांच्या कल्पनेतही नसतील, असे या डीमॅट पद्धतीने मोठे परिवर्तन त्यासमयी घडवून आणले. याचे अनेक प्रकारचे फायदे म्हणजे, एक तर शेअर प्रमाणपत्र गहाळ अथवा त्याचे नुकसान होऊ नये म्हणून ते सुरक्षितपणे सांभाळण्याच्या जबाबदारीपासून गुंतवणूकदार नाममात्र वार्षिक शुल्क भरून मोकळे झाले. दुसरा फायदा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून तुमच्या गुंतवणुकीत असलेल्या समभाग, रोख्यांचा पडताळा शक्य बनला. इतकेच नाही तर, त्यांचे ऑनलाइन व्यवहारही सुलभ बनले. सध्याच्या गुंतवणूक संस्कृतीत ‘ऑनलाइन ट्रेडिंग’ हा अभिन्न भाग बनला त्याचा पाया या संस्थांकडून असा घातला गेला.
भांडवली बाजाराच्या भक्कम स्तंभ असलेल्या या संस्थांची कामे एकसारखीच असली तरी त्यांचे व्यवसाय प्रारूप, आर्थिक स्थिती आणि दोहोंनी राखलेले गुंतवणूकदारांचे मोहोळ बरेच वेगळे आहे. एनएसडीएलकडून सध्या (३० जून २०२५) ४.०४ कोटींहून अधिक सक्रिय ग्राहक खात्यांचे व्यवस्थापन केले जात आहे. ती २९,८०० हून अधिक कंपन्यांना सेवा देते. एनएसडीएलच्या ताब्यात असलेल्या गुंतवणूकदारांच्या रोख्यांचे एकूण मूल्य ५१०.९१ लाख कोटी रुपये किंवा अंदाजे ५.९७ ट्रिलियन अमेरिकी डॉलर इतके आहे. दुसरीकडे, १५.८६ कोटींहून अधिक खात्यांसह, किरकोळ गुंतवणूकदार बाजारपेठेवर सीडीएसएलचे वर्चस्व आहे. डिजिटल गुंतवणूक करणारे प्रत्येक चारपैकी तिघे सीडीएसएलशी संलग्न आहेत. मात्र ताब्यात असलेल्या डीमॅट रोख्यांचे एकत्रित मूल्य तुलनेने खूप कमी म्हणजे ७.९२ लाख कोटी रुपये आहे. त्यामुळे प्रति खाते मालमत्तेबाबत दोहोंमध्ये ५ लाख रुपये विरुद्ध सव्वा कोटी रुपये इतकी प्रचंड मोठी तफावत आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये, एनएसडीएलचा निव्वळ नफा २४.६ टक्क्यांनी वाढून ३४३ कोटी रुपये झाला आणि एकूण उत्पन्न १,५३५ कोटी रुपये झाले, जे आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या तुलनेत १२.४ टक्क्यांनी अधिक आहे. सरलेल्या तिमाहीत तिचा निव्वळ नफा वार्षिक तुलनेत ५ टक्क्यांनी वाढून ८३.३ कोटी रुपये झाला, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ७९.५ कोटी रुपये होता. त्याउलट सीडीएसएलने मार्च २०२५ तिमाहीत निव्वळ नफा काहीसा जास्त म्हणजे १०० कोटी रुपये नोंदविला असला, तरी तो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील १२९ कोटी रुपयांच्या तुलनेत तो २२.४ टक्क्यांनी घटला आहे.
दोहोंमधील महत्त्वाची तफावत म्हणजे सीडीएसएलचा ग्राहक हा मुख्यतः किरकोळ (रिटेल) गुंतवणूकदार आहे, तर एनएसडीएलकडे संस्थात्मक ग्राहकांचा बराच राबता आहे. अलीकडच्या बाजारातील अनिश्चित चढ-उतारांनी नवीन गुंतवणूकदारांचा प्रवाह आणि डिमॅट खाती उघडली जाण्याची गती मंदावल्याचे प्रतिबिंब सीडीएसएलच्या तिमाही कामगिरीतही उमटले आहे. क्रिसिलच्या अहवालानुसार, वरील पैलूसह अनेक प्रमुख बाबींमध्ये एनएसडीएल ही सीडीएसएलपेक्षा आघाडीवर आहे. नोंदणीकृत कंपन्यांची संख्या असो, सक्रिय वित्तीय साधनांची संख्या असो किंवा ताब्यात असलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य असो, एनएसडीएलकडे सुस्पष्ट आघाडी आहे. अर्थात किरकोळ आणि संस्थात्मक, दोन्ही प्रकारच्या ग्राहकांत सध्या भरभराटीचा काळ सुरू आहे. सीडीएसएलने वार्षिक सरासरी ४० टक्क्यांहून अधिक चक्रवाढ परतावा भागधारकांना दिला आहे. म्हणजेच ८ वर्षांत तब्बल १२३० टक्के. डिपॉझिटरी क्षेत्राबाबत एकंदर गुंतवणूकदारांना प्रचंड मोठे रस असल्याचेच हे द्योतक!
sachin.rohekar@expressindia.com