यूपीएससी व एमपीएससीचा पेपर संपल्यानंतर असंख्य विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न होता. तो म्हणजे ‘कट ऑफ कितीपर्यंत असेल?’ म्हणजे पूर्वपरीक्षा पास होऊन मुख्य परीक्षेच्या गुणवत्ता यादीत येण्यासाठी किती गुण मिळणे आवश्यक आहे? मित्रांनो, हा प्रश्न सर्वच परीक्षार्थीना अस्वस्थ बनवत आहे. यूपीएससीच्या परीक्षेच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार यंदाचा कट ऑफ काय असेल, हे कुणीच सांगू शकत नाही. एमपीएससी परीक्षेचीही स्थिती काहीशी अशीच आहे.
स्पर्धापरीक्षा म्हणजे चक्रव्यूह आहे. ते भेदण्याचा प्रयत्न शक्य तितका करतात. अनेकजण वयोमर्यादा संपत नाही, तोपर्यंत प्रयत्न करतात. त्यामुळे कट ऑफ मेरीटची चिंता करण्यापेक्षा पुढील अभ्यासाचा विचार करा.
पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिका बाजूला ठेवून त्यावर जास्त चर्चा करण्याऐवजी मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करा. समजा, परीक्षेचा निकाल अपेक्षेनुसार लागला नाही तर यूपीएससी व एमपीएससी स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करणे तुम्ही सोडणार आहात काय? जर तसा विचार तुमच्या मनात येत असेल तर तो झटकून टाका. कारण असा निर्णय घेतल्यास आतापर्यंत तुम्ही केलेले प्रयत्न वाया जातील. यशाच्या एकदम जवळ जाऊन तुम्ही मदान सोडाल तर आयुष्यभर अपयशाचा सल मनात राहील. अभ्यास असाच पुढे मुख्य परीक्षेच्या दृष्टीने सुरू ठेवलात तर डिसेंबर २०१३ पर्यंत मुख्य परीक्षेचा अभ्यास संपविण्याचे ध्येय ठेवा. पूर्वपरीक्षेत यशस्वी झालात तर मुख्य परीक्षेसाठी तयार असाल व जर अपयशी झालात तर २०१४ यूपीएससी परीक्षेत अव्वल १००  विद्यार्थ्यांत स्थान मिळविण्यास तुम्ही पात्र असाल.
वैकल्पिक (ऑप्शनल) विषय कोणता निवडावा? नवीन अभ्यासक्रमानुसार एकच वैकल्पिक विषय निवडायचा आहे आणि तोसुद्धा फक्त ५०० गुणांसाठी असणार आहे. म्हणजे जुन्या अभ्यासक्रमात दोन वैकल्पिक विषय निवडायचे होते, ज्यांनी पूर्वपरीक्षा चांगली लिहिली किंवा ज्यांचा पूर्वपरीक्षेत चांगले गुण येण्याची शक्यता आहे व जे गेल्या दोन-तीन वर्षांपासून तयारी करीत आहेत, त्यांच्या मनाची मोठी घालमेल सुरू झाली आहे. जुन्या अभ्यासक्रमात निवडलेल्या दोन वैकल्पिक विषयांपकी कोणता एक विषय निवडावा, हा प्रश्न विशेषत: त्या विद्यार्थ्यांना पडला आहे, ज्यांनी जुन्या अभ्यासक्रमानुसार इतिहास व राज्यशास्त्र तसेच भूगोल व राज्यशास्त्र किंवा इतिहास व लोकप्रशासन हे विषय घेऊन मुख्य परीक्षा लिहिली होती किंवा त्यांचा अभ्यास केला होता. आता एखाद्या विद्यार्थ्यांने हाच एक विषय वैकल्पिक म्हणून निवडावा असा काही नियम नाही, परंतु नवीन अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट नक्कीच सांगता येते ती, या वर्षांनंतर आगामी परीक्षेत वैकल्पिक विषय हा एखाद्या विद्यार्थ्यांसाठी त्याचे यशापयश ठरविणारा घटक नक्कीच असणार नाही. याचा अर्थ असा मुळीच होत नाही की त्याचे महत्त्व अत्यल्प झाले आहे, परंतु कोणता विषय निवडावा यासाठी मनात फार गोंधळ करून घेऊ नये. ज्या विषयात तुमची गती आहे, ज्याचा अभ्यास झाला आहे किंवा जो विषय कमी काळात अभ्यासणे शक्य आहे, ज्या विषयाचे अभ्यास साहित्य आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकते व ज्या विषयाचा उपयोग सामान्य अध्ययनाच्या पेपरसाठी होणार आहे, असाच विषय वैकल्पिक विषय म्हणून निवडता येईल. मात्र प्रत्येक वेळेला वैकल्पिक विषय निवडताना हेच निकष असावेत, असेही नाही.
