वैद्याकीय क्षेत्राचे अविभाज्य भाग असलेल्या नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याबाबत उदासीनता आहे. विशेषत: मराठी तरुणींमध्ये याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे परिचारिकांना तितकीशी सामाजिक प्रतिष्ठा मिळत नाही असे मानले जाते. हा गैरसमज आणि उदासीनता यामुळे गुणवान व कष्टाळू विद्यार्थी या क्षेत्राकडे कमी प्रमाणात आकर्षित होतात.
बारावीनंतर ‘नीट’ परीक्षा देऊन वैद्याकीय शाखेत करिअर करण्याची लाखो विद्यार्थ्यांची मनीषा असते. मात्र यामध्ये त्यांचा कल मुख्यत्वे अॅलोपॅथी / दंतवैद्याक / आयुर्वेदिक/ होमिओपॅथिक/ पशुवैद्याकीय डॉक्टर किंवा फार तर फिजिओथेरपी / स्पीच थेरपी याकडे असतो. आज संपूर्ण जगात अनुभवी, प्रशिक्षित नर्सेसचा (परिचारिकांचा) तुटवडा आहे आणि त्यांना प्रचंड मागणी आहे, तरीही आपल्याकडे मात्र वैद्याकीय क्षेत्राचे अविभाज्य भाग असलेल्या नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याबाबत उदासीनता आहे. विशेषत: मराठी तरुणींमध्ये याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे परिचारिकांना तितकीशी सामाजिक प्रतिष्ठा मिळत नाही, खरं तर भारतात जगातील सर्वात जास्त म्हणजे ऐंशी कोटी लोकांचे करोना लसीकरण करण्याचे शिवधनुष्य देशभरातील नर्सेसनी पेलले होते.
बारावीनंतर नर्सिंगमध्ये करिअरच्या दोन संधी उपलब्ध होतात.
● बीएससी नर्सिंग : बारावीनंतर चार वर्षांचा हा पदवी अभ्यासक्रम आहे.
● जीएनएम अर्थात डिप्लोमा नर्सिंग : बारावीनंतर साडेतीन वर्षांचा हा डिप्लोमा कोर्स असून अनेक शासकीय व खासगी वैद्याकीय महाविद्यालये, रूग्णालये यामध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
या दोन्ही कोर्सच्या प्रवेशासाठी एक राज्यस्तरीय सीईटी घेतली जाते. या सीईटी मध्ये १२ वी च्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न असतात. ज्यात भौतिकशास्त्र विषयाचे २० गुणांसाठी २० प्रश्न, रसायनशास्त्र विषयाचे २० गुणांसाठी २० प्रश्न, जीवशास्त्र विषयाचे २० गुणांसाठी २० प्रश्न , इंग्रजी विषयाचे २० गुणांसाठी २० प्रश्न व नर्सिंग अॅप्टिट्यूड या विषयाचे २० गुणांसाठी २० प्रश्न असतात. परीक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेतली जाते व त्यासाठी फक्त दीड तासाचा वेळ असतो. या परीक्षेतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नर्सिंग डिग्री व डिप्लोमाला प्रवेश मिळू शकतो.
मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस
भारतीय संरक्षण दलांमधील अधिकारी तसेच सैनिक यांच्यावर उपचार करण्यासाठी देशात काही स्वतंत्र रुग्णालये निर्माण केली गेली आहेत. या रुग्णालयांत नर्सेसची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. यासाठी स्वतंत्र मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसची स्थापना करण्यात आली. याद्वारे बीएससी नर्सिंग हा चार वर्षांचा अभ्यासक्रम देशात पुणे , कोलकाता, मुंबई, दिल्ली, लखनऊ आणि बंगलोर या सहा ठिकाणी चालवला जातो. बारावीची परीक्षा फिजिक्स, केमिस्ट्री,बायोलॉजी हे विषय घेऊन बोर्डाला किमान ५० गुण मिळवणाऱ्या आणि नीट ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थीनी यासाठी पात्र असतील. नी च्या मार्कांवर शॉर्टलिस्टिंग केलेल्या विद्यार्थिनींसाठी एक स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतली जाते.
८० मार्कांच्या या संगणकआधारित परीक्षेत इंटेलिजन्स आणि इंग्रजी या दोन विषयांवर ४० प्रश्न असतील. चुकीच्या उत्तरासाठी अर्धा मार्क कापला जातो. त्यानंतर एक मानसिक कल चाचणी घेऊन या सर्वातून निवडलेल्या विद्यार्थिनींची मुलाखत घेऊन अंतिम निवड केली जाते. यासाठीची जाहिरात मे महिन्यात www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध होते व तेथेच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो. कोर्स पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थीनींना संरक्षण दलांमध्ये सामावून घेतले जाते.
परदेशातही मागणी
नर्सिंग क्षेत्रात जसे उच्च शिक्षणही घेता येते तसेच बालरोग, मनोरूग्ण, सार्वजनिक आरोग्य यांसारख्या विषयांमध्ये विशेष प्रशिक्षण घेता येते. बीएससी नर्सिंग किंवा जी एन एम या दोन्ही कोर्सेस नंतर दोन तीन वर्षे अनुभव घेतल्यानंतर मध्यपूर्वेतील देश , आफ्रिका खंडातील देशात नोकरीच्या उत्तम संधी आहेत , IELTS ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नर्सेसना युरोप , ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये ही उत्तम संधी उपलब्ध आहेत. परदेशात भारतीय नर्सेसना उत्तम पगाराबरोबरच सामाजिक प्रतिष्ठाही मिळते. जर्मनीमध्ये सध्या शास्त्र शाखेतून फक्त बारावी उत्तीर्ण व ज्यांना उत्तम जर्मन भाषा ( बी २ लेव्हल ) येते अशा विद्यार्थिनींना स्टायपेंडसह तीन वर्षे मोफत नर्सिंग शिक्षण व त्यानंतर हमखास नोकरी मिळते. भारतातही नर्सेसची जरुरी दिवसेंदिवस वाढतच आहे.
ज्या क्षेत्रात नोकरी , स्वयंरोजगार आणि परदेशात जाण्याच्या संधी या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत अशा काही थोड्या क्षेत्रात नर्सिंग क्षेत्राची गणना होते. मुलींबरोबरच मुलांनाही या क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य आहे. नर्सिंग करिअर विषयी जनमानसातील गैरसमज व उदासीनता यामुळे गुणवान व कष्टाळू विद्यार्थी या क्षेत्राकडे कमी प्रमाणात आकर्षित होतात ही मात्र दुर्दैवाची गोष्ट आहे.
vkvelankar@gmail.com