एमपीएससी मंत्र : मन में हो विश्वास!

स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीमध्ये मंडळाच्या सदस्यांचा सर्वच उमेदवारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तटस्थ असतो.

स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीमध्ये मंडळाच्या सदस्यांचा सर्वच उमेदवारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तटस्थ असतो. कोणत्याही उमेदवाराबाबत कसलाही पूर्वग्रह त्यांनी बाळगलेला नसतो. मुलाखतीदरम्यान उमेदवार तणावरहित व दबावमुक्त होऊन सहजपणे मुलाखतीस सामोरा जाईल याची ते काळजी घेतात. प्रश्नाला प्रतिसाद देण्यासाठी पुरेसा वेळ उमेदवाराला दिला जातो. या मुलाखती नेहमीच प्रसन्न वातावरणात पार पडतात, त्यामुळे उमेदवारांनीही मुलाखतीस सहजपणे व उत्साहाने सामोरे जायला हवे.

सध्याच्या स्पर्धात्मक युगात प्रभावी व्यक्तिमत्त्वाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. व्यक्तिमत्त्व म्हणजे बाह्य़ सौंदर्य असा मर्यादित अर्थ नाही, तर व्यक्तीच्या अंतर्गत गुणांचा विकासालाही खूप महत्त्व आहे. व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी बुद्धिमत्तेबरोबरच निर्णय घेण्याची क्षमता, संवाद कौशल्य, आत्मविश्वास, बुद्धिमत्तेचा आणि कल्पनेचा सर्जनात्मक वापर, धर्य, नेतृत्वगुण, सकारात्मक वृत्ती, कठोर परिश्रम करण्याची तयारी, दृढ इच्छाशक्ती, लवचीकता, पारदíशकता, स्पष्टपणा, ताíककता, शिष्टाचार या सर्व पलूंचा विकास होण्याची गरज आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्वाची निर्मिती ही एक-दोन दिवसांची नव्हे तर निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, हे नेहमी लक्षात ठेवायला हवे. व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी आवश्यक गुणांची व आवश्यक प्रयत्नांची चर्चा या व पुढील काही लेखांमध्ये करू.

आत्मविश्वास

मुलाखतीमध्ये उमेदवाराचा आत्मविश्वास जोखला जातो. तो त्याच्या देहबोलीत, बोलण्यात व विचारांमधून स्पष्टपणे दिसून यायला हवा. व्यक्तीला यश मिळविण्यासाठी अंतर्गत प्रेरणा आणि सामथ्र्य आत्मविश्वासातून मिळते. परिश्रमाची पराकाष्ठा केल्याशिवाय आत्मविश्वास जागृत होत नाही. जर ध्येयावर लक्ष ठेवून कठोर प्रयत्न केले असतील तर लेखी परीक्षाच नाही तर मुलाखतीतसुद्धा आत्मविश्वासाने उत्तरे देता येतील. प्रगतिपथावर अग्रेसर राहण्यासाठी आत्मविश्वासाच्या भक्कम पायावर व्यक्तिमत्त्वाची इमारत उभी केली पाहिजे.

सातत्यपूर्ण प्रयत्न

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रयत्नांमध्ये सातत्य असणे ही आवश्यक बाब आहे. केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी लागणारा कालावधी हा पूर्व, मुख्य व मुलाखत असा एक वर्षांचा असतो. स्पर्धा परीक्षेच्या एका प्रयत्नासाठी किमान एक वर्ष आधीपासून तयारी करणे अपेक्षित असते. म्हणजेच परीक्षेच्या एका प्रयत्नासाठी दोन वष्रे लागतात. बहुतांश उमेदवारांना यशस्वी होण्यासाठी दोन-तीन प्रयत्न लागतात. यशापर्यंत पोहोचायला दोन ते चार वर्षांचा कालावधी गृहीत धरल्यास या दीर्घ कालावधीमध्ये सातत्य राखणे ही एका अर्थाने उमेदवारांच्या संयमाचीच परीक्षा असते. एखाद्या उमेदवाराची बुद्धिमत्ता कुशाग्र असली तरीही त्याच्या प्रयत्नांमध्ये सातत्य नसेल तर तो स्पध्रेत मागे पडू शकतो. त्यामुळे आपल्या प्रयत्नांमध्ये उतावळेपणाला अजिबात स्थान असता कामा नये.

शिष्टाचार

ज्ञानाची संपन्नता शिष्टसंमत आणि सौम्य वर्तणुकीच्या कोंदणात अधिक प्रभावी होते. उमेदवाराच्या वागण्यात उद्दामपणा, हटवादीपणा, विचारांमध्ये जहालपणा, आक्रमक देहबोली आदी गोष्टी नजरेस आल्या तर त्याच्याकडे कितीही प्रगल्भ मुद्दे असले तरी तो यशापासून दूर जाण्याची शक्यता असते. त्याच्या वागण्या-बोलण्यातून मुलाखत मंडळाचे त्याच्याबाबत एक नसíगक मत बनत असते. त्यामुळे याबाबत फक्त मुलाखतीच्या दिवशीच नाही तर नेहमीच सतर्क राहायची सवय बाणवून घ्यायला हवी.

सकारात्मक विचार

व्यक्तिमत्त्वाचे उत्तम पोषण होण्याकरिता समतोल व सकारात्मक विचारांचे योगदान मोलाचे असते. सकारात्मक विचार करायची सवय असेल तर कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्वच्छ राहतो. सकारात्मकता व्यक्तिमत्त्व समृद्ध करते. मुलाखतीदरम्यान जर-तर सारखे एखाद्या प्रसंगामध्ये तुमचा प्रतिसाद काय असू शकेल हे जोखणारे प्रश्न विचारले तर त्यांची योग्य उत्तरे देण्यासाठी ही सकारात्मकताच कामी येते.

दृढ संकल्पशक्ती

दृढ संकल्पामुळेच अवघड ध्येय साध्य होते ‘मुश्कील नही कुछ अगर ठान लीजिए’ हे तत्त्व लक्षात घेऊन ध्येयपथावर पुढे गेले पाहिजे. संकल्पामध्ये खूप सामथ्र्य असते. यासाठी आपले ध्येय ठरवून मार्गक्रमण केले पाहिजे. दृढ संकल्पासाठी स्थिर मनाची आवश्यकता असते. मन स्थिर असेल तर ते विचलित होणार नाही व तुम्ही ध्येयपथावर पुढे जात राहाल. मनाचे स्थर्य संकल्पशक्ती वाढवू शकते. भटकणारे मन संकल्पशक्ती क्षीण करते. ध्येय ठरवून स्थिर मनाने ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. एक चांगली योजना तयार करा. धर्याने आणि विश्वासाने पुढे जा. दृढ इच्छाशक्ती आणि मन स्थिर ठेवून पुढे गेलात तर सफलता सहज मिळू शकेल.

संकल्पशक्ती बळकट करण्यासाठी सतत सकारात्मक विचार आणि प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहेत. नकारात्मक भावनांना बाजूला ठेवा. आपल्या प्रयत्नांचे सातत्याने आणि तटस्थपणे विश्लेषण करणे आवश्यक आहे. आपल्या क्षमतांचे मूल्यमापन करा. आवश्यकतेप्रमाणे त्यांचा विकास करा. स्वत:ला तपासून घ्या. भाग्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वत:च्या कर्मावर विश्वास ठेवावा. प्रसिद्ध शायर नूर लखनवी यांचा शेर आहे.

मेरे हाथों की लकीरों के इजाफे हैं गवाह
मैंने पत्थर की तरह खुद को तराशा है बहोत

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mpsc exam preparation tips