डॉ. श्रीराम गीत
मला इयत्ता दहावी मध्ये ९२ टक्के होते आणि इयत्ता बारावी विज्ञान शाखेमध्ये ७१ टक्के होते. आता मी बीएला आहे. मला २०२५ नुसार नवीन पद्धतीने राज्यसेवा परीक्षा द्यायची आहे. तर मला काही शंका आहेत. खासगी क्लासेस लावायचा की नाही? मुख्य परीक्षेचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा? कुठे मार्गदर्शन मिळू शकेल? असे बरेच प्रश्न आहेत. प्लॅन बी असावा की नाही हा सुद्धा प्रश्न. मी लोकसत्ता पेपर मागील सहा महिन्यापासून वाचत आहे बरेच काही नवीन शिकायला मिळाले. ‘करिअर वृत्तांत’मधून तुम्ही मला मार्गदर्शन करा. – कार्तिक पाटील, अमरावती</strong>
दहावीला उत्तम व बारावी सायन्सला चांगले मार्क असताना बीएला तू प्रवेश का घेतला आहेस हे मला न कळलेले कोडे आहे. अशीच चमत्कारिक वाटचाल करणारे अनेक जण महाराष्ट्रात आहेत म्हणून हा उल्लेख. बीएस्सी पूर्ण करूनही राज्यसेवा स्पर्धा परीक्षेत छान यश मिळवता येते. आत्तापासून मी अभ्यास करत आहे व क्लास कोणचा लावू या दोन्ही गोष्टी मनातून काढून टाक. सविस्तर, समग्र, अवांतर वाचनाच्या जोडीला विविध वृत्तपत्रांचे अग्रलेख वाचणे, लोकसत्ता करिअर वृत्तांतची नियमित कात्रणे बाजूला काढून ठेवून त्याचा अभ्यास करणे गरजेचे. इंग्रजी व मराठी व्याकरण शुद्ध लिहिणे अशा प्राथमिक गोष्टींवर तुला येते तीन वर्षे लक्ष केंद्रित करावयाचे आहे. हाच अभ्यास समजावास. क्लास प्लॅन बी असून तो पदवीनंतर. २०२५ च्या पूर्व परीक्षेत यश मिळवणे हेच पहिले ध्येय ठेव.
सर, माझं वय २४ वर्ष पूर्ण झालं आहे. मी सध्या लॉच्या द्वितीय वर्षांला प्रवेश घेतला आहे. आणि मागील एक वर्षांपासून मी एमपीएस्सीची तयारी करतोय. आता सध्या मी संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करतोय मला स्पर्धा परीक्षेत यश मिळावे असे स्वप्न आहे. सोबत दुसऱ्या वर्षांत असताना कोर्टात प्रॅक्टिससाठी जावे अशी माझ्या घरच्या मंडळीची इच्छा आहे. या दोन गोष्टींमध्ये अडकून गेलोय. मी सध्या काय करायला हवं.- वसंत.
तुमचे प्रश्न उत्तर मी देण्यापेक्षा त्यावर निर्णय तुम्हालाच घ्यायला हवा. वयाच्या २४ व्या वर्षी वकिलीत करिअर करायची का अनिश्चित स्वरूपाच्या राज्यसेवा स्पर्धा परीक्षांच्या मागे लागायचे तेही घरच्यांचा पाठिंबा नसताना? याचे उत्तर मी कसा देणार? वकील झाल्यानंतर मॅजिस्ट्रेट साठीची परीक्षा उत्तीर्ण होऊन नंतर जज्ज बनणे हे तुम्हाला शक्य आहे.
सर, माझे यावर्षी बीए, इंग्लिश घेऊन झाले आहे. मला आता पुढे एमबीए करण्याची खूप इच्छा आहे. सोबतच मी एमपीएससीची देखील तयारी करत आहे. मला मुंबईच्या जमनालाल बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज येथून एमबीए करण्याची इच्छा आहे. एमबीए कशामधून करावे आणि करिअरच्या संधी काय आहेत? कृपया मार्गदर्शन करावे. – निकिता नागपुरे
काही मूलभूत गोष्टी जरा समजून घेतल्यास तर फायदा होईल. जमनालाल बजाज महाराष्ट्रातील नंबर एकची मॅनेजमेंट प्रशिक्षण देणारी संस्था आहे. एमबीएसाठीची सीईटी होते. त्यातील पहिल्या काहीशेंना जेमतेम त्या संस्थेत प्रवेश दिला जातो. अत्यंत तीव्र अशी स्पर्धा त्यासाठी असते. त्या स्पर्धेमध्ये अनेक इंजिनीअर्स असतात, तसेच इकॉनॉमिक्स किंवा सायकॉलॉजी विषय घेतलेले विद्यार्थी असतात. महाराष्ट्रातील नामवंत संस्थातील कॉमर्सचे पदवीधर हेही याच परीक्षेला बसतात. मार्केटिंग, फायनान्स, ह्युमन रिसोर्स या तीन विषयाशी संबंधित प्रमुख स्पेशलायझेशन असते. त्याची निवड प्रथम वर्ष सामायिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर दुसऱ्या वर्षी केली जाते. तुझा बीए चा विषय इंग्लिश असल्यामुळे मुख्यत: मार्केटिंग विषयाशी संबंधित तुला तो उपयोगी पडू शकेल. आजवरचे तुझे कोणतेही मार्क तू कळवलेले नाहीस. दहावी व बारावीला गणितात उत्तम मार्क असतील तर या प्रवेश परीक्षेत यशाची शक्यता वाढेल. ही सर्वात महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट लक्षात घे. या प्रवेश परीक्षेला तुला दोन किंवा तीन वेळेला सुद्धा बसता येऊ शकते. त्या दरम्यान मार्केटिंगच्या कामाचा अनुभव घेतला असला तर त्याचा फायदा होऊ शकेल. उत्तम नोकरीची खात्री देणारा हा रस्ता आहे. शेवटचा महत्त्वाचा मुद्दा. तू एमपीएससीची तयारी करताना या रस्त्याचा विचार सुद्धा नको. दोन्हीची तयारी पूर्णत: वेगळय़ा स्वरूपाची आणि तीव्र स्पर्धेची आहे. दोन्हीची प्रवेश परीक्षा पद्धत पहा.