यूपीएससीत एकेका मार्कावर अनेक विद्यार्थी असतात व एक-दोन मार्काच्या फरकाने पोस्ट बदलत असतात. जर असा विचार केला तर वैकल्पिक विषय निवडणे जास्त सोपे जाईल. कितीही चांगला अभ्यास केला तर वैकल्पिक विषयाला जास्तीतजास्त ५०० पकी २५० ते २७५ यादरम्यान गुण पडण्याची शक्यता आहे. अभ्यास चांगला असेल व विषयांवर पकड मजबूत असेल तर २८० ते २८५ च्या दरम्यान गुण येऊ शकतात. काही बोटावर मोजण्याइतक्या विद्यार्थ्यांना २८५ च्या पुढे गुण मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे विषय कोणताही निवडला तरी जास्तीतजास्त फरक २० ते २५ मार्काचा असेल आणि हा फरक सामान्य अध्ययन व निबंध या घटकात सहज भरून निघू शकतो, म्हणून जास्त गोंधळ न करता जो विषय आपणास आवडतो व ज्याचा आपण अभ्यास केला तो निवडून अभ्यासाला सुरुवात करावी.
    माध्यम कोणते निवडावे?
मुख्य परीक्षेसाठीचा फॉर्म भरून देईपर्यंत, विक्रम-वेताळाच्या गोष्टीतील वेताळाप्रमाणे हा प्रश्न आपल्या मानगुटीवर सदैव बसलेला असतो. अगदीच उत्तर द्यावयाचे म्हटले तर यूपीएससी परीक्षेत माध्यम अजिबात महत्त्वाचे नाही. तुम्ही जे लिहिणार आहात ते इंग्रजी किंवा मराठीत प्रभावीपणे व्यक्त करू शकत असाल ते माध्यम निवडावे. पेपर मराठीमध्ये लिहिणार असाल तर काही मर्यादा आहेत, उदा. नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार आणि सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये काही संकल्पना मराठीतून लिहिताना थोडे कष्ट पडणार आहेत. अर्थात ते अशक्य नाही. इंग्रजीतील काही अभ्याससाहित्य मराठीत भाषांतरीत करावे लागेल. त्याची सुरुवात लगेच करावी, म्हणजे ऐनवेळी त्रास होणार नाही. जे इंग्रजीतून पेपर लिहिणार आहेत त्यांनी निबंधाची तयारी आतापासून सुरू करावी. २५० गुणांसाठी निबंध लिहिताना आपले विचार विषयाला अनुसरून प्रभावी कसे होतील याचा प्रयत्न करावा. थोडक्यात, पेपर कोणत्या माध्यमातून लिहिणार आहात याचा निर्णय लवकरात लवकर घेऊन तयारीला लागावे. मुख्य परीक्षेत भारतीय भाषेतील एक पेपर (मराठी) व इंग्रजीतील एक पेपर ३००-३०० गुणांचे असतात. त्यांचे गुण अंतिम यादीत जरी धरले जात नसतील व जे अत्यंत सोपे पेपर असतात, तरीदेखील त्यांच्याकडे कोणत्याही पेपरमध्ये अनुत्तीर्ण झालात तर पुढचे पेपर तपासले जात नाहीत ते लक्षात ठेवा.
मुख्य परीक्षेची तयारी करताना खालील मुद्दे लक्षात ठेवा :
े वैकल्पिक विषय, निबंध व सामान्य अध्ययन यांच्या अभ्यासाचे सूक्ष्म नियोजन करावे.
े एका वैकल्पिक विषयाचा अभ्यास दोन महिन्यांत पूर्ण होणे आवश्यक आहे, किंबहुना कोणत्याही वैकल्पिक विषयाची तयारी दोन महिन्यांत पूर्ण होऊ शकते. वैकल्पिक विषयाबरोबर रोज कमीतकमी दोन तास तरी सामान्य अध्ययनाच्या अभ्यासासाठी द्यावेत.
े रोज प्रश्न घेऊन उत्तरे लिहिण्याचा सराव करावा. खरंतर शक्य असेल तर तीन तास बरोबर वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करावा. ते शक्य नसेल तर कमीतकमी दीड तासात किती प्रश्न लिहिता येतात याचा तरी सराव करावा.
े उत्तरे लिहिण्याचा सराव कोऱ्या कागदावरच करावा, कारण यूपीएससी परीक्षेच्या मुख्य परीक्षेत उत्तरपत्रिकेत उत्तरे ही कोऱ्या कागदावरच लिहावी लागतात.
