साहाय्यक कर अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या तिन्ही पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठीच्या पूर्वपरीक्षेची तयारी कशी करावी, याविषयी आजच्या लेखात माहिती घेऊ.

इतिहासाचा अभ्यास केवळ तथ्ये/फॅक्ट्स व घटना मालिका पाठ करून पूर्ण होत नाही. राजकीय व सामाजिकदृष्टय़ा महत्त्वाच्या घटनांचा क्रम लक्षात ठेवावा लागतो. पण त्यासाठी केवळ पाठांतर करून भागणार नाही. घटनांमधील परस्पर संबंध, कारणे, परिणाम असे आयाम समजून घेतल्यास घटना व त्यांचा क्रम दोन्ही व्यवस्थित समजतात आणि लक्षातही राहतात. महाराष्ट्राचा इतिहास भारताच्याच इतिहासाचा भाग म्हणून अभ्यासणे आवश्यक आहे. मात्र काही समाज सुधारक व स्वातंत्र्यसनिक यांचे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे योगदान असल्याने त्यांचा अतिरिक्त अभ्यास करणे गरजेचे आहे. मागील काही वर्षांपासून संयुक्त महाराष्ट्र तसेच महाराष्ट्रातील समाजसुधारक व क्रांतिकारक यांच्यावर प्रश्न विचारण्याचा ट्रेन्ड वाढलेला आहे. इतिहासाच्या अभ्यासासाठी मुबलक संदर्भ साहित्य उपलब्ध आहे. यामध्ये राज्य पाठय़पुस्तक मंडळाची पाचवी ते बारावी इतिहास विषयाची पुस्तके, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास – अनिल कठारे; बिपिन चंद्रा, ग्रोव्हर, बेल्हेकर, के सागर, स्टडी सर्कल, चाणक्य मडल, युनिक, भगीरथ, ज्ञानदीप प्रकाशन अशा विविध प्रकाशनांची प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी मुबलक पुस्तके उपलब्ध आहेत.

जगाच्या भूगोलामध्ये महत्त्वाचे प्राकृतिक प्रदेश, अक्षांश, रेखांश, महत्त्वाची भुरूपे, हवामानाचे घटक, हवामान विभाग मान्सून, जागतिक तापमानवाढ या घटकांचा अभ्यास आवश्यक आहे. अभ्यासक्रमामध्ये देण्यात आलेले महाराष्ट्राच्या भूगोलातील सर्व घटक छोटय़ा छोटय़ा बारकाव्यांसह समजून घेणे आवश्यक आहे. यामध्ये खूप मोठा भाग हा तथ्यात्मक आहे त्यामुळे फ्लॅश कार्डस, टेबल्स अशा स्वरूपात मुद्दे लक्षात ठेवण्यासाठी नोट्स काढता येतील. याव्यतिरिक्तदेशाच्या भौगोलिक प्रणालींबाबतही प्रश्न विचारण्याची शक्यता काही मुद्दय़ांबाबत गृहीत धरावी लागेल. त्यासाठी त्याविषयीच्या ठळक मुद्दय़ांचा आढावा घेणे सयुक्तिक ठरेल.

भारतीय राज्यव्यवस्था विषयाच्या तयारीचा बेस आहे. राज्यघटनेचा अभ्यास, घटनेतील मूलभूत हक्क, कर्तव्ये, नीतीनिर्देशक तत्त्वे, घटनात्मक पदे, महिला, मुले, अपंग, मागासवर्ग, अल्पसंख्याक या सामाजिक घटकांसाठीच्या तरतुदी, घटनादुरुस्ती याबाबतची कलमे व तरतुदी तोंडपाठ असायला हव्यात. द्र-राज्य संबंध, न्यायालयीन उतरंड, महत्त्वाच्या संज्ञा समजून घ्यायला हवेत. पंचायती राज व्यवस्था, बारकाईने समजून घ्यायला हवी. चच्रेत असलेले तसेच प्रस्तावित कायदे, नियम, धोरणे यांचाही अभ्यास आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्णय माहीत असावेत.

अर्थव्यवस्था या घटकाच्या अभ्यासाची सुरुवात अर्थव्यवस्था विषयाच्या मूलभूत संकल्पना समजून घेऊन करायला हवी. विशेषत: अभ्यासक्रमामध्ये उल्लेख असलेल्या संकल्पना बारकाईने समजून घ्याव्यात. या संकल्पना व्यवस्थित समजून घेतल्यावर संबंधित मुद्दय़ांची आकडेवारी (टक्केवारी) नोंदवून घ्यावी. रोजगार, दारिद्रय़ या संकल्पनांचा अभ्यास करताना पुढील गोष्टींचा विचार करावा. महत्त्वाच्या संज्ञा, व्याख्या, स्वरूप, समस्या, कारणे, परिणाम, उपाययोजना अशा आठ आयामांचा विचार करून अभ्यास करावा. याबाबतच्या महत्त्वाच्या समित्या व त्यांच्या शिफारशींचा आढावा घेता आल्यास उत्तम. मानव विकास अहवाल व तत्सम निर्देशांकांची अद्ययावत माहिती करून घ्यावी.

सामान्य विज्ञानामध्ये जास्त भर जीवशास्त्र या विषयावर असतो. त्यातही मानवी आरोग्यशास्त्रावर विशेष भर असतो. मानवी आरोग्याशी संबंधित बाबींचा अभ्यास टेबल फॉरमॉटमध्ये करता येईल. अवयव संस्थांचा अभ्यासही गरजेचा आहे. औषधी व आíथक महत्त्वाच्या वनस्पतींचा आढावा घ्यावा. रसायनशास्त्राच्या उपयोजित बाबींवर जास्त भर द्यावा. तसेच काही मूलभूत संकल्पना व अभिक्रिया समजून घ्याव्यात. भौतिकशास्त्रातील पारंपरिक मूलभूत संकल्पनांबरोबरच इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील चालू घडामोडी लक्षात घेणे गरजेचे आहे. उदा. मोबाइल, संगणक यांतील अद्ययावत उपकरणे किंवा प्रणालींची मूलभूत शास्त्रीय माहिती.

चालू घडामोडींच्या नोटस् सूत्रबद्धपणे पुढीलप्रमाणे काढता येतील – केंद्र व राज्य सरकारच्या योजना, धोरणे व त्यातील महत्त्वाचे मुद्दे, देशावर प्रभाव टाकू शकणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घटना, ठळक पर्यावरणीय व भौगोलिक घटना, त्याबाबतचे निर्णय, अर्थव्यवस्था व राज्यव्यवस्थेसंबंधी घडामोडी, विज्ञान तंत्रज्ञानविषयक घडामोडी, महत्त्वाच्या परिषदा, संघटना, चच्रेतील व्यक्ती, त्यांचे कार्यक्षेत्र, नियुक्त्या-निवड-बढती, पुरस्कार, सन्मान, पारितोषिके, ग्रंथ लेखक, निधन, महत्त्वाच्या चच्रेतील कंपन्या, संस्था त्यांचे प्रमुख, त्यांचे उत्पादन क्षेत्र, चच्रेतील ठिकाणे, विज्ञानातील शोध व त्यातील संकल्पना, महत्त्वाच्या समित्या-आयोग व त्यांचे अहवाल, महत्त्वाची आíथक आकडेवारी, महत्त्वाची विधेयके, कायदे व घटनादुरुस्त्या, महत्त्वाचे न्यायालयीन निवाडे इ.