डॉ. श्रीराम गीत

सर, मला दहावी ला ८८ टक्के तर १२ वी विज्ञान ८४ टक्के होते. एसवाय बीएला ८२ टक्के आहेत. सर मी स्पर्धा परीक्षांची तयारी नुकतीच चालू केली आहे. माझा प्लॅन बी म्हणून नेट, सेट व टिसचा विचार आहे. कृपया मार्गदर्शन करावे.- प्रतिमा वाघ.

दहावी व बारावीचे विज्ञान शाखेतील मार्क छान असताना बीएला प्रवेश का घेतला याचे उत्तर तुला मनाशी शोधायचे आहे. एक माहिती नमूद करत आहे. राज्यसेवा किंवा केंद्र सेवा परीक्षामध्ये यशस्वी होणाऱ्या मध्ये ७० टक्के इंजिनीअर एक दोन प्रयत्नात यश मिळवतात. तसेच काही डॉक्टर्स पण असतात. त्यांना जर हे शक्य होते तर बारावी सायन्सला चांगले मार्क असून बीए करण्याचा रस्ता धरणे हे प्लॅन बीच्या संदर्भात धोक्याचे ठरते. आपल्या निमित्ताने यावर भर देऊन मी उत्तराला सुरुवात करतोय. सेट, नेटची परीक्षा पदव्युत्तर पदवीनंतरची असते. या उलट टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस (टिस) मध्ये पदवीनंतरचे १६ अभ्यासक्रम उपलब्ध असतात. त्या अभ्यासक्रमांसाठी तीव्र स्पर्धेतून तोंड देण्यासाठीच्या स्वरूपाची प्रवेश परीक्षा दरवर्षी जानेवारी महिन्यात घेतली जाते. मला तिथे जायची इच्छा आहे असे म्हणण्याऐवजी त्या परीक्षेचे स्वरूप समजून घे. त्याची तयारी करणे याकरिता किमान एक वर्ष बीए करतानाच प्रयत्न करावा लागेल. यूपीएससीमध्ये छानसे यश मिळवण्याकरता पदव्युत्तर पदवी समकक्ष अभ्यास लागतो. बीए करताना तो फारच क्वचित अगदी थोडय़ांना झेपतो. या उलट बीए झाल्यानंतर राज्यसेवा स्पर्धा परीक्षा देण्याचा अभ्यास जमणे शक्य असते. कशावर लक्ष द्यायचे कोणत्या परीक्षा द्यायच्या याची माहिती दिली आहे. सारासार विचार करून अजून माहिती गोळा करावी.

हेही वाचा >>> UPSC-MPSC : महाराष्ट्रातील स्थलांतर भाग-२ : स्थलांतराच्या कारणानुसार स्थलांतरीतांचे स्वरूप

मी बीए इंग्लिश २०१२ साली झालो आहे. मला बीए ला ५७ टक्के आहेत. मी आता नोकरी करतो आहे आणि आयटीआय करत आहे. माझा ट्रेड ड्राफ्टसमन आहे. माझे वय ३७ आहे. कृपया मला योग्य मार्गदर्शन करा. मिलिंद चव्हाण

आयटीआयचा ट्रेड ड्राफ्ट्समन आहे तो पूर्ण करून नोकरी करत आहात का आयटीआय करत आहात? हे मला कळलं नाही. वयाच्या ३७ व्या वर्षी कोणती नोकरी व त्याचे स्वरूप काय हेही कळलेले नाही. अकरा वर्षांपूर्वी ५७ टक्के मिळवून बीए झाले आहे त्याचा नवीन नोकरी शोधण्यासाठी फारसा उपयोग नाही. सगळय़ात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अपेक्षा काय याची कोणतीही नोंद नाही. त्यामुळे सद्य परिस्थिती लक्षात घेता मन लावून नोकरी चालू ठेवावी व त्यात बदल करण्याबद्दलचा निर्णय ड्राफ्ट्समन चा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आपणच योग्य पद्धतीत घ्यावा असे सुचवत आहे.

मी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालो आहे. माझे वय ६१ आहे. मी एम कॉम, मुंबई विद्यापीठ, व जीडीसीए केलेले आहे. मला सीएमए करण्याची इच्छा आहे. कृपया सदर कोर्सची संपूर्ण माहिती मिळण्यास विनंती आहे. या कोर्सचे फायदे व पुढे यामधील करीअरच्या संबंधित काही शक्यता आहे का. विशेषत: वरिष्ठ नागरिकांसाठी जॉबच्या काही संधी असल्यास कृपया कळविण्यास विनंती आहे. – नंदकुमार श्रीधर खेडेकर

सीएमएचा कोर्स गणितावर आधारित असतो. त्याला इतर विषयांची जोड असते. तो सलग तीन पातळय़ांच्या परीक्षा देऊन पूर्ण करावा लागतो. सहसा चार वर्षे लागतात. तोपर्यंत आपले वय ६६ पूर्ण होईल. त्यानंतर त्यातून कोणतीही नोकरी मिळण्याची शक्यता नाही. अगदी मोजक्या व्यक्ती सीएमए नंतर सल्लागाराच्या भूमिकेत काम करतात अन्यथा सारे बहुतेक नोकरीतच जातात. ते वय उलटले आहे.ही प्राथमिक माहिती आपल्याला दिली आहे. कॉस्ट मॅनेजमेंट संदर्भातील सर्व कामे ही मंडळी करतात.त्यातील एखाद्याला भेटून अधिक माहिती घ्यावी ही विनंती.

आवाहन

यूपीएससी द्यायची आहे. तर मनात हजारो प्रश्न उभे राहतात. मार्गदर्शनाची गरज भासते. अर्थात प्रश्न तिथे उत्तरही असतेच, करिअरशी निगडित देशातील सर्वोच्च परीक्षांविषयीच्या शंकांचे निरसन होईल, असे एकच ठिकाण म्हणजे करिअर वृत्तांतमधील करिअर मंत्र. म्हणूनच विद्यार्थ्यांनो, लेखणी उचला आणि प्रश्न विचारा. प्रश्न विचारताना आवश्यक तेथे आपली शैक्षणिक, वैयक्तिक माहिती सविस्तर लिहावी. जेणे करून योग्य प्रकारे शंका समाधान होईल. आमचा ई-पत्ता :

careerloksatta@gmail.com