या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माहिती व तंत्रज्ञान विभागाने ‘आपले सरकार’ हे नवे वेबपोर्टल सुरू केले आहे. या वेबपोर्टलचा उपयोग जनतेचा आणि सरकारचा प्रभावी संवाद साधण्याचे माध्यम म्हणून होणार आहे. सध्या मंत्रालय स्तरावरील विभागासाठी हे पोर्टल काम करील. त्यानंतर क्षेत्रीय आणि जिल्हास्तरावर विस्तार होईल.

आपले सरकारवेबपोर्टल काय आहे?

  • राज्यातील जनतेचा थेट मंत्रालयाशी संपर्क साधणारी ही ऑनलाइन व्यवस्था आहे. मोबाइल आणि कॉम्प्युटरच्या माध्यमातून दुहेरी संवादाचे हे माध्यम असून ‘प्रतिसाद’ देण्याच्या माध्यमातून शासन यामध्ये जनतेप्रति ‘दायित्व’ पूर्ण करते. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या पोर्टलचे नियंत्रण केले जाणार आहे. प्रतिसादाची हमी हे पोर्टलचे वैशिष्टय़ आहे. मुख्यमंत्र्यांपर्यंत मागणी, सूचना यांची दखल घेतली जाणार आहे. प्रत्येक विभागाचा एक अधिकारी या संदर्भात जबाबदार असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामान्य माणसाला मंत्रालयाचे हेलपाटे करावे लागणार नाहीत. पोर्टलद्वारे नागरिकांना आपल्या तक्रारी ऑनलाइन दाखल करणे तसेच त्याची सद्य:स्थिती जाणून घेण्याची सुविधा असल्यामुळे मंत्रालयापर्यंत येण्याची आवश्यकताच भासणार नाही.

वेबपोर्टलची संरचना

  • तीन महत्त्वाच्या घटकांना या वेबपोर्टलमध्ये सहभागी करण्यात आले आहे.
  • तक्रार निवारण- नागरिकाला आपली तक्रार उचित प्रवर्गाखाली दाखल करता येईल. त्यानंतर नागरिकाला दाखल केलेल्या तक्रारीचा टोकन क्रमांक मिळेल. त्या क्रमांकाचा वापर करून तक्रारीची सद्य:स्थिती जाणून घेता येईल.
  • माहितीचा अधिकार- मंत्रालयीन विभागाकडे माहितीच्या अधिकाराखाली करावयाचा अर्ज अथवा प्रथम अपील या भागामध्ये दाखल करता येणार असून त्याचे शुल्क (फी) इंटरनेट बँकिंग/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड यांचा वापर करून अदा करता येईल.
  • सहयोग- सुशासनाच्या संकल्पनेला चालना देण्याकरिता आणि नागरिकांचा प्रशासनात सहभाग वाढविण्याकरिता जनतेकडून शासनाच्या धोरणाबाबत सूचना, अभिप्राय मिळवण्याकरिता पोर्टलच्या या भागाचा उपयोग होईल. जनतेला आपल्या सूचना/अभिप्राय पोर्टलच्या या भागात दाखल करता येतील.
  • सर्वसाधारण सार्वजनिक सेवा, सर्व मंत्रालयीन विभागाचे कामकाज याविषयीच्या तक्रारी या वेबपोर्टलवर नोंदविता येतील. त्याचबरोबर सर्व विभागीय तसेच जिल्हास्तरीय कार्यालयांचा समावेशही वेबपोर्टलवर लवकरच करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी – https://aaplesarkar.maharashtra.gov.in/en/

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaple sarkar web portal
First published on: 18-08-2017 at 02:14 IST