प्रवीण निकम

कसे आहात तुम्ही सगळे? आपल्या या लेखमालेत आपण उच्च शिक्षणाच्या संधी नक्की कोणकोणत्या आणि त्या आपण कशा प्रकारे मिळवू शकतो यावर बोलत आहोत. पण आज मात्र मी हा लेख लिहतोय माझ्या दहावी- बारावीची परीक्षा नुकतीच दिली आहे अशा मित्र-मैत्रिणी साठी. दहावी-बारावीची परीक्षा झाली आता पुढे काय? या प्रश्नावर अनेक जण विचार करत असतील. काही गुगलच्या मदतीने माहिती शोधत असतील, तर कित्येकांनी अद्याप विचारही केला नसेल. निकाल लागल्यानंतर बघूया, या विचारात उन्हाळ्याची सुट्टी अनुभवत असतील. इथून पुढे तुमचा शिक्षणाचा एक वेगळा प्रवास सुरू होतोय. या शैक्षणिक प्रवाहात सकारात्मक काम करायचं असेल तर वेळीच करिअरच्या योग्य वाटा निवडणे ही गरज आहे. बदलत्या काळात शिक्षणाचे नवे नवे पर्याय आता तुमच्यासाठी खुले आहेत. अर्थात तुम्ही या सगळ्याचा कसा उपयोग करून घेता व स्वत:चा शैक्षणिक प्रवास सुखकर करता यावर सगळं पुढचं भविष्य ठरणार आहे. या नव्या वाटचालीला सुरुवात करण्याआधी तुम्ही काही प्रश्नांचा नक्की विचार करायला हवा असं मला वाटत आज जरा त्याविषयी बोलूया.

हेही वाचा >>> UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था मूलभूत संकल्पना, परिशिष्टे आणि सरनामा

एक लक्षात ठेवा आता करिअर क्षेत्र खूपच विस्तारलं आहे. पारंपरिक शिक्षणासोबतच कौशल्याधारित अनेक नवे शैक्षणिक पर्याय उपलब्ध आहे अशा वेळी कोणतंही क्षेत्र निवडण्याआधी स्वत:ला एक प्रश्न नक्की विचारा की मी जे क्षेत्र निवडतोय ते खरचं माझ्या आवडीचं आहे ना? आणि लक्षात ठेवा तुम्ही निवडलेलं क्षेत्र हे खूप विस्तारलेलं असणार आहे तेव्हा त्यात देखील मी नक्की कशावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे? त्या क्षेत्रातल्या दहा गोष्टींपैकी नक्की मला काय शिकायला आवडेल? याचा बारकाईने विचार करा आणि पुढे जाऊन हा ही विचार करा की खरंच हे करिअर केल्यानंतर आपल्याला खरंच समाधान मिळणार आहे, का फक्त दुसरे सांगत आहेत म्हणून आपण यावर विचार करतोय. लक्षात ठेवा की एक सुयोग्य करिअर निवडण्यासाठी तुम्हाला पाच पेक्षा अधिक पर्याय आधी माहीत असायला हवेत. तरच तुम्ही त्यातून तुम्हाला आवडणारा पर्याय निवडू शकणार आहात. या सर्व प्रश्नांची ठाम उत्तरे मिळवण्यासाठी स्वत:शीच संवाद साधणे गरजेचे आहे. यात आपली बलस्थाने व कमतरता, आर्थिक, शारीरिक क्षमता व बौद्धिकता याविषयी सखोल विचार करा. अतिशय वेगाने बदलणारी भोवतालची परिस्थिती, रोजच्या जीवनातील झपाट्याने होणारे बदल, स्पर्धेचे वाढते युग आणि इतर दबाव या सगळ्यात स्वत:वर विश्वास निर्माण व्हायला हवा. तेव्हा लक्षात असू द्या की दहावी- बारावी मधील करिअर निवड तुमच्या उच्च शिक्षणाच्या मार्गातील सुरुवातीच्या व तितक्याच महत्वाच्या अशा पायऱ्या आहेत.

हेही वाचा >>> नोकरीची संधी : ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’मधील संधी

