राज्यसेवा परीक्षेच्या वारंवार बदलणाऱ्या स्वरूपाची एव्हाना सर्वच उमेदवारांना सवय झाली असेल. प्रत्येक वेळी जाहीर होणारा बदल त्या वेळेपुरता मोठा, ऐतिहासिक वगरे वाटतो आणि एका पेपरनंतर तो साच्यातील अभ्यासक्रम/ परीक्षा पद्धती वगैरे उमेदवारांच्या अंगवळणीही पडते. असाच बदल भाषाविषयक पेपरमध्ये आयोगाने सन २०१६च्या मुख्य परीक्षेपासून केला. मराठी व इंग्रजी असे दोन वेगळे पारंपरिक पेपर बदलून मराठी व इंग्रजी (एकत्रित) पारंपरिक आणि मराठी व इंग्रजी (एकत्रित) वस्तुनिष्ठ असे दोन पेपर साकारले गेले. पारंपरिक पेपर १०० गुणांसाठी तीन तासांत तर वस्तुनिष्ठ पेपर १०० गुणांसाठी एका तासात सोडवायचा आहे. या लेखामध्ये वस्तुनिष्ठ पेपरच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

वस्तुनिष्ठ पेपरमध्ये मराठी व इंग्रजी विषयांसाठी प्रत्येकी ५० गुणांसाठीचे बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतात. दोन्ही भाषांसाठी व्याकरणावर प्रत्येकी ४५ आणि उताऱ्यावरील आकलनाचे प्रत्येकी ५ प्रश्न विचारण्यात आले आहेत. १०० गुणांसाठी १०० प्रश्न ६० मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. पेपरचा स्तर पदवी परीक्षेचा राहणार असल्याचे अभ्यासक्रमामध्ये नमूद करण्यात आले आहे. सन २०१६चा पेपर पाहिल्यावर योग्य प्रकारे तयारी केली तर हा पेपर आत्मविश्वासाने सोडविता येईल, अशा काठीण्य पातळीचा असल्याचे दिसते.

या पेपरच्या अभ्यासक्रमाचे व्याकरण, म्हणी-वाक्प्रचार आणि आकलन असे ढोबळमानाने तीन भाग दिसून येतात. व्याकरणावरील प्रश्नांची तयारी करताना दोन्ही भाषांच्या व्याकरणाचे नियम समजून घेणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. मराठीतील विभक्ती प्रत्ययांचे टेबल किंवा इंग्रजीमधील काळ व प्रयोगांच्या वाक्यरचनेचा टेबल पाठच असायला हवेत. शब्द रचनेचे मराठीतील नियमही माहीत असणे आवश्यक आहे. वाक्यरचनेचे नियम पक्के माहीत असतील तर वाक्य रूपांतरणाचे प्रश्न नक्कीच सोडवता येतात. मात्र नियम आणि त्यांच्या चौकटी फक्त माहीत असून उपयोगाचे नाही. त्यांचा वेगवेगळ्या उदाहरणांशी संबंध ओळखता येणे महत्त्वाचे आहे. या नियमांचा वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये शब्दरचना/वाक्यरचना करताना कशा प्रकारे वापर करण्यात येतो हे समजून घेणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमामध्ये संधी, समास, अलंकार, शब्दरचना, काळ, वाक्य पृथ:करण अशा बाबींचा स्वतंत्र उल्लेख केलेला नाही. मात्र त्यांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे व्याकरण या व्याख्येत जे काही येते त्याबाबत आपल्याला माहिती असणे आणि ही माहिती नेमकी व अचूक असणे हे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक आहे. नियम व्यवस्थित समजून घेणे आणि त्यांचा वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये वापर करण्याचा सराव करणे हा या भागाच्या तयारीसाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे.

म्हणी व वाक्प्रचार हे कोणत्याही भाषेला समृद्ध करतात. यावरील प्रश्न सोडविण्यासाठी अवांतर वाचन आणि कॉमन सेन्स यांची खूप मदत होते. अवांतर वाचनामुळे नजरेखालून जाणाऱ्या म्हणी, वाक्प्रचार यांचा इतर प्रसंगांशी संबंध जोडता येणे कॉमन सेन्समुळे शक्य होते. तयारीच्या काळात अवांतर वाचनासाठी वेळ काढणे शक्य नसेल तर म्हणी, वाक्प्रचार यांचे संकलन असलेले छोटेसे पुस्तक किंवा एखादी प्रिंट आऊट सोबत बाळगायला हवे. त्यातील म्हणी, वाक्प्रचार वाचून त्यांचा अर्थ समजून घ्यायला हवा. अर्थाची उकल झाली की त्यांचा उदाहरणांमध्ये वापर करणे किंवा केलेला वापर योग्य आहे की नाही हे कळणे सोपे होते.

समानार्थी/विरुद्धार्थी शब्दांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रश्नातील शब्दाचा अर्थ नेमकेपणाने माहीत असायला हवा. मराठीतील शब्दांच्या ऱ्हस्व-दीर्घ वेलांटी/उकारांमधील बदलामुळे तसेच काना/मात्रा/वेलांटीची जागा बदलल्याने शब्दांचे अर्थ बदलतात हे लक्षात ठेवायला हवे.  उदा. पाणि(हात) आणि पाणी(जल). इंग्रजीमधील एकसारख्या उच्चाराचे/स्पेिलगचे पण वेगळे अर्थ असणारे शब्द चकवणारे ठरतात. उदा. Expect  आणि except या शब्दामध्ये गोंधळ उडू शकतो.

त्यामुळे प्रश्नातील शब्द काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

पदवी परीक्षेची काठीण्य पातळी आहे म्हटल्यावर व्याकरणाचे नियम सरळसोटपणे वापरून भागत नाही. वाक्याचा नेमका अर्थ समजून घेतल्यावरच प्रश्न व्यवस्थित सोडविता येईल. एकूणच वस्तुनिष्ठ भाषा म्हटले तरी भाषेतील वेगवेगळ्या अर्थछटा माहीत करून घेतल्या तर हा पेपर कमी वेळेमध्ये यशस्वीपणे सोडविता येईल.