संस्था, संघटना आणि आयोग

अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळ्या मुद्दय़ांच्या अनुषंगाने संस्था व संघटनांचा वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे. या संस्था व संघटना मानवी हक्कांची अंमलबजावणी किंवा मानवी संसाधन विकास या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांचा अभ्यास त्या त्या मुद्दय़ांबरोबर केला तरी चालेल किंवा पारंपरिक अभ्यासाचा भाग म्हणून सगळ्यांचा एकत्र अभ्यास केला तरी चालेल. एकत्रित अभ्यास केला तर नोट्स ज्या त्या मुद्दय़ांमध्ये समाविष्ट कराव्यात. यामुळे एका मुद्दय़ाची उजळणी करताना संबंधित सगळे मुद्दे एकाच वेळी व एकत्रितपणे मिळतील.

आंतरराष्ट्रीय व संघटनांचा अभ्यास करताना पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत – 

  • स्थापनेची पाश्र्वभूमी
  • स्थापनेचा उद्देश व कार्यकक्षा
  • संस्थापक
  • भारत सदस्य / संस्थापक सदस्य आहे का ?
  • संस्थेचे बोधवाक्य
  • शक्य असल्यास बोधचिन्ह
  • स्थापनेचे वर्ष
  • रचना
  • कार्यपद्धती
  • ठळक काय्रे, निर्णय, घोषणा
  • वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे
  • संस्थेला मिळालेले पुरस्कार
  • संस्थेकडून देण्यात येणारे पुरस्कार
  • असल्यास भारतीय सदस्य
  • संस्थेचे अहवाल व त्यातील भारताचे स्थान.

यातील काही मुद्दय़ांच्या आधारे भारतामध्ये मानव संसाधनामध्ये कार्यरत असलेल्या शासकीय व स्वयंसेवी संघटनांचाही अभ्यास करणे शक्य आहे. या संस्था संघटनांसाठी लक्षात घ्यायचे मुद्दे पुढीलप्रमाणे :

  • स्थापनेची पाश्र्वभूमी
  • शिफारस करणारा आयोग / समिती
  • स्थापनेचा उद्देश
  • बोधवाक्य / बोधचिन्ह
  • मुख्यालय
  • रचना
  • कार्यपद्धत
  • जबाबदाऱ्या
  • अधिकार
  • नियंत्रण करणारे विभाग
  • खर्चाची विभागणी
  • वाटचाल
  • इतर आनुषंगिक मुद्दे

आतापर्यंत मानवी हक्क घटकाच्या मूलभूत व पारंपरिक अभ्यासाबाबत चर्चा करण्यात आली. यापुढे या घटकाचा संकल्पनात्मक व विश्लेषणात्मक अभ्यास कसा करावा, याची चर्चा करण्यात येईल.

मानवी हक्क – विश्लेषणात्मक अभ्यास

मूल्ये व नीतितत्त्वे यांची जोपासना हा घटक संकल्पनात्मक आणि विश्लेषणात्मक अशा दोन्ही बाजूंनी महत्त्वाचा आहे. मूल्ये व नीतितत्त्वांची मानवी हक्क व मानव संसाधन विकासातील भूमिका महत्त्वाची आहे. त्यांची जोपासना म्हणजेच मानवी सभ्यतेच्या पालनासाठीचे प्रशिक्षण हे लक्षात घेणे आवश्यक आहे. कुटुंब, शिक्षणसंस्था या औपचारिक व अनौपचारिक संस्थांच्या माध्यमातून मूल्ये व नीतितत्त्वे कशा प्रकारे रुजविण्यात येतात त्याचा आढावा घेणे गरजेचे आहे.

धर्म व प्रसारमाध्यमे यांद्वारे होणारे मूल्यशिक्षण हा चिंतन व विश्लेषणाचा विषय आहे.

मानवी हक्कांपासून वंचित राहिल्यास कोणत्याही सर्वसाधारण व्यक्तीस जाणवणाऱ्या समस्या सर्वप्रथम समजून घ्यायला हव्यात. निरक्षरता, बेरोजगारी, दारिद्रय़, िहसा, शोषण, गुन्हेगारी, दहशतवाद, भ्रष्टाचार इत्यादी समस्यांचे मानवी हक्कांच्या संदर्भाने समस्यांचे स्वरूप, त्यांची कारणे, परिणाम, उपाय या मुद्दय़ांच्या आधारे विश्लेषण करणे आवश्यक आहे. याबाबत काही आंतरराष्ट्रीय संघटनांचे अहवाल असल्यास त्यांचा आढावा घ्यायला हवा. या अनुषंगानेच जागतिकीकरणामुळे या समस्यांच्या स्वरूपामध्ये, तीव्रतेमध्ये होणाऱ्या परिणामांबाबत वृत्तपत्रे, टीव्ही, इंटरनेट इ. माध्यमांतून होणारी विश्लेषणात्मक चर्चासुद्धा पाहायला हवी.

या समस्यांवरील पायाभूत उपाय म्हणून मानवी हक्क व सभ्यतेचे पालन करण्याबाबत प्रशिक्षण देण्याची गरज समजून घ्यावी. असे प्रशिक्षण कशा प्रकारे, कोणत्या माध्यमातून देता येऊ शकते, याबाबत चर्चा व चिंतन करणे आवश्यक आहे. या दृष्टीने मूल्ये व नीतितत्त्वे यांची जोपासना हा घटक महत्त्वाचा आहे. मूल्ये व नीतितत्त्वांची मानवी हक्क व संसाधन विकासातील भूमिका महत्त्वाची आहे. त्यांची जोपासना म्हणजेच मानवी सभ्यतेच्या पालनासाठीचे प्रशिक्षण हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

कुटुंब, शिक्षणसंस्था या औपचारिक व अनौपचारिक संस्थांच्या माध्यमातून मूल्ये व नीतितत्त्वे कशा प्रकारे रुजविण्यात येतात त्याचा आढावा घेणे गरजेचे आहे. धर्म व प्रसारमाध्यमे यांद्वारे होणारे मूल्यशिक्षण हा चिंतन व विश्लेषणाचा विषय आहे.