रोहिणी शहा

आर्थिक व्यवसाय म्हणून शेती आणि तिच्याशी पूरक पशुसंवर्धन मत्स्यव्यवसाय इत्यादी क्षेत्रे, शेतीमधील तंत्रज्ञान आणि अन्न सुरक्षेतील महत्त्वाचा घटक म्हणून शेती अशा मुद्दय़ांचा अभ्यास कशा प्रकारे करावा, याबाबत या लेखात चर्चा करण्यात येत आहे.

आर्थिक व्यवसाय शेती

महाराष्ट्रातील कृषी हवामान विभागांच्या आधारे महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचा संकल्पनात्मक आणि तथ्यात्मक अभ्यास एकाच वेळी करणे शक्य आहे. मृदेचा प्रकार, महत्त्वाची पिके, जलव्यवस्थापन, सिंचन पद्धती इत्यादींचा अभ्यास स्वरूप, समस्या, कारण, उपाय या चार पैलूंच्या आधारे करावा. समस्यांचा विचार करताना नैसर्गिक स्थान स्वरूपामुळे निर्माण होणाऱ्या, चुकीच्या पीक पद्धतीमुळे निर्माण होणाऱ्या, खतांच्या वापरामुळे, सिंचन पद्धतीमुळे, रासायनिक आणि इतर प्रदूषकांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा समावेश करणे आवश्यक आहे.

मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन आणि पशुसंवर्धन या शेतीस पूरक क्षेत्रांची वैशिष्टये, गरजा, समस्या, कारणे, उपाय आणि महत्त्व इत्यादी पैलू नीट समजून घ्यावेत. या क्षेत्रांचा निर्यातीमधील आणि एकूणच कृषी क्षेत्रातील उत्पन्नामधील, जीडीपीमधील वाटा आर्थिक पाहणी अहवालामधून पाहावा. कृषी क्षेत्रासाठी होणारा जमिनीचा वापर अभ्यासताना एकूण जमिनीपैकी शेतीसाठी होणाऱ्या वापराची टक्केवारी, सिंचित क्षेत्राची टक्केवारी व क्षेत्रफळ, कोणत्या पिकासाठी किती जमीन वापरली जाते त्याची टक्केवारी आर्थिक पाहणी अहवालामधून पाहावी.

शेतीची आधुनिक तंत्रे

उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती (HYV) विकसित करण्यामागील वैज्ञानिक तत्त्व समजून घ्यावे. राज्यातील  HYV विकसित करणाऱ्या संस्था व कृषी विद्यापीठे, हरित क्रांतीमध्ये वापरलेली  HYV वाणे आणि महाराष्ट्रातील मुख्य पिकांची महत्त्वाची  HYV वाणे माहीत असायला हवीत.

जनुक संवर्धित (GM) बियाण्यांमागील तंत्रज्ञान समजून घ्यावे. त्यांच्या वापरातील आर्थिक फायदे, तोटे, पर्यावरणीय परिणाम, भारतामध्ये त्याच्या वापरामधील समस्या, कारणे, उपाय व चालू घडामोडी हे मुद्दे अभ्यासावेत.

शेतीचे यांत्रिकीकरण हा मुद्दा आवश्यकता, आर्थिक महत्त्व, फायदे, तोटे, राज्यातील शेतीच्या यांत्रिकीकरणातील अडथळे, समस्या, कारणे आणि उपाय या मुद्यांच्या आधारे अभ्यासावा. अतिसूक्ष्म (नॅनो) तंत्रज्ञानाचा शेतीमधील बियाणे विकसन, खतांचा वापर, सिंचन क्षमता संवर्धित करणे, किडनियंत्रण अशा वेगवेगळय़ा क्षेत्रांमध्ये वापर करण्यासाठी होणारे प्रयत्न समजून घ्यावेत. 

शेतीचे प्रकार

कंत्राटी शेती, उपग्रह शेती,  कार्पोरेट शेती, सेंद्रिय शेती, शाश्वत शेती, अचूक, काटेकोर शेती या सर्व प्रकारांची वैशिष्टय़े, त्यांमधील मूलभूत तत्त्व/तंत्रज्ञान, निविष्ठांचे व्यवस्थापन, आर्थिक पैलू अशा मुद्दय़ांच्या आधारे या संकल्पना आणि त्यांचे महत्त्व आणि मूल्यमापन अभ्यासायला हवे.

जलसिंचन आणि जलव्यवस्थापन

या मुद्दय़ांच्या तांत्रिक बाबी पेपर एकमधील भागात पाहिल्या आहेतच. त्यांच्या आर्थिक बाबी म्हणजे सिंचनामुळे वाढणारी उत्पादकता, सिंचनातील कमी- आधिक्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय, जल व्यवस्थापनाचे आर्थिकदृष्टय़ा महत्त्व, चुकीच्या जलव्यवस्थापनामुळे निर्माण होणारे जीवित व वित्त हानीचे धोके, त्यावरील उपाययोजना या मुद्दय़ांचा अभ्यास आवश्यक आहे.

