४जुलै २०१३ हा दिवस भारतीय टपालखात्याच्या इतिहासातला ऐतिहासिक दिवस मानायला हवा. कारण या दिवशी १६३ वर्षांपासून अव्याहतपणे सुरू असलेली तारसेवा कायमची बंद करण्यात आली. खरं तर संगणकाच्या आगमनामुळे ‘कडकट्ट कडकट्ट’चा नाद केव्हाच बंद झाला होता आणि आता संपूर्ण जगात केवळ भारतामध्येच सुरू असलेली तारसेवा १५ जुलपासून पूर्णपणे बंद झाली. भारताच्या दूरसंचार सेवेची सुरुवातच तारसेवेद्वारे झाली. १८५० साली कोलकत्यापासून तीन मलांवर असलेल्या अलीपूरपासून २७ मलांवर असलेल्या डायमंड हार्बरदरम्यान पहिली विद्युत तारसेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली. अर्थात सर्वसामान्यांपर्यंत तारसेवा पोहोचण्यासाठी १८५३ साल उजाडावं लागलं. त्यावेळी आपल्या देशावर ब्रिटिशांनी कब्जा मिळवला होता. त्यामुळे आपला कारभार सुरळीतपणे करता यावा, म्हणून ब्रिटिशांनी भारतात ज्या काही सोयीसुविधा निर्माण केल्या, त्यामध्ये रेल्वे आणि टपाल व तारसेवा यांचा प्रामुख्याने समावेश होता. १८५७च्या स्वातंत्र्य संग्रामात आपल्या सन्याला झटपट संदेश पोहोचवण्यासाठी ब्रिटिशांनी तारसेवेचा मोठा वापर करून घेतला. भारतीय स्वातंत्र्यसनिकांनी या तारसेवेचा धसका घेतला होता. त्यामुळे तारेद्वारे संदेशवहन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तारा, खांब उखडून टाकणे हा ब्रिटिशांविरुद्ध पुकारलेल्या लढाईचा भाग झाला होता.
स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर भारतीयांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरलेली तारसेवा शोधून काढण्यात एका अमेरिकन चित्रकाराचा मोलाचा वाटा होता. या चित्रकाराचं नाव होतं सॅम्युएल मोर्स! मॅसॅच्युसेट्समध्ये जन्मलेल्या सॅम्युएल यांनी आपलं पदवीचं शिक्षण येल कॉलेजमधून पूर्ण केलं. त्या काळी फारशा माहिती नसलेल्या विद्युतशास्त्रात त्यांना गोडी निर्माण झाली. त्याच वेळी त्यांना व्यक्तिचित्रे काढण्याचा छंद जडला. पण त्यांच्या वडिलांना त्यांचा हा छंद पसंत नव्हता.
त्या काळचे प्रख्यात अमेरिकन चित्रकार वॉिशग्टन ऑल्स्टन व गिल्बर्ट स्टुअर्ट यांनी मोर्स यांच्या चित्रकलेच्या व्यासंगाला प्रोत्साहन दिलं. त्याकाळी छायाचित्रणाची सोय उपलब्ध नव्हती. त्यामुळे धनाढय़ व्यक्ती चित्रकाराकडून आपलं व्यक्तिचित्र काढून घेत असत. मोर्स यांनीसुद्धा उदरनिर्वाहासाठी व्यक्तिचित्र रंगवण्याचा व्यवसाय स्वीकारला. त्यांनी अमेरिकेतल्या न्यू इंग्लंड, न्यूयॉर्क आणि दक्षिण कॅरोलिना या राज्यांमध्ये चित्रकार म्हणून काम करायला सुरुवात केली.
मोर्स यांना जसा चित्रकलेमध्ये रस होता, तसा विज्ञानविषयक वेगवेगळे प्रयोग करून पाहण्यातसुद्धा होता. मोर्स यांनी आपला धाकटा भाऊ सिडनी एडवर्ड्स मोर्स याच्या समवेत पंपासंबंधीची तीन एकस्व (पेटंट) मिळवली होती. संगमरवरावर कोरीव काम करण्याचं एक यंत्रसुद्धा त्यांनी विकसित केलं होतं.
वॉिशग्टनमध्ये मोर्स ‘माक्विर्स द लाफायेत’चं व्यक्तिचित्र काढत असताना एक घोडेस्वार तातडीची चिट्ठी घेऊन आला. ही चिट्ठी मोर्स यांच्या वडिलांनी लिहिलेली होती. चिठ्ठीमध्ये मोर्स यांची पत्नी अत्यवस्थ असल्याचं लिहिलं होतं. मोर्स चित्र अर्धवट ठेवून ताबडतोब वॉिशग्टनहून न्यू हेवन इथल्या आपल्या घरी यायला निघाले. घरी पोहोचल्यावर त्यांना समजलं की, आपल्या पत्नीचं निधन झालं आणि आता तिच्यावर अंतिम संस्कारसुद्धा करून झाले आहेत. आपल्या पत्नीच्या आजाराची बातमी वेळेत मिळाली नाही, याचं मोर्स यांना खूप वाईट वाटलं. आपल्या बाबतीत जे झालं, ते इतरांच्या बाबतीत होऊ नये, या उदात्त हेतूने दूरवर असलेल्या ठिकाणी अत्यंत जलद गतीने संदेश पोहोचवू शकेल असं यंत्र तयार करण्याच्या मागे मोर्स लागले. १८३२ साली फ्रान्सहून जहाजातून परत येतानाच्या प्रवासात चार्लस टी. जॅक्सन यांनी मोर्स यांना लांब अंतरावर विद्युत स्प्रंद पाठवू शकणारं एक उपकरण दाखवलं. यामुळे मोर्स यांना विद्युत आणि तारायंत्र या विषयांत अधिक स्वारस्य निर्माण झालं.
