मुलाखतीसाठी सादर करावयाच्या बायोडेटामध्ये थोडक्यात आपला छंद नमूद करायचा असतो. दोन-चार ओळींमध्ये लिहिलेला हा छंद तुमच्या मुलाखतीची दिशा आणि दशा ठरवतो आणि तुमच्या यश/अपयशाचे महत्त्वाचे कारण बनतो. त्यामुळे पुढील दोन लेखांमध्ये छंदाबाबत विस्तृत चर्चा करण्यात येईल.

मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये उमेदवाराच्या छंदाविषयी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे प्रमाण सर्वात जास्त असते. म्हणून बायोडेटामध्ये आपल्या छंदाची नोंद करताना अतिशय काळजीपूर्वक, पूर्ण विचारांतीच करावी. यशस्वी उमेदवार व मार्गदर्शकांशी चर्चा करूनच याबाबत निर्णय घ्यावा. सहकारी उमेदवार मित्राने लिहिलेला छंदच आपल्या बायोडेटामध्ये तसाच्या तसा उतरवून काढण्याची वाईट सवय अनेकांना असते. पण मुलाखतीसाठी ती अतिशय नुकसानकारक, घातक सिद्ध होऊ शकते.

छंद ही प्रत्येकाची व्यक्तिगत नसíगक आवड, अभिरुचीची बाब असते. व्यक्तीची अभिरुची आणि आवडीच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचे विविध पलू, विचार, धारणा तपासली जाऊ शकते. त्यामुळे याबाबत विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. छंद हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाची पारख करण्यासंदर्भात सर्वाधिक महत्त्वपूर्ण पलू सिद्ध होऊ शकतो. छंदाविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सहज-नसíगक, माहितीपूर्ण आणि तर्कशुद्ध असतील तर तुमची मुलाखत प्रभावशाली ठरेल.

व्यक्ती आपल्या व्यस्ततेतून, कामाच्या व्यापातून खास वेळ काढून आपली अभिरुची जोपासत असेल त्याविषयी सर्व बारीक-सारीक तपशिलाची माहिती मिळवली असेल तर तो छंद ठरू शकेल. साहित्य, संगीत, गायन, वादन, अभिनय, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, जुन्या वस्तू (नाणी, मूर्ती, तिकिटे इ.) यांचा संग्रह, एखादा विशेष क्रीडा प्रकार, चित्रपट पाहणे, पाककौशल्य, योग, पर्यटन, गिर्यारोहण, वाचन, लेखन, काव्यलेखन, संबंधित समाज सेवा असे किंवा अशा स्वरूपाची अभिरुची ही छंद होऊ शकते.

मुलाखतीमध्ये छंदाला विशेष महत्त्व असते कारण तो तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावत असतो. प्रत्येकाची स्वत:ची अशी आवड-निवड असते. ती व्यक्तिसापेक्ष भिन्न असू शकते. आपली विशेष आवड, अभिरुची किंवा छंद काय आहे, हे उमेदवारांनी गांभीर्याने विचार करून निश्चित केले पाहिजे. आपल्या विशेष छंदाविषयी तुम्हाला स्पष्ट जाणीव असली पाहिजे. तुमचे छंद विशेष आवडीने जोपासलेले असले पाहिजेत. छंद जोपासण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला असला पाहिजे. आपल्या छंदाविषयी विस्तृत, सूक्ष्म आणि अद्ययावत माहिती तुमच्याकडे असली पाहिजे. याबाबतच्या घडामोडी, नवे शोध याबाबत तुमच्याकडे स्वत:चे असे मत असले पाहिजे. विषयाची गरज असेल तिथे विश्लेषणात्मक मुद्दे मांडता आले पाहिजेत. तुम्ही एक-दोन पर्यटनस्थळांना भेटी दिल्या म्हणजे पर्यटन हा तुमचा छंद आहे हे सिद्ध होत नाही. मुलाखत मंडळावर अशा गोष्टींचा सकारात्मक प्रभाव पडत नाही. तुमचा छंद तुम्ही मनापासून जोपासत असला पाहिजे. त्याविषयी विचारले जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याची क्षमता उमेदवारात असली पाहिजे.

छंद हा व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. याद्वारे उमेदवाराचा मानसिक स्तर, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कळतो. मुलाखत मंडळाचे सदस्य तज्ज्ञ, अनुभवी असतात. छंदाविषयी ते चौकस प्रश्न विचारू शकतात. बायोडेटामध्ये एखाद्या छंदाचा उल्लेख करणे ही केवळ औपचारिकता नाही. त्याविषयी गंभीर असणे आवश्यक आहे. तुमचा छंद, तुम्हाला मुलाखत मंडळासमोर अभिव्यक्त व्हायला एक चांगली संधी उपलब्ध करून देतो. अशी संधी तुमच्यासाठी यशाची दारे उघडण्याला कारण ठरू शकते. यासाठी एखादा विशिष्ट छंदच का जोपासला अशा सामान्य प्रश्नापासून त्याविषयी आवश्यक वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक माहिती विचारली जाऊ शकते. त्यामुळे याबाबत खोलवर माहिती आपल्या जवळ असली पाहिजे. मुलाखतीची तयारी करताना या बाबी काळजीपूर्वक तयार कराव्यात.

छंद हा काही खूप मोठा गुंतागुंतीचा विषय नव्हे, पण त्यामध्ये पारदर्शकता असणे अत्यंत आवश्यक आहे म्हणून त्याबाबत मुलाखतीमध्ये सावध असणे आवश्यक आहे. छंद जोपासला असेल तर तो तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग असतो. त्यामुळे त्याचा गांभीर्याने विचार करा. यासाठी करावयाच्या तयारीबाबत पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येईल.