Stock Market Update : गेल्या कित्येक दिवसांपासून शेअर बाजारात घसरण चालू होती. यामुळे बहुसंख्य गुंतवणूकदारांचं नुकसान झालं आहे. अशातच आज (१८ मार्च) अचानक सेन्सेक्सने उसळी घेतली. यासह सेन्सेक्स ७५,००० अंकांच्या पुढे गेला आहे. सकाळी बाजार उघडल्यानंतर काही वेळ धिम्या गतीने पुढे सरकणाऱ्या सेन्सेक्सने अचानक मोठी उडी घेतली. सकाळी साडेदहा वाजता सेन्सेक्स ७५,००० च्या पुढे व्यवहार करत होता. तर निफ्टी २५२ अंकांनी म्हणजेच १.४ टक्क्यांनी वाढून २२,७६३ वर व्यवहार करत आहे. सेन्सेक्स १.२ टक्के म्हणजेच ८९४ अंकांनी वधारला असून ७५,०५६ वर व्यवहार करताना दिसतोय. बँक निफ्टी ६५५ अंकांनी म्हणजेच १.३६ टक्क्यांनी वाढून ४९,०१२ वर व्यवहार करत आहे.

१७ मार्च रोजी अमेरिकन बाजारात तेजी पाहायला मिळाली. त्याचाच भारतीय बाजारावर परिणाम दिसत आहे. आशिया खंडातील अनेक शेअर बाजारांवर त्याचा अनुकूल परिणाम झाला असून अनेक ठिकाणी तेजी पाहायला मिळत आहे. भारतीय बाजारात सेन्सेक्स व निफ्टीने सकाळपासूनच हिरवा झेंडा हाती घेतल्याचं पाहायला मिळालं. चांगल्या खरेदीमुळे सेन्सेक्सला जणू पंख फुटले आणि निर्देशांक थेट ७५,००० च्या पुढे गेला. चीनमधील शेअर बाजारने देखील हिरवं निशाण फडकावलं आहे. अनेक दिवसांनंतर सेन्सेक्सने लाल निशाण फडकावलं नाही हे पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला.

चीनमधील बाजाराचा प्रभाव

चीनमध्ये मदत निधी मिळण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तिथल्या जिनपिंग सरकारने अपेक्षित निधी जाहीर केल्यास त्याचा स्टीलसह अनेक क्षेत्रातील कंपन्यांवर चांगला परिणाम दिसू लागला आहे. तत्पूर्वी १८ मार्च रोजी पोलाद कंपन्यांच्या समभागात वाढ झाली आहे. तसेच बहुतांश आशियायी बाजारांमध्ये तेजी दिसून आली.

रुपयाची मजबुती

दुसऱ्या बाजूला डॉलरच्या तुलनेत रुपयाची पडझड चालू होती ती देखील अलीकडेच थांबली आहे. १८ मार्च रोजी रुपया डॉलरच्या तुलनेत मजबुतीने उभा राहिला. चार पैशांनी किंमत वाढल्याचा शेअर बाजारावर हलका प्रभाव दिसून आला. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत सध्या ८६.७६ रुपये इतकी आहे. रुपयाच्या मजबुतीमुळे आयातीवरील खर्च कमी होईल. याचा अनेक क्षेत्रांमधील कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एचडीएफसी सिक्योरिटीजचे देवर्ष वकील म्हणाले, फेब्रुवारीमधील अमेरिकेतील किरकोळ विक्रीच्या आकडेवारीने गुंतवणूकदार उत्साहित आहेत. फेब्रुवारीत त्यात ०.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारीत ०.९ टक्के घसरण झाली होती.