बारावीनंतर परदेशात पदवीसाठी शिक्षण घेण्याचे अनेक भारतीय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे स्वप्न असते. जागतिक दर्जाचे शिक्षण, करिअरच्या उत्तम संधी आणि विविध संस्कृतींचा अनुभव घेण्यासाठी अनेक विद्यार्थी परदेशात जाण्याचा विचार करतात. मात्र, या सगळ्या स्वप्नांपुढे एक मोठा अडथळा उभा राहतो तो म्हणजे शिक्षणाचा खर्च.

शिक्षण शुल्क, राहणीमान, प्रवास, विमा आणि इतर खर्च मिळून परदेशात शिक्षण घेणे हे आर्थिकदृष्ट्या खूप मोठे आव्हान ठरते. काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते, काहींना नातेवाईकांची किंवा संस्थांची आर्थिक मदत मिळते, पण सगळ्यांना ती संधी मिळतेच असे नाही. म्हणूनच शैक्षणिक कर्ज हा पर्याय अनेकांसाठी गरजेचा ठरतो.

शैक्षणिक कर्जाच्या माध्यमातून बँका आणि वित्तीय संस्था विद्यार्थ्यांना त्याच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करतात. यातून शिक्षण शुल्क, वसतिगृहाचा खर्च, प्रवास, पुस्तकं, आणि विमा यासाठी पैसे मिळू शकतात. शैक्षणिक कर्जाचे काही स्पष्ट फायदे आहेत. विद्यार्थ्याला एकदम मोठी रक्कम मिळते, त्यामुळे शिक्षणात अडथळा येत नाही. याशिवाय, भारतात कर्जाच्या व्याजावर करसवलत मिळते आणि शिक्षण सुरू असताना किंवा नोकरी लागेपर्यंत कर्जाची परतफेड थोडी पुढे ढकलता येते. त्यामुळे शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे शक्य होते. मात्र या सगळ्याचा दुसरा पैलूही आहे.

खासगी बँकांमध्ये शैक्षणिक कर्जाचे व्याजदर बरेच जास्त असतात आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जर अपेक्षित नोकरी मिळाली नाही तर कर्जफेड करणे खूपच कठीण होऊ शकते. बँकांकडून कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे, जामीनदार किंवा मालमत्तेची हमी या गोष्टी प्रक्रिया गुंतागुंतीची करतात. त्यामुळे कधी कधी विद्यार्थ्यांना किंवा पालकांना मानसिक ताण देखील येतो. म्हणून शैक्षणिक कर्ज घेण्याचा निर्णय घेताना अतिशय विचारपूर्वक पुढे जाणे आवश्यक आहे.

सर्वप्रथम, कर्जाची नेमकी गरज किती आहे हे ठरवावे. त्यानंतर कोणत्या बँकेचे व्याजदर कमी आहेत, कोणत्या अटी अधिक अनुकूल आहेत हे तपासावे. सरकारी योजनांमधून मिळणाऱ्या व्याज अनुदानाचा लाभ घ्यावा. तसेच परतफेडीसाठी कोणती योजना अधिक योग्य आहे याचा अभ्यास करून निर्णय घ्यावा. शैक्षणिक कर्ज हे केवळ पैसे मिळवण्याचे साधन नसून, ते आपल्या भविष्यातील आर्थिक जबाबदारीचे प्रथम पाऊल आहे. योग्य नियोजन आणि जबाबदारीच्या भावनेने घेतलेले कर्ज हे शिक्षण पूर्ण करून चांगले करिअर घडवण्यासाठी मदतीचे ठरू शकते, पण त्याची जोखीम लक्षात घेऊनच योग्य मार्ग निवडावा हे अधिक महत्त्वाचे आहे.

किती कर्ज घ्याल?

विद्यार्थ्याने किती कर्ज घ्यावे याचा सारासार निर्णय हा त्याचा व पालकांचा आहे. अभ्यासक्रमाचे शुल्क किती आहे, आपली एकूण कितपत रक्कम भरण्याची तयारी आहे, व्याजदर, परतफेडीचा कालावधी, परकीय चलनाचा विनिमय दर या सर्व गोष्टी बघून कर्जाच्या रकमेचा निर्णय घ्यावा.

विद्यार्थी व पालकांनी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी :

● परदेशी विद्यापीठ/ महाविद्यालय व तुम्ही निवडलेला अभ्यासक्रम जेवढे अधिक मान्यताप्राप्त किंवा प्रतिष्ठित तेवढी तुम्हाला कोणत्याही बँकेकडून शैक्षणिक कर्ज मिळण्याची शक्यता अधिक आहे.

● शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे ही कोणत्याही इतर कर्जासाठी लागणार तीच असतात. त्याशिवाय मात्र बँक पासपोर्ट, परदेशी विद्यापीठाचे प्रवेश पत्र, आय-२० फॉर्म ज्यावर विद्यापीठाच्या एकूण खर्चाचे अधिकृत विश्लेषण असते इत्यादी कागदपत्रांची मागणी करते.

● सर्व बँकांकडून दिला जाणारा व्याजदर, तारण, एकूण कर्जप्रक्रिया व कर्ज परतफेडीची सुलभता यांची तुलना करा व मगच निर्णय घ्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शैक्षणिक कर्जाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ग्रेस पीरियड. बहुतेक शैक्षणिक कर्ज योजना विद्यार्थ्याला शिक्षण पूर्ण होईपर्यंत किंवा नोकरी लागेपर्यंत परतफेडीची मुभा देतात. त्यामुळे शिक्षण पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत करता येते. शिवाय Section 80 E अंतर्गत कर्जाच्या व्याजावर करसवलतही मिळते. शैक्षणिक कर्ज घेणे म्हणजे केवळ आर्थिक गरज भागवणे नाही, तर ती एक सकारात्मक आर्थिक सवय देखील आहे. कर्ज घेताना विद्यार्थी खर्चाचे नियोजन शिकतात, परतफेडीची जबाबदारी स्वीकारतात आणि आर्थिक शिस्त अंगीकारतात. अनेक राष्ट्रीयकृत बँका आणि खासगी वित्तीय संस्था तसेच NBFCs परदेशी शिक्षणासाठी कर्ज देतात. त्याचे व्याजदर, परतफेडीचे कालावधी, इतर अटी यांचा योग्य अभ्यास करून निर्णय घेतला, तर हे कर्ज भविष्यातील उत्तम गुंतवणूक ठरू शकते.

विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी शिष्यवृत्ती, बचत आणि शैक्षणिक कर्ज या सगळ्या पर्यायांचा योग्य संतुलनात विचार करून निर्णय घ्यावा. शैक्षणिक कर्ज हे केवळ ‘कर्ज’ नसून, ती एक भविष्य घडवणारी आर्थिक संधी आहे. योग्य नियोजन आणि आत्मविश्वासाने हे पाऊल टाकल्यास, परदेशातील शिक्षणाचे स्वप्न नक्कीच साकार करता येते.
theusscholar@gmail.com