रोहिणी शहा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांपैकी राज्यसेवा परीक्षा, दुय्यम सेवा परीक्षा आणि गट ‘क’ सेवा परीक्षा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये प्रसिद्ध आहेत आणि त्यांची माहितीही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. या प्रशासकीय सेवांमधील; पदभरतीबरोबरच आयोगाकडून विशेषज्ञ सेवा म्हणजेच वनसेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा यांवरही पदभरती करण्यात येते. या पुढील काही लेखांमध्ये या पदांवरील भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांबद्दल चर्चा करण्यात येईल.

विषय   काठीण्य पातळी                 प्रश्नसंख्या      एकूण गुण

मराठी    बारावी                                 २५                        २५

इंग्रजी    बारावी                                 २५                        २५

सामान्य अध्ययन       पदवी             ५०                          ५०

(चालू घडामोडी व सामान्य बुद्धिमत्ता चाचणी)

१००    १००

महाराष्ट्र वनसेवा परीक्षेची पूर्वपरीक्षा २६ मे रोजी होत आहे. त्यामुळे वनसेवा परीक्षेबाबत या लेखापासून चर्चा करण्यात येत आहे. वनसेवा परीक्षेच्या मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास घटकनिहाय प्रश्नसंख्या पुढीलप्रमाणे असल्याचे दिसते.

अनिवार्य इंग्रजी व मराठी विषय प्रत्येकी २५ गुणांसाठी आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (१२वीच्या) समकक्ष असेल व प्रश्नांचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल असे आयोगाने अभ्यासक्रमात नमूद केले आहे. तयारीची व पेपर सोडवण्याची रणनीती कशी असावी याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

व्याकरण –

हा विभाग पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा आहे. त्यामुळे व्याकरणावर पकड मजबूत असायला हवी. नियम समजून घेणे व सराव करणे दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत.

मराठी व्याकरण –

* या उपघटकावर २० प्रश्न विचारण्यात आले आहेत.

* व्याकरणाच्या नियमांवर थेट प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या व्याख्या व नियम व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे.

* शब्दांच्या जाती, प्रकार, वाक्य प्रकार, काळ, प्रयोग यांवर किमान एक प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यामुळे ठळक प्रकारच नव्हे तर उपप्रकारही व्यवस्थित समजून घेऊन त्यांची जास्तीत जास्त उदाहरणे समजून घेणे आवश्यक आहे.

* व्याकरणदृष्टय़ा योग्य पद्धतीने लिहिलेले शब्दही विचारण्यात आले आहेत. त्यामुळे व्याकरणाची चिन्हे, शब्दसिद्धी व रचना यांचाही आढावा घेणे आवश्यक आहे.

* समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, सामासिक तसेच तत्सम शब्दांचे अर्थ विचारण्यात आले आहेत. म्हणींचे, वाक्प्रचारांचे अर्थ यांवरही किमान दोन प्रश्न विचारलेले आहेत. हा भाग वाचनाची सवय आणि मराठीचे आकलन यावर आधारित आहे. वाक्प्रचार आणि म्हणींचे संग्रह वाचून ते पाठ होतातही, पण आकलन करून तयारी केल्यास जास्त फायदेशीर ठरते.

इंग्रजी व्याकरण –

* या उपघटकावर सन २०१६ व २०१७ मध्ये २० तर २०१८मध्ये २५ प्रश्न विचारलेले आहेत.

* विरामचिन्हांचा तसेच इतर चिन्हांचा वापर, व्याकरणाच्या नियमांवर थेट प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या व्याख्या व नियम व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे.

* शब्दांचे अर्थ, वाक्प्रचारांचे अर्थ यांवर सर्वाधिक प्रश्न विचारलेले आहेत. अर्थ विचारणाऱ्या प्रश्नांमध्ये जोडय़ा लावा प्रकारचे प्रश्न जास्त आहेत. याचा अर्थ इंग्रजी आकलन हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. वाचन आणि डिक्शनरीचा जास्तीत जास्त वापर करून आकलनाचा प्रयत्न करणे हाच या भागाच्या तयारी सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे.

* वाक्यांची रचना, वाक्यांचे भाग (Clauses) यांचे नियम व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. त्याबाबतचा सरावही आवश्यक आहे. काही प्रश्न सोडविण्यासाठी केवळ नियम माहीत असून उपयोगाचे नाही तर वाक्यांचा सुयोग्य अर्थ कोणता असू शकेल ते समजून घेणे आवश्यक आहे.

* वाक्यामध्ये योग्य शब्दांचे, आर्टिकल्सचे, चिन्हांचे उपयोजन यांचा सरावही महत्त्वाचा आहे. वाक्प्रचारांचा वापरही त्यांचा अर्थ समजून घेऊन करणे आवश्यक आहे.

उताऱ्यावरील प्रश्न –

सन २०१६पासून दोन्ही भाषांमध्ये प्रत्येकी पाच प्रश्न दिलेल्या उताऱ्यावर विचारण्यात आले आहेत. मात्र सन २०१८च्या पूर्वपरीक्षेत इंग्रजी भाषेतील उताऱ्यांवर प्रश्नांचा विभाग वगळण्यात आला होता. तरीही या भागाची तयारी वगळून चालणार नाही हे लक्षात ठेवावे लागेल. हे प्रश्न सोडविण्यासाठी पुढील बाबी विचारात घ्याव्यात.

* आधी उतारा वाचून मगच प्रश्न पाहावेत.

* पहिल्या वाचनादरम्यानच वस्तुनिष्ठ माहिती व संज्ञांना अधोरेखित करावे.

* तथ्यात्मक किंवा थेट प्रश्न विचारले असतील तर त्यांची उत्तरे द्यावीत.

* यानंतर आशय विचारणारे प्रश्न किंवा सखोल आकलनावर आधारित प्रश्न सोडवावेत. यासाठी आवश्यकता भासल्यास उताऱ्यातील संबंधित भाग पुन्हा वाचावा व मगच उत्तर द्यावे. पुढील लेखांमध्ये सामान्य अध्ययन घटकाच्या उपघटकांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येईल.