News Flash

ग्रेट आयडियाज : ‘आशा असेल तिथे अपयश येऊ शकत नाही..’

आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वाचा अजोड ठसा उमटविलेल्या दिग्गजांचे मोठेपण दडलेले असते ते त्यांच्या सर्जनशीलतेत आणि त्यांच्या विचारसरणीत. अशा देशोदेशींच्या थोरामोठय़ांचे विचार जाणून घेऊ या, या मासिक

| February 25, 2013 01:19 am

आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वाचा अजोड ठसा उमटविलेल्या दिग्गजांचे मोठेपण दडलेले असते ते त्यांच्या सर्जनशीलतेत आणि त्यांच्या विचारसरणीत. अशा देशोदेशींच्या थोरामोठय़ांचे विचार जाणून घेऊ या, या मासिक सदरात..
टाइम मॅगेझिन’ने जगभरातील
अत्यंत प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत जेरेमी लिन् या बास्केटबॉल खेळाडूचे नाव समाविष्ट केले आहे. जाणून घेऊयात, त्याच्या
ग्रेट आयडियाज्!
आ पल्या बास्केटबॉलच्या प्रेमाचा कित्ता सर्वानी गिरवावा, याचा एक महान धडा जेरेमी लिन् याने शिकवला आहे. एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून हा सध्या लोकप्रियतेच्या कळसावर तो स्वार आहे.
जीवनाबद्दलचा समग्र दृष्टिकोन आणि  सामथ्र्यशाली दृढ श्रद्धा, कृतीसाठी उद्युक्त करणारे ठोस विचार यांच्या बळावर पुढे येऊन अतुलनीय खेळी करणारा बास्केटबॉलपटू म्हणजे- जेरेमी लिन् होय. उत्तर अमेरिकेतील नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या ह्य़ुस्टन रॉकेटस् टीमचा हा २४ वर्षीय खेळाडू. न्यूयॉर्क शहरामध्ये कार्यरत व्यावसायिक बास्केटबॉल संघ म्हणजे न्यूयॉर्क निक्स. बास्केटबॉल कोर्टवरचा हा जागतिक दर्जाचा अ‍ॅथलीट अध्र्या रात्रीत वर आलेला काजवा नसून त्याने खरे तर आपले यश हे पारंपरिक वळणाने संपादन केले आहे. कठोर परिश्रम आणि विनम्र वागणूक हे त्याचे अत्यंत महत्त्वाचे गुण. योग्य खेळी आणि योग्य जीवन म्हणजे जेरेमी लिन् हे आज समीकरण बनले आहे. सामना जिंकण्याची सर्वतोपरी तयारी जेरेमी करतो. जागतिक पातळीवर अत्यंत प्रभावशाली व्यक्ती म्हणून ‘टाइम मॅगेझिन’ने जेरेमी लिन् याचा गौरव केला आहे. प्रत्येक सामना जिंकून देण्याचे त्याचे कौशल्य अतुलनीय आहे. ह्य़ुस्टन रॉकेटस्, न्यूयॉर्क निक्स अशा आणखी वरवरच्या स्तरांवरील बास्केटबॉल संस्थांमध्ये तो आघाडीचा आणि जागतिक दर्जाचा खेळाडू म्हणून गौरवला गेला आहे. एनबीए रायिझग स्टार, एबीए क्लब चॅम्पियनशीप असे अनेक बहुमान त्याला मिळाले आहेत.
एखाद्या गोष्टीमध्ये सहभाग घेताना पूर्वग्रह आणि पठडीतल्या साचेबद्ध विचारांमुळे मुले काहीवेळा माघार घेतात. मुलांना पारंपरिक धाटणीची, जखडणारी तथ्ये किंवा परिस्थिती मागे ओढत असते. अशा वेळी चुकीच्या संकल्पनांना सुरुंग लावणाऱ्या या आशियाई अमेरिकन वंशाच्या खेळाडूला ‘नाही’ हा शब्दच माहीत नाही. ‘जमत नाही’, ‘अवघड आहे’, ‘कठीण आहे’, ‘कसे काय करायचे’, असे कुठेलेही वाक्य तो खोडून काढतो, धुडकावून लावतो. खेळ, जीवन आणि त्यामागचा दृष्टिकोन यावरील त्याचे विचार तेजस्वी आहेत –
