MSRTC Jobs 2025 Latest News : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) लवकरच मोठ्या प्रमाणावर भरती करणार आहे. मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी तब्बल १७,४५० चालक आणि सहाय्यकांची कंत्राटी पदांवर नियुक्ती करण्यात येणार असून, २ ऑक्टोबरपासून या भरतीसाठीची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.
परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की,” ८००० नव्या बससाठी लागणाऱ्या मोठ्या मनुष्यबळाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) तब्बल १७,४५० चालक (Driver) आणि सहाय्यकांची कंत्राटी (Conductor) भरती करणार आहे. या भरतीसाठीची निविदा प्रक्रिया २ ऑक्टोबरापासून सुरू होणार आहे.
तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी (Golden employment opportunity for youth)
या भरती मोहिमेचा उद्देश राज्यातील हजारो बेरोजगार तरुण-तरूणींना रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे. निवड झालेल्या उमेदवारांना किमान ३०,००० रूपये पगार मिळणार आहे. इच्छुक आणि उत्साही तरुण-तरूणींनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले.
कंत्राट स्वरुपात होणार भरती (Recruitment will be done on a contract basis.)
एसटी महामंडळाच्या अलीकडील संचालक मंडळ बैठकीत झालेल्या निर्णयांनुसार, चालक व सहाय्यकांची भरती कंत्राटाच्या स्वरूपात तीन वर्षांसाठी करण्यात येणार आहे. ही भरती ई-निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून होणार असून सहा प्रादेशिक विभागांतून ती राबवली जाईल. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरवठादार संस्था एसटीला आवश्यक तेवढे कर्मचारी वेळेत उपलब्ध करून देतील.” असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
किती मिळणार वेतन?(How much salary will you get?)
कंत्राटी चालक व सहाय्यकांना अंदाजे ३०,००० रुपयांचा पगार मिळणार असून त्यांना एसटी महामंडळामार्फत प्रशिक्षणही दिले जाणार आहे. बसांची संख्या वाढल्यामुळे व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांना अखंडित, सुरक्षित आणि दर्जेदार बससेवा मिळेल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.