े गेल्या दोन-तीन वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते की, आता प्रश्न २ गुणांसाठी, ३ गुणांसाठी, ५ गुणांसाठी, १० गुणांसाठी, १५ गुणांसाठी अशा प्रकारे विचारले जातात. वेळ तेवढाच आहे, मात्र जास्त प्रश्न लिहावे लागतात. म्हणून लिहिण्याची गती व कमीतकमी शब्दांत प्रभावी उत्तर लिहिण्याची सवय करावी. जर लिहिण्याचा सराव नसेल तर अभ्यास चांगला असूनही कमी गुण येतील.
े निबंध लिहिण्याचादेखील सराव करावा. निबंध लिहून तो तज्ज्ञांकडून तपासून घ्यावा किंवा आपल्याबरोबर तयारी करणाऱ्या मित्रांना दाखवून घ्यावा. त्यात काही त्रुटी असतील तर त्या दूर करून उत्तम निबंध लिहिण्याचा प्रयत्न करावा. सामान्य अध्ययनाचा अभ्यास करताना निबंधाचादेखील अभ्यास होऊन जातो. परंतु निबंधलेखनाचा सराव करायचा नाही, असे करू नका.
े सामान्य अध्ययनातील अभ्यासक्रमात दिलेला प्रत्येक मुद्दा व्यवस्थित अभ्यासावा. बाजारात एखाद्या घटकासाठी अभ्याससाहित्य उपलब्ध नसेल तर इंटरनेटचा वापर करा, वेळोवेळी केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या वेबसाइटला भेट देऊन महत्त्वाची माहिती नमूद करून ठेवा.
े जर शक्य असेल तर सामान्य अध्ययनातील घटकांच्या नोट्स काढून ठेवा, मात्र नोट्स संक्षिप्त असाव्यात, त्यांचा परीक्षेच्या शेवटी चांगला उपयोग होतो.
े विज्ञान, तंत्रज्ञान, नव्याने अंतर्भूत केलेल्या पेपर तीनमधील संरक्षण, संरक्षणासंदर्भातील घटक व्यवस्थित अभ्यासावे.
थोडक्यात, पूर्वपरीक्षेच्या निकालाची वाट न पाहता किंवा कट ऑफचा विचार न करता तयारीला सुरुवात करावी. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांची वाक्ये उद्धृत करावीशी वाटतात- ‘जे करू शकता ते करा, जे तुमच्याकडे आहे त्यासह करा आणि जेथे तुम्ही आहात तेथून करा.’
ही यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे आणि सद्यक्षणावर व सद्यपरिस्थितीवर भर द्या. आजपासून प्रत्येक मिनिटाचा योग्य पद्धतीने वापर केल्यास आपल्याला मोठे यश मिळू शकते. या परीक्षेत ज्यांना यश मिळाले, ते तुमच्यापेक्षा अधिक हुशार होते असे नाही आणि तुमच्यापेक्षा अधिक चांगले होते, असेही नाही. जेव्हा एखादा माणूस तुमच्यापेक्षा चांगले करतो याचा अर्थ असा होत नाही की, तो तुमच्यापेक्षा अधिक हुशार होता. याचा साधा अर्थ असा आहे की, त्याने तुमच्या आधी आणि अधिक प्रमाणात त्या क्षेत्रात झोकून दिले होते. काही गोष्टी त्याने तुमच्या आधी केल्या. यशस्वी होण्यासाठीचे नियोजन तुमच्यापेक्षा अधिक चांगले केले. जर एखादी गोष्ट इतर कोणी केलेली असेल किंवा त्या क्षेत्रात तो यशस्वी झाला असेल तर ती गोष्ट तुम्ही करू शकता. तुमच्या ध्येयप्राप्तीसाठी जे करणे आवश्यक आहे ते सर्व करा.
कारण आणि परिणामांचा नियम असा सांगतो की, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक परिणामाला काहीतरी विशिष्ट कारण असते. यश हा काही अपघात नसतो. अपयशसुद्धा अपघात नसतो. तुमच्याबाबत काय घडते हे तुमचे भविष्य किंवा योगायोग ठरवत नाही तर तुम्ही आज जे करत आहात जितक्या मन:पूर्वक व कष्टाने करत आहात त्यांचा तो परिणाम असतो.
मुख्य परीक्षेच्या तयारीला आत्मविश्वासाने व मनापासून सुरुवात करा..
ल्ल
ॠ१स्र्ं३्र’2020@ॠें्र’.ूे