‘‘मी इतर लोकांसाठी खेळत नाही. मी जर अशा मार्गाने विचार करायला लागलो तर माझ्यावर खूप दबाव / दडपण येईल. मी बास्केटबॉल खेळतो. कारण तीच एक गोष्ट करायला मला अत्यंत आवडते.
माझ्या श्रद्धा, धारणा आणि ज्यावर मी दृढ विश्वास ठेवतो, त्या सर्वाचा जाहीर स्वीकार करण्यास मी आता शिकलो आहे. परंतु प्रभावाच्या संदर्भात बोलायचं झालं तर मी फक्त श्रेयस्कर देवत्वाचा मार्ग अनुसरण्याचा प्रयत्न करतो.
याचा माझ्यासाठी अर्थ असतो- तो म्हणजे आपल्या क्षेत्रातील घटकांची सेवा करणे. मग ते घामाने भिजून खराब झालेली जमीन साफ करण्याचे हिणकस काम असो किंवा उपकरणांची बॅग वाहून नेण्याचे काम असो.. मी खिलाडू वृत्तीचा एक प्रतिनिधी आहे आणि मला आशियाई अमेरिकन समुदायाचा रोल मॉडेल मला व्हायचं आहे.
दु:खातून चारित्र्य उभे राहते, चारित्र्यातून आशा निर्माण होते आणि जिथे आशा आहे तिथे कधीही अपयश, निराशा हे येऊच शकत नाहीत. माझ्या घरच्यांना मी एक ओव्हरसाइझ मूल वाटायचो आणि खूपशा प्रमाणात ते सत्य आहे. कुणासमोरही काहीही सिद्ध करण्यासाठी मी खेळत नाही. आपणच कुठेतरी अपयशाचे विचार धरून ठेवतो. त्यापुढे जाऊन काहीतरी सिद्ध करण्यासाठी आपला आटापिटा असायला हवा.
आजकाल बास्केटबॉलच्या क्षेत्रामध्ये कच्चे पोरसवदा आणि नवख्या खेळाडूंना पडेल ते काम करावे लागते. बुजुर्ग खेळाडू मात्र निवांत असतात. पण हे चित्र पालटले आणि काही प्रमाणात जरी वरिष्ठ खेळाडू सहकार्य करू लागले की, तुम्ही कार्यासाठी तत्पर आहात, हे त्यातून दिसून येते आणि पुढाकार घेण्याचा तो एक चांगला मार्ग आहे.
सराव करताना दररोज तुम्ही एक उदाहरण आणि पायंडा घालून द्यायला हवा. पण त्याचबरोबर तुमच्या संघातले लोक जे करायला हवे, ते करत नसतील तर एक खेळाडू या नात्याने तुम्ही त्याला जबाबदार ठरता. प्रत्येक लहानसहान गोष्ट चमच्याने तुम्हाला भरवली जावी अशी अपेक्षा खेळाडूने प्रशिक्षकाकडून करणे गर आहे. खेळाडू हे जबाबदार असायला हवेत. दररोज सराव करताना अशा जागा, असे प्रसंग येतात की, ज्या वेळेस तुम्ही नेमक्या पद्धतीने, योग्य तो संदेश पोहोचवणे जरुरी असते. परंतु ते करण्यासाठीही योग्य रीत अनुसरणे महत्त्वाचे ठरते. क्षेत्र कुठेलेही असो, तुम्हाला स्टीरीओटाइप विचारांचा आणि वृत्तींचा सामना हा करावाच लागतो.
दररोज शब्दांच्या सहवासात राहणे माझ्यासाठी आवश्यक आहे. रोज सकाळी आणि रात्री मी प्रार्थना करतो, वाचन करतो. त्यामुळे माझ्या दिवसाची सुरुवात प्रसन्न चित्ताने होते. रात्री संपूर्ण दिवसभरात काय काय घडले, त्याचा मी आढावा घेतो. एकप्रकारचे ते आत्मपरीक्षण असते. चर्चमध्ये जाणे हे माझ्यासाठी खरोखरच अत्यंत महत्त्वाचे आहे. रोड ट्रीप्सवरून शनिवारी रात्री उशिरा घरी गेलो तर ते खूप कठीण असते कधी कधी, परंतु तरीदेखील मी प्रत्येक आठवडय़ाला प्रार्थना मंदिरात जाण्याचा शिरस्ता कसून पाळतो. फावल्या वेळात माझ्या भावंडांबरोबर व्हिडीओ गेम्स खेळणे मी पसंत करतो. खेळण्यातून कधी निवृत्ती घेतली तर मी चर्चचा धर्मगुरू होणे पसंत करेन.