पशुधन आणि त्याची उत्पादकता

कृषी उत्पादकतेत पशुधन संपत्तीचाही महत्त्वाचा वाटा असतो. पशुधनाची संख्या, टक्केवारी व उत्पादकतेमध्ये अग्रेसर असलेली राज्ये व राज्यातील जिल्हे यांची माहिती आर्थिक पाहणी अहवालामधून करून घ्यावी. पशुधनाची उत्पादकता वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, धवलक्रांती, रजतक्रांती, गुलाबी क्रांती इत्यादींचा आढावा महत्त्वाच्या तरतुदी, असल्यास लाभार्थी व त्यांचे निकष, लाभाचे स्वरूप, मूल्यमापन इत्यादी मुद्दय़ांच्या आधारे घ्यावा.

मत्स्यव्यवसाय

भूप्रदेशाअंतर्गत आणि अरबी समुद्रातील मासेमारी यांचा तुलनात्मक अभ्यास टेबलमध्ये पुढील मुद्दय़ांच्या आधारे करावा: आवश्यक निविष्ठा, यंत्रे, उत्पादकता, मागणी, समस्या, कारणे, उत्पादकतेवरील परिणाम व उपाय इत्यादी. मत्स्यव्यवसायातील आधुनिकीकरण ही संकल्पना उत्पादन, साठवणूक व वाहतूक/वितरण यासाठीची नवीन यंत्रे, तंत्रज्ञान, चालू घडामोडी अशा मुद्दय़ांच्या आधारे अभ्यासावी.  मत्स्यपालन, मत्स्यशेती यांचा अभ्यासक्रमात उल्लेख नसला तरी त्यांचे प्रकार, आवश्यक पायाभूत सुविधा, निविष्ठा, उत्पादन, मत्स्यबीजनिर्मिती व एकूणच मत्स्यपालन क्षेत्रासाठी प्रोत्साहन देणाऱ्या शासकीय योजना या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास आवश्यक आहे.

पारंपरिक आणि तथ्यात्मक मुद्दे

कृषीविषयक शासकीय धोरण

यात कृषी क्षेत्राशी संबंधित केंद्र आणि राज्य शासनांचे कायदे, त्यांमधील ठळक तरतुदी आणि चालू घडामोडींचा बारकाईने अभ्यास करायला हवा. वेगवेगळया पंचवार्षिक योजनांमधील (विशेषत: १०, ११ व १२ व्या) कृषिविकासासाठीची धोरणे, योजना यांचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे. निती आयोगाच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीच्या योजनांची आणि उपक्रमांतील तरतुदी, उद्दिष्टय़े अभ्यासणे आवश्यक आहे.

कृषीविषयक धोरणे अभ्यासताना जमीन सुधारणा, पीक उत्पादन, आयात-निर्यात, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन आणि पशुसंवर्धन याबाबतची शासकीय धोरणे व योजना इत्यादींचा आढावा सुरू झाल्याचे वर्ष, कालावधी, तरतूदी, लाभार्थ्यांचे निकष, लाभाचे स्वरूप, मूल्यमापन अशा मुद्दय़ांच्या आधारे घ्यावा.

अन्न व पोषण आहार

भारतातील अन्न उत्पादन व खप यामधील कल समजून घ्यायला हवा. याबाबत मागणीचा कल, साठवणूक, पुरवठा यातील समस्या, कारणे, उपाययोजना, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा परिणाम, उपाय आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे महत्त्व असे मुद्दे समजून घ्यावेत. सार्वजनिक वितरण प्रणाली, वखारी व तत्सम पायाभूत सुविधा यांच्या तयारीबाबत मागील लेखात चर्चा करण्यात आली आहे. अन्न स्वावलंबन, अन्नसुरक्षा या संकल्पना समजून घ्यायला हव्यात. अन्न सुरक्षिततेमधील समस्या, त्यांचे स्वरूप, कारणे, परिणाम आणि उपाय व त्या दृष्टीने अन्नाची आयात व निर्यात या बाबी समजून घ्याव्यात. अन्न सुरक्षा अधिनियमातील महत्त्वाच्या तरतुदी माहीत करून घ्याव्यात. हरित क्रांतीचे स्वरूप आणि पार्श्वभूमी समजून घेऊन तिचा अन्नाच्या आत्मनिर्भरतेवर झालेला परिणाम समजून घ्यायला हवा. भारतातील सामान्य पौष्टिक समस्या अन्नाचे उष्मांक मूल्य आणि त्याची मोजणी, चांगले आरोग्य आणि समतोल आहार, मानवी शरीरास आवश्यक ऊर्जा व पोषण मूल्य यांचा टेबलमध्ये अभ्यास करता येईल.

पौष्टिक सुरक्षा

भारतातील पोषणविषयक समस्या, त्याची कारणे व परिणाम, याबाबतची शासनाची धोरणे, कामासाठी अन्न, दुपारचे भोजन इत्यादी योजना आणि इतर पोषणविषयक कार्यक्रमांचा, उद्दिष्टे, स्वरूप, लाभार्थी अशा मुद्दयांच्या आधारे आढावा घ्यावा. अभ्यासक्रमामध्ये उल्लेख केलेल्या शासकीय धोरणे, योजना यांचा अभ्यास सुरू झालेले वर्ष, कालावधी, संबंधित पंचवार्षिक योजना, उद्दिष्टय़े, ध्येये, यशापयश, आर्थिक आणि राजकीय आयाम या मुद्दय़ांच्या आधारे करावा.