केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांतर्गत एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमांमध्ये २०१७ या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (अंडर ग्रॅज्युएट) २०१७ उर्फ ‘नीट’(ठएएळ) या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमदेवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत-

आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदार विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र अथवा बायोटेक्नॉलॉजी या विषयांसह कमीतकमी ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. गुणांच्या टक्केवारीची अट राखीव वर्गगटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार ४५% पर्यंत शिथिलक्षम आहे.

विशेष सूचना- जे विद्यार्थी वरील विषयांसह २०१७ मार्चमध्ये बारावीची परीक्षा देणार असतील तेसुद्धा वरील प्रवेश पात्रता परीक्षा देण्यासाठी पात्र आहेत.

वयोगट- अर्जदार विद्यार्थी खुल्या वर्गगटातील असल्यास त्यांचा जन्म ८.५.१९९२ ते १.१.२००१ च्या दरम्यान व ते राखीव वर्गगटातील असल्यास त्यांचा जन्म ८.५.१९८७ ते १.१.२००१ च्या दरम्यान झालेला असावा.

निवड प्रक्रिया- अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट २०१७ ही प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. ही परीक्षा ७ मे २०१७ रोजी होईल. वरील प्रवेश पात्रता परीक्षा विश्लेषणपर पद्धतीवर व १८० प्रश्नांची असेल. परीक्षेचा कालावधी निर्धारित तारखेला सकाळी १० ते १ अशा तीन तासांचा असेल. प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीच्या आधारे संबंधित महाविद्यालयात विद्यार्थ्यांना वैद्यक विज्ञान विषयातील एमबीबीएस/ बीडीएस या पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षांला प्रवेश देण्यात येईल.

विशेष सूचना- वरील नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी संबंधित विद्यार्थ्यांना जास्तीतजास्त तीन संधी उपलब्ध होतील.

अर्जासह भरावयाचे शुल्क- अर्जदार सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांनी १४०० रु. (राखीव वर्गगटातील उमेदवारांसाठी ७५० रु.) शुल्क म्हणून संगणकीय पद्धतीने भरणे आवश्यक  आहे.

अधिक माहिती व तपशील- वरील प्रवेश पात्रता परीक्षेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, नवी दिल्लीच्या दूरध्वनी क्र. ०११- २२०४१८०७ अथवा ०११-२२०४१८०८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अथवा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या http://www.cbseneet.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर प्रवेश अर्ज करण्याची शेवटची तारीख १ मार्च २०१७.

बारावी उत्तीर्ण अशा ज्या पात्रताधारक विद्यार्थ्यांना वैद्यकशास्त्र क्षेत्रातील एमबीबीएस/ बीडीएस या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल अशांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (यूजी) २०१७ या प्रवेश पात्रता परीक्षेचा लाभ घ्यावा.