बारावीनंतर चार वर्षांच्या या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील आठ शासकीय व खासगी महाविद्यालयात प्रवेशासाठी, महाराष्ट्र राज्य सीईटी सेल बीएफए (बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स) प्रवेश परीक्षा घेते. पेंटिंग, सिरॅमिक्स, अॅप्लाइड आर्ट्स, मेटल वर्कपासून टेक्सटाइल डिझायनिंग, इंटिरियर डेकोरेशनपर्यंत अनेक विषयांत बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स ही पदवी मिळवता येते.

अनेक मुलांना चित्रकला, शिल्पकला, पेंटींग, सिरॅमिक्स, डिझायनिंग या क्षेत्रात आवड असते. अशा विद्यार्थ्यांना बारावीनंतर फाईन आर्टसमध्ये बीएफएची पदवी मिळवून करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात.

बारावीनंतर चार वर्षांच्या या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील आठ शासकीय व खासगी महाविद्यालयात प्रवेशासाठी, महाराष्ट्र राज्य सीईटी सेल एक प्रवेश परीक्षा घेते. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये ही परीक्षा घेतली जाते. मुंबई तील जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स, नागपूरचे चित्रकला महाविद्यालय, औरंगाबादचे शासकीय स्कूल ऑफ आर्ट्स यासारख्या शासकीय महाविद्यालयांपासून मुंबईच्या रचना संसद , सावंतवाडीतील बांदेकर कॉलेज, डी. वाय. पाटील कॉलेज व भारती विद्यापीठ, पुणे या महाविद्यालयांपर्यंत सर्व महाविद्यालयांमध्ये या बीएफए प्रवेश परीक्षेतून प्रवेश मिळतो. फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांनाही या परीक्षेला बसता येते व ते परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारावर या कोर्सला प्रवेश घेऊ शकतात.

कोणत्याही शाखेतून इंग्रजी विषय घेऊन किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळवून बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी ही प्रवेशपरीक्षा देऊ शकतो. एकूण दोनशे गुणांच्या या परीक्षेत चार पेपर असतात. एक पेपर ऑब्जेक्ट ड्रॉईंगचा असतो ज्यामध्ये स्पेसिमेनचे ड्रॉईंग एक तासात काढावे लागते. दुसरा पेपर डिझाइन प्रॅक्टिकल चा असतो ज्यामध्ये एक डिझाइन दीड तासात काढावे लागते. तिसरा पेपर मेमरी ड्रॉईंगचा असतो ज्यामध्ये दीड तासात मेमरी ड्रॉईंग काढावे लागते. हे तीनही पेपर्स प्रत्येकी पन्नास मार्कांचे असतात. चवथा चाळीस मार्कांचा पेपर ऑब्जेक्टिव्ह स्वरुपाचा असतो ज्यामध्ये कला , हस्तकला , ड्रॉईंग , डिझाईन यासारख्या विषयांवर प्रश्न विचारले जातात. फाईन आर्टस मध्ये पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी चारही पेपर्स देणे अनिवार्य आहे. ड्रॉईंग परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी स्वत:चे ड्रॉईंग साहित्य आणणे आवश्यक आहे फक्त ड्रॉईंग पेपर शासनाकडून पुरवला जातो.

या परीक्षेसाठी www. mahacet. org या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया जानेवारी/ फेब्रुवारी महिन्यात सुरू होते. परीक्षा सर्वसाधारण पणे मे महिन्यात घेतली जाते. परीक्षेचा निकाल सीईटी सेलच्या संकेतस्थळावर घोषित केला जातो. या परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कॅप प्रक्रियेचा अर्ज भरावा लागतो. अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना मेरीट नंबर दिला जातो. त्यानंतर विविध कला महाविद्यालयांमध्ये कॅटेगरी निहाय उपलब्ध जागांचा तपशील संकेतस्थळावर जाहीर केला जातो. नंतर विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीनुसार ऑप्शन फॉर्म भरता येतो , ज्यात जास्तीत जास्त बावीस पर्याय भरता येतात. पहिल्या पर्यायाचे महाविद्यालयात प्रवेश मिळाला तर तो घ्यावाच लागतो , मात्र बाकीच्यांना पुढच्या कॅप फेरीसाठी पुन्हा अर्ज करण्याची मुभा असते. वरीलपैकी कोणत्याही महाविद्यालयांत प्रवेश मिळवून चार वर्षांचा पदवी कोर्स सुरू होतो.

पेंटिंग, सिरॅमिक्स, अॅप्लाइड आर्ट्स, मेटल वर्कपासून टेक्सटाइल डिझायनिंग, इंटिरियर डेकोरेशनपर्यंत अनेक विषयांत बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स ही पदवी मिळवता येते. हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी मल्टीमिडिया / अॅनिमेशन , वेब डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग , सेट डिझायनिंग या क्षेत्रात काम करू शकतात तसेच कमर्शियल आर्टिस्ट म्हणून जाहिरात संस्थांमध्ये ही काम करू शकतात अथवा स्वतंत्र व्यवसाय करू शकतात.

महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये आर्ट गॅलरीज स्थापन झालेल्या आहेत. त्यामुळे चित्रकारांना लोकाश्रय आणि समाजमान्यता मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

vkvelankar@gmail.com