फारुक नाईकवाडे

राज्यसेवा परीक्षा आणि तिच्या पॅटर्न आणि अभ्यासक्रमामध्ये वेळोवेळी होत गेलेले बदल आणि त्यावरच्या उमेदवारांच्या प्रतिक्रिया आणि प्रत्यक्षात आवश्यक विश्लेषण क्षमता याबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. या लेखापासून राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यसक्रमात आयोगाने केलेल्या सुधारणांचे स्वरूप नेमके कसे आहे याबाबत चर्चा करण्यात येत आहे.

मुख्य परीक्षेमध्ये सामान्य अध्ययनाचे एकून चार पेपर असले तरी त्यात समाविष्ट अभ्यास विषय आहेत एकूण आठ. या अभ्यासक्रमातील सुधारणांची विषयनिहाय चर्चा तयारीसाठी उपयुक्त ठरेल. सामान्य अध्ययन पेपर एकमधील विषयनिहाय बदलांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.

इतिहास पुनर्रचना 

* सामाजिक आणि सांस्कृतिक जागृती हे शीर्षक वगळून त्यातील मुद्दे  प्रबोधनपर्व अशा वजनदार शीर्षकाखाली ठेवण्यात आले आहेत. नवीन समाविष्ट मुद्दे – रामकृष्ण मिशन आणि थिओसोफिकल सोसायटी.

* डाव्या चळवळी आणि शेतकरी आणि आदिवासी चळवळींचा समावेश आधी गांधी युगामध्ये केला होता. म्हणजे महात्मा गांधींच्या कालखंडापुरतीच त्यांची कारकीर्द अभ्यासणे अपेक्षित होते. आता त्यांचा सर्वंकष (संपूर्ण ब्रिटिश कालखंडातील घटनांचा) अभ्यास करायचा आहे.

* सामाजिक सांस्कृतिक जागृतीमध्ये महत्त्वाच्या व्यक्तींची भूमिका आणि निवडक समाजसुधारक असे  overlapping  काढून टाकले आहे. भारतीय राष्ट्रवादाचा उदय या मुद्यात महत्त्वाच्या व्यक्तींची भूमिका हा मुद्दा समाविष्ट करून व्यक्तींची यादी दिली आहे. राष्ट्रवादाच्या उदयातील महत्त्वाच्या घटनांचा व टप्प्यांचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.

* याआधी स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास या घटकाचा अभ्यासक्रम खूपच विस्कळीत होता. मुद्यांची सलगता, परस्परसंबंध यांचा कसलाही विचार न करता नुसते मुद्दे कोंबले होते. तयारी करताना सुसंबद्धपणे करता यावी यासाठी या घटकाची आपल्यापुरती पुन्हा मांडणी करून घेणे उमेदवारांना क्रमप्राप्त होते. आयोगाने हा घटक व्यवस्थित व सुसंबद्धपणे मांडण्याची संधी पुन्हा गमावली आहे. केवळ लाल बहादूर शास्त्रींचा उल्लेख एवढीच काय ती ‘सुधारणा’ यामध्ये दिसते. कालानुक्रम, विषय, मुद्दा अशा कुठल्याही प्रकारे यातील मुद्दे सुसंगतपणे मांडलेले नाहीत. त्यामुळे तयारीसाठी आधीसारखीच कसरत करावी लागणार आहे.

* महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारकांची यादी सध्याच्या काळातील बाबा आमटेंपर्यंत वाढविण्यात आली आहे.

नवीन मुद्दे

* सामाजिक आणि आर्थिक जागृती अशा संदिग्ध शीर्षकाखाली आर्थिक मुद्यांचा समावेशच आधीच्या अभ्यासक्रमामध्ये नव्हता. सुधारित अभ्यासक्रमामध्ये ब्रिटिशकालीन भारतीय अर्थव्यवस्था हा मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे. ब्रिटिशांच्या धोरणांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर, झालेला परिणाम उद्योगांचा ऱ्हास, शेतीचे व्यापारीकरण, संपत्ती वहन, आर्थिक जागृतीदरम्यान भारतीय उद्योगांचा उदय असे मुद्दे यामध्ये समाविष्ट आहेत.

* ब्रिटिश काळातील घटनात्मक सुधारणांचा समावेश आधीच्या अभ्यासामध्ये नसला तरी त्यावर प्रश्न विचारण्यात येत होते. आता या मुद्याचा समावेश केल्यामुळे उमेदरावारांचा गोंधळ कमी होईल.

* सांप्रदायिकतेचा विकास आणि फाळणी व सत्ता हस्तांतरणासाठीचे विविध प्रयत्न व टप्पे याही मुद्यांवर अप्रत्यक्षपणे प्रश्न विचारण्यात आले होते. हे मुद्दे आता अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत.

भूगोल पुनर्रचना

* प्राकृतिक भूगोलाऐवजी भूरूपशास्त्र या शीर्षकाखाली आवश्यक त्या सर्व मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. आधीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असलेल्या सर्वसाधारण व ढोबळ मुद्यांचे नेमके स्पष्टीकरण सुधारित अभ्यासक्रमामध्ये देण्यात आले आहे. यामध्ये आधी पुराची समस्या हा मध्येच दिसणारा असंबंद्ध मुद्दा वगळलेला आहे.

* हवामानशास्त्र हा भूगोलातील घटक कृषी व भूगोल या घटक विषयामध्ये समाविष्ट करण्यात आला होता. आता हा मुद्दा भूगोलाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला आहे.

* यापूर्वी रिमोट सेन्सिंग आणि त्यातील काही मुद्दे असे विस्कळीत स्वरूप आणि सर्वसाधारण शब्दप्रयोग यामुळे या मुद्याचा अभ्यास करताना बऱ्यापैकी गोंधळ असायचा. प्रश्नांच्या विश्लेषणावरून लक्षात येतील ते मुद्दे अभ्यासायचे अशी उमेदवारांची चाचपडत तयारी चालू असायची. आता या मुद्यातील महत्त्वाच्या सर्व मुद्यांचा अभ्यासक्रमामध्ये मुद्देसूद उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे अभ्यासक्रमाचा विस्तार झाला असे दिसत असले तरी या मुद्यांवर आधीपासूनच प्रश्न विचारण्यात आले आहेत हे समजून घेतले पाहिजे. समाविष्ट ३० मुद्दे म्हणजे अभ्यासक्रमाचा विस्तार नाही तर त्यामध्ये नेमकेपणा आणण्याचा प्रयत्न आहे.

* पर्यावरणीय भूगोलातील काही मुद्यांसाठी आधी करण्यात आलेल्या सर्वसाधारण शब्दप्रयोगापेक्षा त्यांचा पारिभाषिक संज्ञा वापरून उल्लेख केल्याने अभ्यासक्रमाला एक शास्त्रीय, मुद्देसूद स्वरूप मिळाले आहे. त्यामुळे हे नवे मुद्दे आहेत असे समजू नये.

* विज्ञान तंत्रज्ञानावर  overlap  होणारा इस्रो, आकाश व अंतराळ तंत्रज्ञान, मिशन शक्ती, क्षेपणास्त्र कार्यक्रम या मुद्यांचा समावेश भूगोलातही करण्यात आला आहे.

नवीन मुद्दे

* मानवी भूगोलामध्ये विविध सिद्धांत व विचारधारा हा मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे.

* आर्थिक भूगोलामध्ये प्राथमिक क्षेत्रातील कृषि, मत्स्यव्यवसाय, पशुपालन, चतुर्थक  क्षेत्रातील ज्ञानाधारित आर्थिक व्यवहार आणि  वाहतूक ही पायाभूत सुविधा या बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र द्वितीयक क्षेत्राचे म्हणजे उद्योगांचे भौगोलिक वितरण (Spatial distribution of industries) हा मुद्दा समाविष्ट करण्यात आलेला नाही. पेपर चारमध्ये याबाबतचे अन्य मुद्दे समाविष्ट आहेत पण भौगोलिक वितरण आणि त्यामागची कारणे हा महत्त्वाचा मुद्दा दोन्ही पेपरमध्ये समाविष्ट नाही.

* पर्यावरणीय भूगोलामध्ये जैवविविधतेशी संबंधित मुद्दे, मानव – वन्यजीव संघर्ष, नागरी उष्माद्वीप या पर्यावरणीय भूगोलातील मुद्यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

* अवकाश तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रातील वापर, अंतराळातील कचरा व्यवस्थापन आणि शस्त्रास्त्र स्पर्धा हे मुद्दे समाविष्ट करणे समर्पक आणि समयोचितही आहे.

वगळलेले मुद्दे

* स्थलांतर आणि संबंधित मुद्दे हा सामाजिक भूगोलातील मुद्दा खरेतर सध्याच्या काळातील अत्यंत सुसंबद्ध मुद्दा आहे आणि त्याबाबत उमेदवारांना जाणीव असणे आवश्यक आहे. मात्र तरीही हा मुद्दा आश्चर्यकारकपणे वगळलेला दिसत आहे.

* सीआरझेड कायदे हा पर्यावरणातील मुद्दा वगळण्यात आला आहे.

सामान्य अध्ययन पेपर एकमध्ये कृषी हा घटकविषयही समाविष्ट आहे. पण  या विषयाचा काही भाग पेपर चारमध्येही समाविष्ट असल्याने त्याची चर्चा एकत्रितपणे पुढे करण्यात येईल.