विद्यार्थ्यांनी मूलभूत संशोधनाकडे वळावे म्हणून १२ वी नंतर संशोधन क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक दर्जेदार संस्था उपलब्ध आहेत. यात आयसर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (बंगळुरू), नायसर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या संस्थांमधील संधींबाबत माहिती घेऊयात.
दर वर्षी लाखो विद्यार्थी शास्त्र शाखा निवडतात पण त्यातील फारच थोड्या विद्यार्थ्यांचा कल मूलभूत संशोधनाकडे असतो. बहुतांश विद्यार्थी मेडिकल, इंजिनीअरिंग, फार्मसी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशा अप्लाईड सायन्सेमध्येच करिअर करण्यासाठी धडपडत असतात. कारण विद्यार्थी आणि पालक या दोघांनाही मूलभूत संशोधन या क्षेत्रात पैसा, प्रतिष्ठा मिळत नाही असे वाटत असते. करोना विषाणूने जगभर घातलेल्या धुमाकुळानंतर त्यावर उपाय शोधण्याची जगभर जी धडपड सुरू आहे, त्यात मूलभूत संशोधनाकडे दुर्लक्ष झाल्याची भरपाई करण्यासाठी संशोधन क्षेत्राकडे कल वाढत आहे. त्यामुळे आता भारतातही मूलभूत संशोधनाकडे वळण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल अशी अपेक्षा आहे.
खरेतर विद्यार्थ्यांनी मूलभूत संशोधनाकडे वळावे म्हणून १२ वी नंतर संशोधन क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक दर्जेदार संस्था उपलब्ध आहेत. यात आयसर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (बंगळुरू), नायसर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या संस्थांमधील संधींबाबत माहिती घेऊयात.
आयसर
भारत सरकारने २००६ साली मूलभूत संशोधनासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन व रिसर्च अर्थात आयसर या संस्थेची स्थापना केली. देशभरात यासाठी बेहरामपूर, भोपाळ ,कोलकाता, मोहाली, पुणे, तिरूवनंतपुरम आणि तिरुपती या ७ ठिकाणी आयसर या संस्थांची स्थापना केली आहे. या संस्थांमध्ये बारावीनंतर पाच वर्षांचा थेट मास्टर्स कोर्स उपलब्ध आहे.
जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, जिऑलॉजी, डाटा सायन्स, पर्यावरण शास्त्र या मूलभूत विषयांमध्ये बारावीनंतर पाच वर्षांचा मास्टर्स कोर्स करता येतो. याशिवाय केमिकल इंजीनीरिंग/ डाटा सायन्स इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग व कॉम्प्युटर सायन्स या विषयांमध्ये भोपाळ येथे ४ वर्षांचा पदवी कोर्स उपलब्ध आहे तर भोपाळमध्येच इकॉनॉमिक सायन्सचा चार वर्षांचा पदवी कोर्स उपलब्ध आहे. इकॉनॉमिक आणि स्टॅटिस्टिक्सचा चार वर्षांचा पदवी कोर्स तिरुपती येथे उपलब्ध आहे.
सायन्सच्या ५ वर्षांच्या मास्टर्स कोससाठी देशभरातली या सर्व संस्थांमध्ये मिळून दोन हजार जागा उपलब्ध आहेत तर भोपाळ येथे इंजिनीअरिंग पदवी कोर्स साठी १४० जागा आणि इकॉनॉमिक सायन्स पदवीसाठी ३५ जागा उपलब्ध आहेत याशिवाय इकॉनॉमिक आणि स्टॅटिस्टिक्सचा चार वर्षांचा पदवी कोर्ससाठी तिरुपती येथे ५० जागा उपलब्ध आहेत. या संस्थांमध्ये प्रवेश आयसर देशपातळीवर घेत असलेल्या आयसर अॅप्टिट्यूड टेस्ट या परीक्षेतून उपलब्ध होतात. ही प्रवेश परीक्षा पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, नवी मुंबई, नागपूर, अमरावती या केंद्रांवर २५ मे रोजी घेतली जाईल. परीक्षेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने www.iiseradmission.in या संकेतस्थळावरून १५ एप्रिलपर्यंत भरता येईल.
परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम आणि मॉडेल पेपर्स, संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या प्रवेश परीक्षेसाठी जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, व गणित या चारही विषयांचा अभ्यासक्रम असेल आणि परीक्षेत सर्व विषयांना समान न्याय असेल. या तीन तासांच्या कॉम्प्युटरवर घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत प्रत्येक विषयावर १५ प्रश्न असतील. बरोबर उत्तराला ४ मार्क मिळतील तर चुकीच्या उत्तरांचा प्रत्येकी एक मार्क वजा करण्यात येईल. ११ वी व १२ वी च्या सीबीएससी च्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा होईल.
या परीक्षेसाठी कोणत्याही बोर्डासाठी बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना बसता येईल. १२ वी बोर्डाच्या परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. आयसर परोक्षेमधील मार्कांवर बोर्ड परीक्षेतून पात्र विद्यार्थ्यांची मेरीट लिस्ट करण्यात येईल आणि मग विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे या ७ संस्थांचा पसंतीक्रम देता येईल . विद्यार्थ्यांचा पसंतीक्रम आणि आयसर परीक्षेमधील मार्कांवर आधारित मेरीट याच्या वर संस्थेत प्रवेश निश्चित
होईल. या संस्थांना शासनाची भरीव मदत मिळत असल्याने अत्यंत दर्जेदार शिक्षण व्यवस्था इथे उपलब्ध आहे. या पाच वर्षांच्या कोर्स नंतर बहुतांश विद्यार्थी भारतात किंवा परदेशात पीएचडी साठी प्रवेश घेतात. याशिवाय या विद्यार्थ्यांना सरकारी किंवा खासगी संशोधन संस्थांमध्ये तसेच शिक्षणक्षेत्रात करिअरच्या संधी मिळू शकतात.
आयसर प्रवेश परीक्षेच्या मार्कांवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू येथे चार वर्षांच्या सायन्स मधील पदवीसाठी तसेच आय आय टी मद्रास या संस्थेमधील चार वर्षांच्या मेडिकल सायन्स आणि इंजिनीअरिंग अशा आगळ्यावेगळ्या कोर्सला सुद्धा प्रवेश मिळतो. (पूर्वार्ध)
vkvelankar@gmail.com