मित्रांनो हे करताना काही गोष्टी नक्की अंगिकारा. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे करिअरच्या दृष्टीने विचार करत असताना स्वत:च्या संवादासोबत इतर त्या क्षेत्रातील तज्ज्ञांसोबतचा संवाद देखील महत्त्वाचा आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात जाऊ इच्छिता त्या क्षेत्रातले तुम्हाला मार्गदर्शन करणारे, तुम्ही अडखळलात तर तुम्हाला सावरणारे, तुमच्या असणाऱ्या चांगल्या गुणांची तुम्हाला जाणीव करून देत असताना तुमच्यात असणाऱ्या कमतरता तुम्हाला नक्की वेळीच तुमचा कान पाळणारे असे ताई-दादा, शिक्षक शोधा. त्यांच्याशी संवाद साधत एकएक पाऊल पुढे-पुढे जा. या अशा जाणकार लोकांशी बोलल्यावरच तुम्हाला अनेक प्रश्नांची आपसूकच उत्तरे मिळत जातील. हे सर्व करत असताना आपल्याला ज्या क्षेत्राची आवड आहे. त्या क्षेत्रातील सर्वोच्च पदावरील व्यक्ती कोण आहेत? त्या व्यक्ती त्या ध्येयापर्यंत कशा पोहोचल्या? याविषयी सतत माहिती मिळवणं आवश्यक आहे. याआधारे वाचनाकडे कल निर्माण होऊन चिकित्सक वृत्ती तयार होते. कारण, माणसाचा प्रवास हा दुसऱ्या माणसाला कळत – नकळतपणे सकारात्मक ऊर्जा देत असतो. क्षेत्राशी निगडित असलेल्या माणसांचा प्रवासाचा अंदाज घेतल्यावर प्रेरणा निर्माण होऊन ध्येय व उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी मदत होते. तुम्ही जे करिअर निवडत आहात त्यात पुढे जाण्यासाठीचा हा गृहपाठ आहे असे समजा.

तुमच्या आवडीचे करिअर ज्या क्षेत्रात करायचे आहे त्यासाठी नक्की कोणते महाविद्यालय योग्य आहे? कुठून योग्य प्रशिक्षण मिळू शकते? त्या क्षेत्रातील सखोल माहिती मिळवत तुम्ही भविष्यातील त्या क्षेत्रातील नक्की काय काय संधी निर्माण होतील? याबाबत जाणून घ्या निदान तसा प्रयत्न करत रहा यातून आपण पुढच्या पाच – दहा वर्षांत कुठे असू आणि असायला हवे याविषयी तुम्हालाही काहीसा अंदाज येऊ शकेल. या सर्व प्रश्नांची उत्तरे तेव्हाच याबाबत संवाद साधाल. तुमच्या संपूर्ण शैक्षणिक वाटचालीत एका संवाद कौशल्यामुळे तुम्ही अनेक गोष्टी सध्या करू शकता. विचारांची देवाणघेवाण झाल्यावरच तुम्हाला करिअरच्या नव्या नव्या वाटा दिसू लागतील. सध्या सरधोपटपणे एका क्षेत्रातील किंवा एका विषयातील शिक्षण – करिअर करण्याची संख्या वाढत आहे. त्यामुळे आपण वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरण्यासाठी कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात कौशल्य विकास, योग्य प्रशिक्षण, व्यवस्थापन आणि करिअरची निवड हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. मित्रांनो, आपण सर्वच जण लीडर आहोत. येणाऱ्या सर्व चढ उतारांचा सामना करत पुढे-पुढे जाणाऱ्या तुमच्यातल्या प्रत्येकाने नेतृत्व कौशल्यावर काम करायला हवे. एक लक्षात ठेवा उच्च शिक्षणाच्या संधी भारतातच नव्हे तर परदेशातही तुमची वाट पाहत आहे पण त्या सर्वांनाच रस आहे तो एका लीडर मध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीमध्ये गुंतवणूक करण्यात. तेव्हा तुमच्यातील नेतृत्व कौशल्य वाढीस लावा. ट्रायल अँड एरर सारखं स्वत:च्या नेतृत्वाचा कस लावा आणि नव्या नव्या गोष्टी करू बघा. उच्च शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळवणे नव्हे तर, उच्च शिक्षण म्हणजे विचार करण्याच्या नवीन पद्धती शिकणे आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये आत्मसात करणे. पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त, विद्यार्थांमध्ये चिकित्सक विचार प्रणाली, विश्लेषण, लेखी आणि मौखिक संप्रेषण आणि गट समस्या सोडविण्याचे कौशल्य हे आत्मसात व्हायला हवेत. नवीन आणि सुधारित कौशल्यांसह उच्च शिक्षण घेतल्यास विविध संधीची जाणीव व भविष्यात विविध क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त करून घेण्याची जिद्द निर्माण होईल. धोपट मार्गाची चौकट मोडून करिअर विषयीचा तुमच्या मनात आत्मविश्वास व निर्णय क्षमता निर्माण व्हायला हवी. या वयात मुलांना करिअर विषयक योग्य सल्लागाराची आवश्यकता असते. यासाठी पालकांनी जागरूक असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतांसह, बदलत्या काळाचा सामना करण्यासाठी करिअर विषयी योग्य मार्गदर्शनासह नियोजन केल्यास शैक्षणिक जीवन व संधी अधिक समृद्ध ठरतात. तेव्हा दहावी-बारावी नंतरच्या करिअर मॅपिंग आताच सुरुवात करा. कारण हे विचारचक्र तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप उपयोगी ठरेल एवढं मात्र नक्की.