आशीष ठाकूर

ज्येष्ठ प्रतिभावंत कवयित्री शांताताई शेळके यांच्या एका कवितेत त्यांनी ‘आकाश व आभाळ’ असे दोन्ही शब्द वापरले आहेत. दोन्हींचा अर्थ पाहायला गेला तर एकच आहे. मग असे दोन वेगळे शब्द का? शांताताईंनी सांगितलं… पावसाळ्यात काळ्या ढगांनी भरून येते ते आभाळ, काळ्या ढगातून पाऊस बरसल्यानंतर, सूर्याचा कवडसा आल्यानंतर जे दिसतं ते निरभ्र आकाश. आकाश या शब्दातून निसर्गाची प्रसन्नता व्यक्त होते, तर आभाळ या शब्दातून भीती, उदासीनता व्यक्त होते. हा संदर्भ आताच्या घडीला आमच्या निर्देशांकाला / बाजाराला तंतोतंत लागू पडताना दिसतो.

international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
indian economy marathi news
UNCTAD: भारताची अर्थव्यवस्था २०२४ मध्ये किती टक्क्यांनी वाढणार? संयुक्त राष्ट्राचा अहवाल जाहीर; व्याजदराचाही उल्लेख!
BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…

आजच्या घडीला अमेरिका आणि पाश्चिमात्य राष्ट्रं ही महागाई अन् ती आटोक्यात यावी यासाठी व्याजदरात आक्रमकपणे वाढ करीत आहेत. चलनातील पैशाचा पुरवठा नियंत्रित व्हावा म्हणून ते आवश्यक आणि त्यातून होणारी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ ही पर्यायाने गरजूंना उपकारक ठरते. पण उद्योगधंद्यांना वाढीव दराने कर्ज जे अर्थव्यवस्थेच्या विकासाला मारक ठरते. अशा विविध आर्थिक समस्यांनी त्यांचे आर्थिक नभांगण / आभाळ काळ्या ढगांनी भरून आले आहे. तर आपल्याकडे निफ्टी आणि त्यातही विशेषतः बँक निफ्टीने नुकतीच नव्या उच्चांकाला गवसणी घालत, तेजीचा कवडसा दाखवत आपल्या इथे निर्देशांक निरभ्र आकाशात विहार करत असल्याचा प्रत्यय दिला आहे. या पार्श्वभूमीवर या आठवडयाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव : सेन्सेक्स : ६१,७९५.०४ / निफ्टी : १८,३४९.७०

या स्तंभातील २४ ऑक्टोबरच्या लेखात आता चालू असलेल्या तेजीचे सूतोवाच केलेले होते. त्या लेखातील वाक्य होते – ‘आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर १७,६०० हा महत्त्वाचा वळणबिंदू तर असणार आहेच, पण त्याचबरोबर तो महत्त्वाचा ‘कल निर्धारण स्तर’ देखील असणार आहे. त्यामुळे निफ्टी निर्देशांक १७,६००च्या स्तरावर सातत्याने १५ दिवस टिकल्यास, बाजारात ‘मंदीचे दिस संपून तेजीचे दिस सुरू’ झाल्याची खूणगाठ मारावी. या स्थितीत निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य १७,९०० … १८,२०० ते १८,५०० असेल’, या वाक्याची प्रत्यक्ष प्रचीती आपण आता घेत आहोत.

आता गुंतवणूकदारांनी निफ्टी निर्देशांकाचे १९,००० ते २०,००० चे वरचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करायचा प्रयत्न केला पाहिजे. या वाटचालीत हजार ते दीड हजार अंशांची अनपेक्षित घसरणीची मानसिक तयारीही हवी आणि ‘बडे बडे शहरों में छोटे छोटे हादसे होते है’ अशा स्वरूपातच ही घसरण असेल. आताच्या घडीला निफ्टी निर्देशांक एखाद्या हलक्याफुलक्या घसरणीत १७,८०० ते १८,००० चा स्तर राखत असल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य १८,६०० ते १८,९०० असेल.

