बँकिंग क्षेत्रातील व्यापक संधींचा विचार करता, या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विविध पदांकरिता घेण्यात येणाऱ्या लेखी प्रवेशपरीक्षांद्वारे आणि त्यानंतर गटचर्चा, मुलाखतीद्वारे उमेदवारांची बँक नोकरीसाठी निवड केली जाते.  या परीक्षांचे स्वरूप नेमके कसे असते, हे जाणून घेऊयात..
देशातील बँकिंग संस्था अर्थव्यवस्थेसाठी वित्तवाहिन्या म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. देशाची आर्थिक आणि सामाजिक प्रगती प्रामुख्याने बँकिंग संस्थांच्या सक्षमतेवर अवलंबून असते, त्यामुळे कोणत्याही देशातील बँका, विमा कंपन्या व वित्तीय संस्थांना अनन्यसाधारण महत्त्व असते. बँकिंग संस्थांचे अर्थव्यवस्थेतील हे योगदान महत्त्वाचे तर आहेच, परंतु या क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या प्रचंड रोजगार संधीही  महत्त्वाच्या आहेत.
बँकिंग क्षेत्रातील उत्तम कॉर्पोरेट वातावरण, उत्तम व्यवसाय, वेळेवर वेतन आणि त्यासोबत इतर सेवा-सुविधा झाल्यामुळे बँकिंग क्षेत्र युवावर्गासाठी पर्वणी ठरत आहे. काही बँका नोकरभरती स्वत: करतात तर काही बँका आपल्यासाठी आवश्यक नोकरवर्ग इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन ‘आयबीपीएस’ या संस्थेद्वारे करतात. बँकिंग क्षेत्रामध्ये प्रवेश स्तरावर थेट स्पर्धा परीक्षांद्वारे नोकर भरतीची पद्धत सर्व स्तरांवर स्वीकारली गेली असून बँक क्लार्क, बँक प्रोबेशनरी ऑफिसर्स, स्पेशालिस्ट ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी, सहायक इत्यादी पदांच्या भरतीसाठी राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा परीक्षा घेऊन उत्तम मनुष्यबळ निवडण्याकडे बँकांचा कल दिसून येतो.
एमपीएससी, यूपीएससी, स्टाफ सिलेक्शन परीक्षा इत्यादीप्रमाणे  ‘आयबीपीएस’ या संस्थेद्वारे ही नोकर भरती केली जाते. देशातील बहुतांश सर्व राष्ट्रीयीकृत बँकांत नोकर भरती करण्याचे कार्य ही संस्था करते तर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तिच्या सहायक बँकांमध्ये नोकर भरती प्रक्रिया त्या स्वत: राबवतात.
देशात एकीकडे प्रचंड बेरोजगारी आणि अल्प रोजगारीची स्थिती असताना बँकिंग क्षेत्रात मात्र मोठय़ा संधी उपलब्ध असल्याने युवावर्गाची पावलं बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राच्या दिशेने पडत आहेत. एमपीएससी किंवा यूपीएससी स्पर्धापरीक्षांच्या तुलनेत बँकिंग परीक्षांची काठिण्यपातळी काहीशी कमी असते. त्यामुळेही युवावर्गाचा बँकिंग क्षेत्राकडे ओढा दिसून येतो. देशातील विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये येत्या चार वर्षांत साडेसात लाख उमेदवारांची भरती केली जाणार आहे.
बँकिंग क्षेत्रातील नोकरीसाठी कोणत्याही शाखेची पदवीधर व्यक्ती पात्र असते. तथापि, स्पेशालिस्ट ऑफिसर्स या पदासाठी विशेष पदवीची आवश्यकता असते. उदा.  बी. एस्सी-अॅग्री, बी.सी.ए., एम.सी.ए., विधि शाखेतील पदवी इत्यादी. उर्वरित बँक क्लर्क, बँक प्रोबेशनरी ऑफिसर्स, मॅनेजमेंट ट्रेनी, सहायक यांसारख्या पदासाठी कोणत्याही शाखेची पदवीधर व्यक्ती पात्र असते, तसेच या परीक्षा देण्यासाठी मार्काच्या टक्केवारीची अट नसते. मात्र, काही वेळेस उमेदवाराची संख्या मर्यादित करण्यासाठी टक्केवारीची अट घातली जात असल्याचेही दिसून येते. परंतु, सामान्यत: टक्केवारीची अट घातली जात नाही. पदवीच्या शेवटच्या वर्षांच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनाही या परीक्षेला बसता येते. मात्र, मुलाखतीच्या वेळेस पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक असते. बँकिंग क्षेत्रातील या परीक्षा केवळ वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी नसतात तर सर्व विद्याशाखांचे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात.
