Zerodha Withdrawal Limits Explained By Nithin Kamath: झेरोधाचे सह-संस्थापक नितीन कामथ यांनी आज (४ नोव्हेंबर) गुंतवणूकदार आणि मुंबईस्थित आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध मालपाणी यांच्या सोशल मीडिया पोस्टला उत्तर दिले आहे. गुंतवणूकदार असलेल्या डॉ. अनिरुद्ध मालपाणी यांनी आरोप केला होता की, त्यांच्या झेरोधाच्या डिमॅट अकाउंटमध्ये मोठ्या प्रमाणात बॅलन्स असूनही ब्रोकिंग प्लॅटफॉर्म झेरोधा त्यांना पैसे काढण्यापासून रोखत आहे. डॉ. अनिरुद्ध मालपाणी यांनी एक्सवर केलेल्या या पोस्टमुळे गुंतवणूकदारांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.

डॉ. अनिरुद्ध मालपाणी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दावा केला होता की, त्यांच्या झेरोधाच्या डिमॅट अकाउंटमध्ये सुमारे ४२.९ कोटी रुपये विथड्रॉएबल बॅलन्स आहे. तरीही ते एका दिवसात ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढू शकत नाहीत. त्यांनी याचे वर्णन “घोटाळा” म्हणून केले आणि झेरोधा क्लायंटचे पैसे “फुकट” वापरत असल्याचा आरोप केला.

डॉ. अनिरुद्ध मालपाणी यांच्या या पोस्टमुळे अनेक गुंतवणूकदारांमध्ये याबाबत चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी असा प्रश्न उपस्थित केला की, क्लायंटचे पैसे आधीच सेटल झालेले असताना आणि बॅलन्स उपलब्ध असल्याचे दाखवत असतानाही ब्रोकर पैसे काढण्यावर मर्यादा घालू शकतात का?

नितीन कामथ यांचे आरोपांना उत्तर

आरोपाला प्रत्युत्तर देताना नितीन कामथ यांनी सांगितले की, पेमेंट रिक्वेस्टवर आधीच प्रक्रिया केली आहे आणि स्पष्ट केले की ५ कोटी रुपयांची रक्कम काढण्याची मर्यादा म्हणजे केवळ एक इंटर्नल रिव्ह्यू प्रक्रिया आहे. याचा पेमेंट विथड्राव्हल मर्यादेशी काहीही संबंध नाही. त्यांनी सांगितले की मोठ्या रक्कमेच्या विथड्राव्हलवर अतिरिक्त तपासणी आवश्यक असते, जी सर्व आर्थिक संस्थांमध्ये अवलंबली जाते.

डॉ. अनिरुद्ध मालपानी यांच्या आरोपांना उत्तर देणाऱ्या पोस्टमध्ये नितीन कामथ म्हणाले की, “नमस्कार डॉक्टर, तुमच्या पेमेंट रिक्वेस्टवर कालच प्रक्रिया करण्यात आली आहे. इतर सर्व वित्तीय सेवा कंपन्यांप्रमाणे आमच्या सिस्टमच्या आणि क्लायंट्सच्या सुरक्षेसाठी, आम्हाला क्लायंट्स पैसे काढतात तेव्हा काही तपासण्या कराव्या लागतात.”

“तुम्ही कल्पना करू शकता की, पैसे काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान असंख्य संभाव्य समस्या उद्भवू शकतात आणि एकदा पैसे दिले की, ते परत मिळवण्याचा कोणताही मार्ग आमच्याकडे नाही. म्हणूनच, ५ कोटी रुपये ही मर्यादा आहे”, असे कामथ पुढे म्हणाले.