विधि क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर पाच वर्षांचा कोर्स करून वकील बनता येते. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, व्होकेशनल यासारख्या कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विधि शाखेत प्रवेश मिळू शकतो. अर्थातच यासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा आहे.

स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेतील सर्व स्तरांवर कायदेशीर सुरक्षिततेला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. विधिज्ञ अर्थात वकील सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. देशात आजघडीला विविध न्यायालयांमध्ये कोट्यवधी खटले प्रलंबित आहेत आणि दररोज हजारो खटले नव्याने दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर वकिलांची गरज सातत्याने वाढतच आहे. विधि पदवीधरांना म्हणजेच वकिलांना वित्तसंस्था, संरक्षण दले, सरकारी व निमसरकारी संस्था, काॅर्पोरेट कंपन्या, अशासकीय संस्था, पत्रकारिता, अध्यापन, लीगल प्रोसेस आऊटसोर्सिंग आणि मुख्यत्वे वकिली व्यवसाय अशा अनेक क्षेत्रांत करिअरच्या उत्तम संधी आहेत. कायदा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांकडे काही गुण असणे आवश्यक आहे – जसे उत्कृष्ट मसुदा लेखन, सादरीकरण व संवाद कौशल्य, चातुर्य, आत्मविश्वास व उत्तम आकलन क्षमता.

विधि क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर पाच वर्षांचा कोर्स करून वकील बनता येते. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, व्होकेशनल यासारख्या कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विधि शाखेत प्रवेश मिळू शकतो. अर्थातच यासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा आहे.

विधि क्षेत्रात देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी १९८८ मध्ये बंगळुरू येथे देशातील पहिले ‘नॅशनल लाॅ स्कूल’ सुरू करण्यात आले. आज रोजी मुंबई, नागपूर, औरंगाबादसह देशभरात २६ नॅशनल लाॅ स्कूल अस्तित्वात आहेत. इंजिनीअरिंगमध्ये जसे आयआयटीचे स्थान आहे तसे लाॅ मध्ये नॅशनल लाॅ स्कूल्सचे स्थान आहे. बारावीनंतर या सर्व नॅशनल लाॅ स्कूल्समध्ये प्रवेशासाठी एक स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतली जाते ज्याचे नाव आहे क्लॅट.

क्लॅट’च्या मार्कांवर प्रवेश

२०२६ जूनमध्ये या नॅशनल लाॅ स्कूल्समधील प्रवेशासाठी ही क्लॅट परीक्षा रविवार ७ डिसेंबर २०२५ या दिवशी घेण्यात येणार आहे. मुंबई , पुणे , नाशिक, कोल्हापूर, नागपूर , औरंगाबाद सह महाराष्ट्रातील २१ शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे. दोन तासांच्या या परीक्षेत प्रत्येकी एक मार्काचे १२० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. चुकीच्या उत्तरासाठी पाव गुण वजा केला जाईल. या परीक्षेत इंग्रजी भाषा ( २२-२६ प्रश्न), सामान्य ज्ञान व चालू घडामोडी ( २८-३२ प्रश्न), लिगल रिझनिंग ( २८-३२ प्रश्न), लाॅजिकल रिझनिंग ( २२-२६ प्रश्न) आणि अंकगणित ( १०-१४ प्रश्न) हे विषय असतील. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज consortiumofnlus.ac.in या संकेतस्थळावर ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत भरता येतील. अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी या संकेतस्थळावर नमुना प्रश्नपत्रिका तसेच परीक्षेच्या तयारीसाठी भरपूर मटेरियल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या परीक्षेच्या निकालानंतर या सर्व नॅशनल लॉ कॉलेजमध्ये प्रवेशासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. नॅशनल लाॅ स्कूल्स व्यतिरिक्त निरमा युनिव्हर्सिटी, अमिटी युनिव्हर्सिटी, आयआयएम रोहतक यासह आणखी २४ लाॅ स्कूलमध्ये ‘क्लॅट’च्या मार्कांवर प्रवेश मिळतो.

राज्यात सीईटी

पुण्यातील आयएलएस लाॅ काॅलेजसह महाराष्ट्रातील सर्व सरकारी / अनुदानित / विना अनुदानित लाॅ काॅलेज मधील प्रवेशासाठी महाराष्ट्र सीईटी सेल दरवर्षी एप्रिल/ मे महिन्यात एक स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतो. कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एवढेच नाही तर दहावीनंतर तीन वर्षांची अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही या परीक्षेला बसता येईल. यासाठीची सविस्तर जाहिरात cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर जानेवारी महिन्यात प्रसिद्ध होईल. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद सह महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात येते. दोन तासांच्या या परीक्षेत प्रत्येकी एक मार्काचे १५० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.

परीक्षेत इंग्रजी भाषा (३० प्रश्न) , सामान्य ज्ञान व चालू घडामोडी (३० प्रश्न) , लिगल रिझनिंग (४० प्रश्न) , लाॅजिकल रिझनिंग (४० प्रश्न) आणि अंकगणित (१० प्रश्न) हे विषय असतील. परीक्षा संगणकावर घेतली जाईल , मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांत देणे शक्य आहे. परीक्षेच्या निकालानंतर सर्व लॉ कॉलेजमध्ये प्रवेशासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल.