एमपीएससी पूर्वपरीक्षेत नव्याने समावेश करण्यात आलेल्या ‘सिव्हिल सव्‍‌र्हिसेस अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट’ अर्थात ‘सीसॅट’
या प्रश्नपत्रिकेची तयारी करण्याविषयीचे मार्गदर्शन –
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यंदापासून राज्यसेवा पूर्वपरीक्षेत केलेल्या बदलानुसार, पूर्वपरीक्षेत प्रत्येकी २०० गुणांच्या ‘सामान्य अध्ययन’ आणि ‘नागरी सेवा कलचाचणी’ (सिव्हिल सर्व्हिसेस अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट – सीसॅट) या नव्या पेपर्सचा समावेश केला आहे. त्यातील नागरी सेवा कलचाचणी या विषयात
(१)    आकलन कौशल्य (Comprehension)
(२)    आंतरवैयक्तिक संवाद व संभाषण कौशल्य (Interpersonal)
(३)    तार्किक विचार व विश्लेषणात्मक क्षमता (Logical )
(४)    निर्णयप्रक्रिया व समस्यांची सोडवणूक (Decision)
(५)    सामान्य बुद्धिमत्ता चाचणी (General)
(६)    मूलभूत अंकगणितीय कौशल्य व सामग्री विश्लेषण (Basic )
(७)    इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य (English) हे अभ्यास घटक समाविष्ट केले आहेत.
‘नागरी सेवा कल चाचणी’च्या समावेशामुळे एकंदर एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ेसंभ्रम आणि भीतीचे वातावरण दिसून येते. विशेषत: कलाशाखेतून शिक्षण घेतलेल्या, मराठी माध्यमातून शिकलेल्या तसेच निमशहरी, ग्रामीण भागात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नव्या बदलांमुळे काहीशी भीती निर्माण झाल्याचे चित्र दिसून येते. कलचाचणीतील ‘अंकगणित, बुद्धिमापन चाचणी आणि इंग्रजी’ या घटकांमुळे हा पेपर विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यक, एमबीए इ. विषयांतील पदवीधारकांना आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना सुलभ जाणार, अशी सर्वसाधारण भावना दिसून येते. या विद्यार्थ्यांना गणितीय बाबींची असलेली ओळख आणि इंग्रजीतील शिक्षणामुळे निश्चितच काही प्रमाणात फायदा होईल. मात्र, या कौशल्याची केवळ ओळख असल्यामुळे ‘त्यांना कल चाचणीची तयारी करण्याची गरज नाही,’ असे नाही. वस्तुत: या चाचणीद्वारे सनदी अधिकाऱ्यासाठी आवश्यक कौशल्ये तपासली जाणार आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी रीतसर वेळ देत कलचाचणीतील सर्व घटकांची तयारी करावी लागणारआहे.
स्वाभाविकत: सर्वच विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्रजी भाषेचे आकलन, अंकगणितीय व बुद्धिमापन चाचणी, ताíकक व विश्लेषणात्मक क्षमता आणि निर्णयक्षमता या घटकांची तयारी सुरुवातीपासूनच करणे अपेक्षित आहे. प्रश्नप्रत्रिकेत विद्यार्थ्यांचे सामान्य आकलन तपासणारे मराठीतील अनेक उतारे असतील. या उताऱ्याचे नेमके वाचन करून त्यातील विविध शब्दांचा शब्दश: अर्थ आणि मथितार्थ लक्षात घ्यावा लागेल. उताऱ्यातील विषयात कशाची चर्चा होते? त्यासंबंधी लेखक/लेखिकेची अथवा निवेदकाची नेमकी भूमिका कोणती? आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ दिलेली उदाहरणे व दाखले कोणते? त्यातून कोणता आशय व्यक्त होतो, इत्यादी मूलभूत प्रश्नांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उताऱ्याचे नेमके आकलन करायला हवे. तसेच परिच्छेदाखाली दिलेल्या प्रश्नांचा अर्थ आणि रोख अचूकपणे लक्षात घेण्याची क्षमतादेखील तेवढीच महत्त्वाची आहे. एवढेच नाही तर प्रश्नाखालील चार पर्यायांचे तुलनात्मक आकलन करून अचूक पर्याय निवडण्याची क्षमता निर्णायक ठरणार आहे. वाचन, विचार, विश्लेषण आणि अर्थनिर्णयाची मूलभूत क्षमता येथे तपासली जाते, याचे भान असायला हवे. अर्थात मराठी भाषेतून दिले जाणारे उतारे हे राजकारण, अर्थकारण, समाजकारण, साहित्य-संस्कृती-कला, इतिहास, धर्म-तत्त्वज्ञान आणि विज्ञान अशा विविध क्षेत्रांशी संबंधित असू शकतात. त्यामुळे आपले आकलन विस्तारण्यासाठी सकस, दर्जेदार आणि विविध स्वरूपाचे वाचन करणे महत्त्वपूर्ण ठरते.
‘एमपीएससी’ने ‘अंकगणितीय कौशल्ये आणि इंग्रजी भाषेचे आकलन’ या विषयाच्या पातळीचे
दहावी हे मानक निर्धारित केल्यामुळे विद्यार्थ्यांनी
त्याचे भय बाळगण्याचे कारण नाही. म्हणजेच
‘कॅट’ अथवा ‘जीआरई’सारख्या परीक्षांप्रमाणे क्लिष्ट स्वरूपाची गणिते, त्यातील सूत्रे अशा गुंतागुंतीच्या बाबींचा यात समावेश केलेला नाही. त्यामुळे अशी पाश्र्वभूमी नसणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या पातळीवरील अंकगणित व इंग्रजीच्या आकलनाची मूलभूत
क्षमता विकसित करावी लागेल. नागरी सेवा कलचाचणीतील इंग्रजी भाषेच्या आकलनासंदर्भात इंग्रजीचे ज्ञान महत्त्वाचे ठरणार यात शंका नाही.
कारण काही उतारे  केवळ इंग्रजी भाषेतून दिलेले असतील. अर्थात इथे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असल्याने पेपरमधील इंग्रजी भाग वाचून प्रश्नांखाली दिलेल्या अचूक पर्यायाची निवड करायची आहे. त्यामुळे किमानपक्षी इंग्रजी वाचून त्यातील आशय समजण्याइतपत इंग्रजीचे ज्ञान अवगत करणे अत्यावश्यक ठरते. शब्दांचे अर्थ, व्याकरणदृष्टय़ा अचूक वाक्यरचना यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे. नियमित वाचन व भरपूर सरावाच्या माध्यमातून कोणत्याही विद्यार्थ्यांला इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य वाढवता येईल. आंतरवैयक्तिक संवाद व संभाषण कौशल्याच्या बाबतीतही विद्यार्थ्यांच्या आकलनाबरोबरच योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता तपासली जाणार आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकेतील संवाद रूपाने दिलेल्या उताऱ्यातील अभिकर्त्यांचा प्रतिसाद कसा आहे, ते परस्परांचे मत समजून घेतात का, संभाषणासाठी योग्य भाषेचा वापर करतात का, त्यांच्याकडे इतरांचे ऐकण्याची वृत्ती आहे का, अशा समर्पक प्रश्नांच्या आधारे या कौशल्याची तपासणी केली जाईल.
अंकगणितीय घटकात बेरीज-वजाबाकी, भागाकार-गुणाकार; वर्गमूळ-घनमूळ; सरासरी प्रमाण इ. मूलभूत अंकगणितीय प्रक्रियांचा नियमित अभ्यास आणि त्यावर आधारित विविध स्वरूपाच्या उदाहरणांची उकल करून यावर प्रभुत्व मिळवता येईल. बुद्धिमापन चाचणीच्या संदर्भातही वर्णमाला, संख्याश्रेणी, विविध स्वरूपाच्या आकृत्या, नातेसंबंधावरील प्रश्न इ. विविध स्वरूपाच्या घटकाचा अर्थ लक्षात घेऊन त्यावरील प्रश्नांचा नियमित सराव करणे मध्यवर्ती ठरते. विविध उदाहरणांची उकल केल्यामुळे बरेच ठोकताळे आणि उकलपद्धती व प्रक्रिया पक्क्या करता येतात. त्यामुळे कमीत कमी वेळात प्रश्न सोडवता येतात. म्हणून नियमित, विविधांगी आणि विपुल उदाहरणांचा सराव हाच या घटकावर प्रभुत्व मिळवण्याचा राजमार्ग आहे.
ताíकक विचार व विश्लेषणात्मक क्षमतेवर आधारित प्रश्नात अनेक विधाने दिली जातील. त्या विधानाशी निगडित निष्कर्ष पर्यायात अंतर्भूत केले जातील. अशा प्रश्नांत विद्यार्थ्यांने दिलेली माहिती गृहीत धरून तर्काच्या आधारे योग्य निष्कर्षांपर्यंत पोहोचणे अभिप्रेत असते. त्यासाठी विचार आणि कल्पनाशक्तीला गतिमान करणे अत्यावश्यक ठरते. वेळेचा घटक लक्षात ठेवून अशा प्रश्नांची कमीत कमी वेळेत उकल कशी करता येईल, याचा सतत विचार करावा लागतो. अर्थात यासाठी दिलेल्या माहितीचे अचूक, योग्य वाचन व आकलन आणि योग्य निष्कर्षांपर्यंत पोचण्याची क्षमता उपयुक्त ठरणार आहे. भरपूर सरावाद्वारे या घटकांची प्रभावी तयारी करता येईल.
निर्णय निर्धारणाची क्षमता तपासणारे प्रश्न विद्यार्थ्यांचे नागरी सेवाविषयक आकलन, भोवतालच्या समस्या व त्यावरील संभाव्य उपायांचे आकलन याची चाचपणी करणारे आहेत. विशिष्ट परिस्थितीत उमेदवार कसा निर्णय घेतो, निर्णय घेताना उमेदवाराने परिस्थितीचा पूर्ण व समतोल विचार केलेला आहे का, त्याला राज्यघटना, प्रशासन आणि सामाजिक वास्तवातील मूलभूत बाबींची जाण व भान आहे का, या महत्त्वपूर्ण बाबी तपासल्या जातात. त्यामुळे प्रश्नपत्रिकेत दिलेला प्रसंग वा परिस्थिती काळजीपूर्वकपणे लक्षात घेणे. तिची उकल करण्यासाठी दिलेल्या पर्यायांचा तुलनात्मक अभ्यास करणे आणि घटनेतील समता, न्याय, धर्मनिरपेक्षता ही मूल्ये आणि प्रशासनातील नियमांची चौकट लक्षात घेऊन योग्य पर्यायाची निवड करणे अत्यावश्यक ठरते.
थोडक्यात,  विद्यार्थ्यांच्या वाचन, विचार, विश्लेषण आणि अर्थनिर्णयन क्षमतांचीच कसोटी पाहिली जाते. त्यामुळे चांगल्या संदर्भ साहित्याचे वाचन, त्याद्वारे विचार-विश्लेषण क्षमतेचा विकास आणि भरपूर प्रश्नांचा सराव हे धोरणच नागरी कल चाचणीसाठी उपयुक्त ठरणार यात शंका नाही. म्हणून सीसॅटचा भयगंड बाजूला सारून आपल्या मूलभूत क्षमतांचीच तपासणी करणारा हा पेपर आहे हे लक्षात घेऊन या विषयाचा सामना करणे केव्हाही श्रेयस्कर ठरेल!     
संचालक, द युनिक अ‍ॅकॅडमी