मग पुढची तीन वष्रे त्यांनी अनेक प्रयोग करून पहिले. १८३६ सालच्या सुरुवातीला मोर्स यांनी अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ हेन्री आणि आल्फ्रेड विल यांच्या मदतीने विद्युत चुंबकीय तारायंत्र उपकरण तयार केलं. या यंत्रात एक विद्युत मंडल चालू-बंद करून संकेत पाठवणारा प्रेषक, संकेतांची नोंद करणारा विद्युत् चुंबकीय ग्राही आणि संकेतांची अक्षरे आणि संख्या यात रूपांतर करणारी सांकेतिक लिपी यांचा समावेश होता. या तारायंत्रात वापरण्यात येणारी संकेतिक लिपी स्वत: मोर्स यांनी तयार केली होती. या लिपीमध्ये डॉट (ठिपका) आणि डॅश अशी दोनच चिन्हं होती. या दोन चिन्हांना अनुक्रमे ‘कट्ट’ आणि ‘कड’ असे दोन आवाज ठरवण्यात आले होते. आवाजावरून डॉट आणि डॅश ओळखून त्यानुसार शब्द तयार केला जायचा. केवळ आवाजावरून शब्द तयार करण्यात चूक झाली तर चुकीचा संदेश दिला जाऊ शकतो, हा धोका लक्षात घेऊन संदेश अत्यंत लहान आणि नेमकेपणाने दिला जात असे. तारायंत्रासाठी वापरण्यात येणारी ही संकेतिक लिपी ‘मोर्स कोड’ नावाने प्रसिद्ध झाली.
१८३७ साली विल्यम कूक आणि चार्ल्स व्हिटस्टोन या इंग्लंडच्या शास्त्रज्ञांनी स्वतंत्रपणे तारायंत्राची निर्मिती केली. पण त्यांनी तयार केलेल्या यंत्रामध्ये संदेश दर्शवण्यासाठी सुईचा वापर केला होता. ही सुई आलेल्या संदेशानुसार अक्षरांवर फिरायची आणि आलेला संदेश कळायचा. पुढे १८४१ साली कुक आणि व्हिटस्टोन यांनी आलेला संदेश छापणारं तारायंत्र तयार केलं.        
१८३७ मध्ये मोर्स यांनी आपल्या शोधाचं एकस्व मिळावं यासाठी अर्ज केला; पण त्यांना आपल्या शोधाला मान्यता मिळण्यास जवळजवळ सात वष्रे वाट पाहावी लागली. अमेरिकेच्या सरकारने या शोधाचे हक्क विकत घेण्यास नकार दिल्यावर मोर्स यांनी स्वत:ची कंपनी स्थापन केली. तारायंत्राचा प्रसार लवकरच झपाटय़ाने वाढला आणि बहुतेक देशांनी त्याचा वापर करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मोर्स यांच्यावर त्यांचे भागीदार आणि प्रतिस्पर्धी संशोधक यांनी शोधाच्या अधिकाराबाबत दावे लावले. अतिशय खíचक न्यायालयीन खटल्यांच्या दीर्घ मालिकेनंतर १८५४ मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मोर्स यांचा एकस्व अधिकार मान्य केला.
मॉर्स यांच्या स्वत:च्या आयुष्यातच तारायंत्रामुळे जगाचे स्वरूप कितीतरी बदलले. पुढे अमेरिकेच्या अ‍ॅलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी १८७५च्या सुमारास लावलेल्या टेलिफोनच्या शोधामुळे जग जवळ येण्याची प्रक्रियाच सुरू झाली. त्यानंतर घरोघरी टेलिफोन आले. दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञानात त्यांनंतर झालेल्या अभूतपूर्व क्रांतीने टेलिफोनलासुद्धा मागे टाकले. तरीसुद्धा आपला संदेश झटपट इच्छित स्थळी पोहोचावा यासाठी सॅम्युएल मोर्स यांनी जोडलेली संवादाची तार भारतात सर्वात जास्त र्वष आपलं अस्तित्व टिकवून होती. टपाल खात्याने तारसेवा बंद केल्यामुळे आता संपूर्ण जगातूनच ही सेवा बंद झाली आहे. पण असं असलं तरी तारेसंदर्भातल्या अनेक चांगल्या-वाईट आठवणी बरीच र्वष मनातून पुसल्या जाणार नाहीत, हे नक्की!    

४    मोर्स कोडबद्दल अधिक माहिती मिळवा. मोर्स कोडचा वापर करून प्रत्येक अक्षर कसं लिहिलं जातं, याचा अभ्यास करा.
४    तार कशी केली जायची आणि तारेत लिहिलेला संदेश इच्छित व्यक्तीपर्यंत कसा पोहोचायचा याची माहिती मिळवा.
४    तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे मोर्स कोड या सांकेतिक लिपीचा वापर करणे हळूहळू बंद झाले. अशीच एक सांकेतिक लिपी ‘शॉर्ट हँड’साठी वापरली जात असे. शॉर्ट हँडसाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीविषयी अधिक माहिती मिळवा.
४    संदेशवहनात झालेली प्रगती दर्शवणारा एक प्रकल्प सादर करा. या प्रकल्पांतर्गत तारसेवा, टेलीफोन, टेलेक्स, पेजर, फॅक्स, मोबाइल, ई-मेल इत्यादी सेवा कशा प्रकारे कार्यरत असतात, याविषयी जाणून घ्या.