यूपीएससी देताना पूर्ण नियोजन करून प्रयत्न केल्यानंतर स्पर्धा परीक्षांचा आवाका लक्षात येतो. तीन प्रयत्नानंतरही यश आले नाही तर विविध विभागांमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांकडे प्लॅन बी म्हणून वळता येईल. यूपीएससीच्या अभ्यासाचा तिथे ही नक्कीच फायदा होतो, असा महत्त्वाचा सल्ला दिला आहे, भारतीय पोस्ट आणि दूरसंचार खाती आणि वित्तीय सेवा विभागाच्या अधिकारी पल्लवी चिचंखेडे यांनी.
मी सातवीत असतानाची घटना. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या सत्काराचा कार्यक्रम अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मीही उपस्थित राहिले होते. त्या कार्यक्रमातच त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाने प्रभावित होऊन आपणही आयएएस अधिकारी व्हायचे याची बीजं मनात रोवली गेली. तिथूनच प्रेरणा घेऊन मग माझा स्पर्धा परीक्षांच्या दिशेने प्रवास सुरू झाला, असे म्हणायला हरकत नाही.
माझे वडील रंगकाम करायचे तर आई शिवणकाम करायची. आम्ही अमरावतीच्या बिच्छू टेकडी या परिसरात राहयचो. अमरावतीतच मी मराठी माध्यमातून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर मला ‘विप्रो’ या नामांकित कंपनीत नोकरीही मिळाली.
माझ्या स्पर्धा परीक्षेच्या स्वप्नांना खतपाणी घालण्याचे काम केले माझ्या वडिलांनी. ते स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात काही लेख, वृत्त दिसले तर त्याची कात्रणे माझ्यासाठी आणायचे. माझ्या आई-वडिलांनी शिक्षणाच्या बाबतीत मला किंवा आम्हा भावंडांना कायम पाठिंबा दिला.
स्पर्धा परीक्षा तर द्यायची होती मात्र, आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने, काही न करता केवळ तीन-चार वर्षे परीक्षांच्या तयारीसाठी खर्च करणे शक्य नव्हते. म्हणूनच मग मी विप्रोत तीन वर्षे नोकरी करून काही पुंजी जमा केली. आणि त्यानंतर तयारीसाठी दिल्ली गाठले. दरम्यानच्या काळात म्हणजे, माध्यमिक शालेय शिक्षण सुरू असताना, महाविद्यालयीन काळात आणि नोकरीत असतानाही दररोजचे वर्तमानपत्र वाचणे याची मी सवय लावून घेतली होती. शिवाय नोकरी करतानाच यूपीएससी परीक्षेच्या अभ्यासक्रमाची नीट माहिती घेऊन थोडा थोडा अभ्यास सुरू केला होता. एनसीआरटीसीची पुस्तकही वाचणे सुरू केले होते. बार्टीच्या सहकार्याने यूपीएससीचे प्रशिक्षण मी दिल्लीला घेतले. माझे ध्येय मला लहानपणापासूनच माहीत होते. त्यामुळे त्यासाठीचा मार्गही निश्चित होता आणि त्यासाठीचे प्रयत्नही.
दिल्लीत गेल्यानंतर मात्र मी परीक्षेसाठी पूर्ण झोकून देऊन प्रयत्न करायला सुरुवात केली. सध्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी अनेक माध्यमे उपलब्ध आहेत.
वेळापत्रकाची काटेकोर अंमलबजावणी
अभ्यास करताना मी माझे स्वत:चे वेळापत्रक तयार केले होते. त्यात कोणता विषय केव्हा आणि कधी करायचा हे ठरवलेले होते. त्यासाठी इतकेच तास अभ्यास करायचा असे काही मी करत नव्हते. एखादा विषय नेटका समजण्यासाठी जितका वेळ लागेल तितका मी देत असे. मात्र, विषय, टॉपिक यासाठी बनवलेल्या वेळापत्रकाची काटेकोर अंमलबजावणी मी करत होते. त्यामुळे मी सांगेन की तासांवर फोकस न करता तो विषय समजून घेण्यावर करायला हवा.
ग्रुपची गरज असतेच असे नाही
तुम्ही ज्यांच्याबरोबर चर्चा करणार आहात, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर जर तुम्हाला त्यातून भरीव असे काही मिळणार असेल तरच ग्रुपमध्ये अभ्यास करण्याचा फायदा आहे. अन्यथा त्यातून फक्त वेळ वायाच जाणार असेल तर ग्रुपमध्ये अभ्यास न केलेलाच बरा.
तब्येतीकडे लक्ष द्या
परीक्षा देत आहोत, बराच अभ्यास आहे म्हणून तब्येतीकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरत नाही. मी वेळात वेळ काढून दररोज चालायला जायचे. माझा छंदच योगासने असल्याने आवर्जून योगासने करायचे. मानसिक आरोग्यासाठीही व्यायाम महत्त्वाचा ठरतो. तसेच या काळात स्वत:ला सगळ्यांपासून दूर ठेऊ नका. मग ते नातेवाईक असतील, मित्र मैत्रिणी असतील किंवा मनोरंजन! त्यांच्यामुळे तुमचे मनोबल उंचावते. दिवसातून अर्धा तास तरी मनोरंजनासाठी द्यायला हवा असे मला वाटते. मोबाइल हा अभ्यासासाठी गरजेचा असल्याने तुम्ही त्यापासून दूर राहू शकत नाही. मात्र, अभ्यास करताना त्याचा व्यत्ययही नको. त्यासाठी ज्या खबरदारी घेणे आवश्यक आहे, त्या घेतल्याच पाहिजेत. मी अभ्यास करताना कोणत्याही नोटिफिकेशनचा आवाज येणार नाही, हे आवर्जून पाहायचे.
मुलींना अनेक पर्याय उपलब्ध
तुमच्यात जिद्द असेल आणि तुम्ही काही गुणवत्तेच्या प्राथमिक फेऱ्या पार केल्या तर मुलींनाही स्पर्धा परीक्षांकडे वळणे अवघड नाही. कारण ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘यशदा’ किंवा अनेक एनजीओ स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करतात. तिथे तुमच्या अभ्यास, मार्गदर्शनाची मोफत सोय केलेली असते. तुमचा केवळ वैयक्तिक खर्च तुम्हाला करावा लागतो.
माझ्या कुटुंबाने कायम मला पाठिंबा दिला. माझे आईवडील माझ्यामागे कायम ठामपणे उभे राहिले आणि आजही आहेत. स्पर्धा परीक्षांकडे वळणाऱ्या मुलींच्या पालकांना मी एवढेच सांगेन की मुलींना तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. तो दिलात तर त्याही मानसिकरित्या अधिक दृढ राहून त्या यश मिळवू शकतात.
शब्दांकन : प्रज्ञा तळेगावकर