‘आयबीपीएस’ व ‘एसबीआय’द्वारे प्रतिवर्षी एका विशिष्ट प्रकारच्या पदासाठी वर्षांतून एकदाच परीक्षा घेतली जाते. या परीक्षांमध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाची २०० मार्काची ऑनलाइन चाचणी, मुलाखत, गटचर्चा यांचा समावेश असतो. पदानुसार परीक्षेचा अभ्यासक्रम व गुणदान पद्धती वेगळी असते. बँक क्लार्कसाठी बुद्धिमापन, सांख्यिकी अभियोग्यता, इंग्रजी, संगणक ज्ञान व सामान्यज्ञान हे विषय प्रत्येकी ४० गुणांसाठी असतात. एकूण २०० गुणांची परीक्षा असते. ही परीक्षा इंग्रजी व हिंदी या दोन भाषांतून असते. ती वस्तुनिष्ठ स्वरूपाची आणि ऑनलाइन असते. वस्तुनिष्ठ परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखत १०० गुणांची असते. उमेदवारांची निवड ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील गुण आणि मुलाखतीसाठी मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाते. वस्तुनिष्ठ परीक्षेच्या गुणांना ८० टक्के तर मुलाखतीच्या गुणांना २० टक्के महत्त्व (वेटेज) असते. या मार्काच्या आधारे उमेदवाराने दिलेल्या पसंतीक्रमानुसार व बँकांच्या मागणीनुसार नोकरी  केली जाते.
बँक प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या परीक्षेकरिता ‘आयबीपीएस’ व ‘एसबीआय’च्या परीक्षा पद्धतीत थोडाफार फरक दिसून येतो. ‘आयबीपीएस’ मधील बँक प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या परीक्षेत बुद्धिमापन- ५० गुण, इंग्रजी- ४० गुण, सांख्यिकी अभियोग्यता- ५० गुण, सामान्यज्ञान- ४० गुण, संगणक ज्ञान- २० असतात. येथे दीघरेत्तरी पद्धतीची परीक्षा (Discriptive Examination) नसते; परंतु ‘एसबीआय’ बँक प्रोबेशनरी ऑफिसर्स परीक्षेसाठी मात्र बुद्धिमापन- ५० गुण, सांख्यिकी अभियोग्यता- ५० गुण, इंग्रजी- ५० गुण, सामान्यज्ञान (बँकिंग, मार्केटिंग व संगणक)- ५० गुणांसाठी असते. म्हणजेच २०० गुणांची वस्तुनिष्ठ परीक्षा तर इंग्रजीसाठी पुन्हा ५० गुणांची लेखी परीक्षा असते. गटचर्चा व मुलाखतीसाठी ५० गुण असतात. या सर्व परीक्षांचा अभ्यासक्रम विचारात घेता बुद्धिमापन, सांख्यिकी अभियोग्यता, इंग्रजी, संगणक आणि सामान्यज्ञान हे घटक महत्त्वाचे असतात. या घटकांच्या तयारीच्या जोरावर या परीक्षेत उत्तम यश संपादन करता येते. या घटकांचा सविस्तर अभ्यास आणि चालू घडामोडींची चिकित्सक माहिती याच्या सहाय्याने ही परीक्षा उत्तीर्ण होता येते. या परीक्षेमध्ये बुद्धिमापन व सांख्यिकी अभियोग्यता या घटकाची विशेष तयारी करणे आवश्यक आहे. मात्र, इतर घटकांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण वस्तुनिष्ठ परीक्षेमध्ये पाचही घटकांमध्ये स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे आवश्यक असते. सर्व घटकांमध्ये किमान निर्धारित गुण प्राप्त मिळवणे गरजेचे असते. उत्तम तयारी केल्यास या परीक्षेतील यश सहजशक्य आहे.                                                                                                                                

कायद्याची पदवी, यूपीएससीसाठी सोडली सीएची नोकरी; जाणून घ्या IAS सोनल गोयल यांचा प्रेरणादायी प्रवास
Urban Planning Exam marathi news
नगर रचना विभागाची परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी, ‘या’ तारखेला होणार कागदपत्रांची पडताळणी
नागपूर ‘एम्स’मध्ये अधिष्ठाता पदांच्या निकषांना छेद ! कायद्यात अशी आहे तरतूद..
Will the candidates be affected by the delay in the MPSC exam
‘एमपीएससी’च्या परीक्षा लांबल्याने उमेदवारांना फटका बसणार का?