‘शिंपल्यातील मोती’

‘निफ्टी, बँक निफ्टी तेजीच्या घरा तोची दिवाळी दसरा’ तेव्हा या सणासुदीच्या दिवसात गोडधोडाचे करायचे म्हटले तर मुख्य घटक साखर व साखरेचे उत्पादन करणारी कंपनी म्हणजे ‘श्री रेणुका शुगर लिमिटेड’ हा समभाग आपला आजचा ‘शिंपल्यातील मोती’असणार आहे.
रेणुका शुगर ही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर साखर, इथेनॉलचे उत्पादन करणारी कंपनी. कंपनीचे सात साखर कारखाने भारतात तर चार कारखाने ब्राझीलमध्ये आहेत व आताच्या घडीला कंपनीची सर्व उत्पादने ही ‘आजच्या काळाची गरज’ या वर्गात मोडतात. इंधन दरवाढीवर उतारा म्हणून इथेनॉलकडे बघितले जाते तर साखर ही नित्य उपयोगातील गरज म्हणून बघितली जाते. कंपनीची दमदार आर्थिक कामगिरी समभागाच्या बाजारभावावर परावर्तित होत आहे. आताच्या घडीला समभाग आपल्या १०० दिवसांची चलत सरासरी (मूव्हिंग ॲव्हरेज) जी ५१.८० रुपये, २०० दिवसांची चलत सरासरी ४७ रुपये आहे. या चलत सरासरीवर, समभागाचा भाव आहे. (शुक्रवारचा, ११ नोव्हेंबरचा बंद भाव ५४.६० रुपये आहे.)

येणाऱ्या दिवसात समभागाच्या किमतीच्या चढ-उताराचा परीघ (बँण्ड) हा ५३ रुपये ते ६० रुपये आहे. भविष्यात समभागाची किंमत ६२ रुपयांच्या स्तरावर पाच दिवस टिकल्यास, तसेच या स्तरावर उलाढालीचा (व्हॉल्युम) भरभक्कम आधार लाभल्यास, या समभागासाठी तेजीची नवीन दालन उघडत ६८ ते ७५ रुपयांचे अल्पमुदतीचे वरचे लक्ष्य असेल तर दीर्घमुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी ८५ ते १०० रुपयांचे वरचे लक्ष्य असेल. या गुंतवणुकीला ४६ रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा.समभागात जेव्हा मंदी येईल तेव्हा हा समभाग ५० ते ५३ रुपयांच्या दरम्यान गुंतवणूकयोग्य रक्कम एकदम न गुंतवता २० टक्क्यांच्या पाच तुकड्यात दीर्घ मुदतीकरिता खरेदी करावा.

महत्त्वाची सूचना : वरील समभागात लेखकाची स्वतःची, अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचे तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांच्या विचारार्थ सादर केलेले आहे.

निकालपूर्व विश्लेषण

१) अपोलो टायर लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- सोमवार, १४ नोव्हेंबर
११ नोव्हेंबरचा बंद भाव- २९०.३० रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- २९० रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून २९० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३२० रुपये, द्वितीय लक्ष्य ३४० रुपये
ब) निराशादायक निकाल: २९० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २७० रुपयांपर्यंत घसरण.

२) बायोकॉन लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- सोमवार,१४ नोव्हेंबर
११ नोव्हेंबरचा बंद भाव- २८१.०५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- २७० रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून २७० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३०० रुपये, द्वितीय लक्ष्य ३२५ रुपये
ब) निराशादायक निकाल: २७० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २५० रुपयांपर्यंत घसरण

३) सीईएससी लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- सोमवार,१४ नोव्हेंबर
११ नोव्हेंबरचा बंद भाव- ७५.३५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ८० रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ८० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १०० रुपये, द्वितीय लक्ष्य १२० रुपये
ब) निराशादायक निकाल : ८० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ६८ रुपयांपर्यंत घसरण.

४) ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- सोमवार,१४ नोव्हेंबर
११ नोव्हेंबरचा बंद भाव- १,७०८.४५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १,७०० रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १,७०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,८५०रुपये, द्वितीय लक्ष्य २,००० रुपये.
ब) निराशादायक निकाल : १,७०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,६०० रुपयांपर्यंत घसरण.

आशीष ठाकूर

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.