Shrikant Badve Enters Billionaire Club: शेअर बाजारात लिस्टिंग झाल्यापासून कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत असल्याने, बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रमोटर आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे यांनी अधिकृतपणे अब्जाधीशांच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या कंपनीचा शेअर २८ मे २०२५ रोजी बाजारात ९० रुपयांच्या इश्यू किमतीवर लिस्ट झाला होता. तेव्हापासून कंपनीच्या शेअर्समध्ये ८३ टक्क्यांनी वाढ झाली असून ते आता १६६ रुपये प्रति शेअर या सर्वकालीन उच्चांकावर व्यवहार करत आहेत.
५३ कोटी शेअर्सचे मालक

श्रीकांत बडवे यांचा बेलराईज इंडस्ट्रीजमध्ये ५९.५६ टक्के हिस्सा आहे. त्यांच्याकडे एकूण ५३ कोटी शेअर्स असून, याची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार ९,५५० कोटी रुपये आहे. श्रीकांत बडवे महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक सल्लागार परिषदेवर देखील काम करतात. याचबरोबर ते सचिन तेंडुलकर, माधुरी दीक्षित आणि शंकर महादेवन यांच्यासोबत मॅग्नेटिक महाराष्ट्र आणि मेक इन इंडियाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडरही आहेत.

तीन कर्मचाऱ्यांसह कंपनीची सुरुवात

कोणतीही औद्योगिक पार्श्वभूमी नसताना, श्रीकांत बडवे यांनी १९८८ मध्ये बेलराईज ग्रुपची स्थापना केली होती. फक्त तीन कामगारांसह एका छोट्या व्यवसायापासून सुरू झालेला हा ग्रुप आता भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह उत्पादन ब्रँडपैकी एक बनला आहे, ज्याची उलाढाल ७,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

याचबरोबर बेलराईज ग्रुपच्या कंपन्यांतून ८,००० हून अधिक लोकांना रोजगार मिळत आहे. हा ग्रुप देशभरात १७ हून अधिक उत्पादन युनिट्स चालवतो. यातून दुचाकी, तीन चाकी, चार चाकी, व्यावसायिक वाहने आणि अवजड वाहने यासाठी लागणाऱ्या सुट्या भागांचे उत्पादन केले जाते.

इलेक्ट्रिक आणि इंजिन वाहनांच्या सुट्या भागांची निर्मिती

बेलराईज इंडस्ट्रीज ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंगसाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या उत्पादनांमध्ये मेटल चेसी सिस्टम, पॉलिमर घटक, सस्पेंशन सिस्टम, बॉडी-इन-व्हाइट घटक आणि एक्झॉस्ट सिस्टम यांचा समावेश आहे. ही कंपनी इलेक्ट्रिक आणि इंजिन वाहन अशा दोन्ही प्रकारांसाठी सेवा पुरवते. त्यामुळे वाढत्या इलेक्ट्रिक वाहन बाजारात कंपनीची स्थिती भक्कम झाली आहे.