एकप्रकारे आपण म्हणू शकतो की खगोलशास्त्राची सुरुवात निरीक्षणांपासूनच झाली. खगोलशास्त्र आणि इतर कुठल्याही शास्त्रात मोठा फरक सांगायचा झाला तर खगोलशास्त्रात प्रयोगशाळा नसते. खगोलशास्त्रज्ञ हा फक्त निरीक्षक असू शकतो. तो निसर्गाने केलेल्या प्रयोगांचे फक्त निरीक्षण करू शकतो. जर एखादे निरीक्षण चुकले किंवा हुकले तर ते परत कधीच करता येत नाही. प्रत्येक ग्रहण हे वेगळेच असते. खगोलशास्त्रात संशोधन करण्यास असलेली ही एक मोठी मर्यादा आहे. आज जे खगोलशास्त्र आपण जाणतो म्हणजे, ग्रहांचे पृथ्वीभोवती फिरणे, ताऱ्यांचा स्फोट किंवा कृष्ण विवरे तर त्याही पलीकडे जाऊन विश्वाची रचना यासारख्या विषयांना आधार हा फक्त रात्री लुकलुकणाऱ्या ताऱ्यांच्या प्रकाशाइतकाच आहे. . सुरुवातीला फक्त डोळ्यांनी अवकाश निरीक्षण केले जात असे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे त्यात अत्यंत प्रगत दुर्बिणी आल्या. सुरुवातीच्या त्या फक्त दृष्य प्रकाशाच्या होत्या.आता मात्र निरनिराळ्या तरंगलहरींच्या माध्यमातून खगोलीय निरीक्षण करता येतात.
दृष्य प्रकाशाच्या दुर्बिणीत खगोलीय पदार्थाच्या प्रतिमा घेण्याकरिता CCD हे उपकरण वापरण्यात येते. हे उपकरण आपल्या डिजिटल कॅमेऱ्याप्रमाणेच असते. फक्त याची अचूकता खूपच जास्त असते. एका सीसीडीवर अनेक ओळीत प्रकाश संवेदके बसवलेली असतात. यांना पिक्सल म्हणतात. प्रत्येक पिक्सलवर पडलेल्या प्रकाशाची नोंद घेऊन शेवटी त्यापासून संगणकावर चित्र तयार करण्यात येते. अशी उपकरणे वापरून ताऱ्यांच्या बदलत्या प्रकाशाचा, तेजोमेघांचा, तारकाविश्वांचा (galaxy) किंवा ग्रहांचासुद्धा अभ्यास करण्यात येतो. काही प्रकारची उपकरणे ही सर्वेक्षणासाठी असतात. ज्यात आकाशाच्या मोठय़ा भागाची चित्रे घेण्यात येतात. मग या चित्रातून आकाशाच्या त्या भागात काही नवीन बदल झाले आहेत का, याचा शोध घेण्यात येतो. या सर्व कार्यासाठी सुरुवातीची तयारीपण जबरदस्त असते. सर्वप्रथम निरीक्षकाला सीसीडीच्या प्रत्येक पिक्सलची संवेदनशीलता लक्षात घ्यावी लागते. त्यानंतर या माहितीचा उपयोग करून शेवटचे चित्र तयार करण्यात येते. एखाद्या तारकाविश्वाचा आकार कसा आहे, त्यावरून त्यात काय वेगळेपणा आहे हे समजून येते. एखाद्या तेजोमेघात काय बदल झाले आहेत तसेच त्याच्या प्रकाशाच्या तीव्रतेवरून त्या खगोलीय पदार्थाच्या रचनेतील बदलांची माहिती मिळते. सीसीडींचा उपयोग खगोलीय पदार्थाचा वर्णपटल घेण्याकरिताही होतो. त्यांच्या अभ्यासातून त्या पदार्थाच्या रासायनिक घटकांची माहिती मिळते. त्याचा डॉप्लर परिणाम शोधून तो पदार्थ आपल्या जवळ येत आहे की आपल्यापासून दूर जात आहे तेही किती प्रमाणात ही माहिती मिळते.
रेडिओ दुर्बिणींचा वापर हायड्रोजन वायूसारख्या इतर वायूंच्या मॅपिंगसाठी किंवा पल्सारसारख्या एक सेकंदापेक्षाही कमी वेळात फिरणाऱ्या खगोलीय पदार्थाच्या अभ्यासासाठी करण्यात येतो.
या सर्व प्रकारांच्या अभ्यासासाठी खूप मेहनत आणि चिकाटी लागते. इथे प्रत्येक क्षण मोलाचा असतो. तुम्हाला तुमच्या निरीक्षणांची अचूकता परत परत तपासून घ्यावी लागते. एका रात्रीत किंवा दिवसात घेतलेल्या निरीक्षणांचा अभ्यास पूर्ण करण्याकरिता कधी कधी काही महिनेसुद्धा लागू शकतात. त्याची तयारी ठेवावी लागते. खगोलीय निरीक्षणांची एक महत्त्वाची बाब म्हणजे सैद्धांतिक आकडे मोडीतून केलेल्या भाकितांची सत्यता तपासून बघणे ही आहे. प्रत्येक निरीक्षण हे नवेच असते, त्यामुळे निरीक्षक हा डोळ्यात तेल घालूनच निरीक्षणे घेत असतो आणि त्याचमुळे खगोलीय निरीक्षणे हा एक रोमांचकारी अनुभव असतो.
अरविंद परांजपे
(लेखक नेहरू तारांगणचे संचालक आहेत. )