आठवडय़ातून एकदा मी माझ्या मित्र-परिवाराच्या छोटय़ाशा ग्रुपला हमखास भेटतो. चर्चमध्ये गेलो तरी तिथे खूप लोक माझ्या परिचयाचे नाहीत. परंतु, या माझ्या छोटय़ाशा ग्रुपमध्ये सर्वच विषयांवर मी इतरांशी मोकळा संवाद साधतो. तिथे मला हुरूप, प्रोत्साहन आणि आपुलकी मिळते. हा छोटासा ग्रुप, हा माझा मनापासून जोपासलेला आवडता आध्यात्मिक परिवार / समुदाय आहे. योग्य परिसीमा जर आखून घेतल्या नाहीत तर आपण नेहमीच श्रद्धेशी तडजोड करतो. मला खूप जास्त ख्रिश्चन मित्र नव्हते तेव्हा मला बराच प्रयास / संघर्ष करावा लागला. हायस्कूलच्या दरम्यान माझा हा छोटासा ग्रुप मिळाल्यानंतर सारे सकारात्मक बदल होऊ लागले.
वर्षांनुवर्षांच्या अनुभवांनंतर मी हे शिकलो की, केवळ तुम्ही परमेश्वराला अनुसरता, त्यावर श्रद्धा ठेवता याचा अर्थ असा नाही की, तुम्ही प्रत्येक सामना जिंकाल किंवा एक खेळाडू म्हणून जे जे हवे ते ते तुमच्या पदरात पडेल. बास्केटबॉल खेळण्याचा एक ‘गॉडली वे’- एक दैवी रीत आहे आणि ती रीत अनुसरून खेळ करणे ही तुमची जबाबदारी असते. जर तुम्हाला विजेतेपद मिळाले तर फारच छान, पण जर तुम्हाला ते मिळाले नाही तरी शिकण्याजोगा एक धडा त्यातून तुम्ही शिकायचा असतो.
आपल्या जीवनशैलीत बदल करून ईश्वराच्या श्रद्धेच्या मार्गावर चालणारे लोक वाढले की मला एक आत्मिक सामधान मिळते, आनंद मिळतो. असे घडताना पाहिले की, माझ्यातला मीदेखील बदलत आहे, असे मला जाणवते. ईश्वराच्या अस्तित्वाचे भान ठेवून मी खेळतो आहे की नाही, हे सतत माझे पालक तपासत असतात. जर मी तसे वागत नसलो तर ताबडतोब ते मला त्यासाठी जबाबदार धरतात आणि मला माझ्या बांधिलकीची आठवण ठेवण्यास सांगतात. हे खूप महत्त्वाचे आहे. कारण जिंकलो किंवा जिंकलो नाही तरी, चांगली खेळी केली अथवा नाही तरीदेखील तुमच्या कृतीतून परमेश्वराची प्रतिमा झळकणे गरजेचे असते. आणि यासाठी माझ्या पालकांचा कायमच कटाक्ष असतो. यासाठी मी फार कृतज्ञ आहे.       
प्रसिद्धीच्या झोतामध्ये, प्रसारमाध्यमांनी दिलेल्या इतक्या लोकप्रियतेमुळे, चाहत्यांनी दिलेल्या अलोट प्रेमामुळे स्वत:ला सिद्ध करण्याची गरज मला वाटू लागली. मी काही मार्केटिंगचे साधन नाही, मी काही प्रेक्षकांची उपस्थिती वाढावी, म्हणून पुढय़ात टाकलेलं प्यादं नाहीये.
करिअरच्या या उंचीवर छोटय़ा छोटय़ा तपशिलांबाबत खूप काही करण्यासारखे आहे. लोकप्रियता आणि प्रसिद्धीनंतर तशी लालसा निर्माण होण्याला पर्याय नाही. परंतु, मी मात्र परमेश्वरावर आणखी श्रद्धा कशी ठेवू शकेन, कसा आणखीन त्याच्या ठायी समíपत होऊ शकेन, त्याचा गौरव कसा जास्त वाढवू शकेन, हा विचार सदैव करत असतो. हा एक संघर्ष आहे आणि हा संघर्ष मी सुरूच ठेवणार आहे.’’    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2013 1:19 am

Web Title: great ideas if there is hope unsuccess will not be there
Next Stories
1 शोध आणि बोध : आकाश निळे का दिसते?
2 तयारी एमबीएची! : निर्भेळ यश संपादन करण्यासाठी..
3 एफटीआयआय : प्रवेश पात्रता परीक्षा
Just Now!
X